बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीने बरेच दिवस त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले होते. त्यानंतर त्यांचे लग्न देखील सर्वांसाठी सुखद धक्काच होता. आता विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु आहेत. परंतु अनुष्काने यावर वक्तव्य करत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

नुकताच फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनुष्काने तिच्या प्रेग्नंसीबाबत खुलासा केला आहे. ‘एखादी अभिनेत्री लग्नबंधनात अडकली कि लगेच लोकांना ती प्रेग्नंट आहे का असा प्रश्न पडतो. जेव्हा ती एखाद्याला डेट करत असते तेव्हा ते दोघे लग्न करणार का? असा प्रश्न अनेकांना पडतो’ असे ती म्हणाली. त्यानंतर पुढे ‘कोणत्याही अभिनेत्रीने लग्न केले की तिच्या बद्दल काही तरी चर्चा होतातच. कोणी काही परिधान करु शकते मग ते सैल कपडे ही असू शकतात. असे कपडे कधीकधी ट्रेंड असल्यामुळे परिधान केले जातात. पण त्या कपड्यांवरुन मी प्रेग्नंट आहे असे म्हटले जात आहे. तुम्ही यावर काही करु शकत नाही. तुम्ही फक्त दुर्लक्ष करु शकता’ असे अनुष्का म्हणाली आहे.

अनुष्काच्या या वक्तव्यावरुन ती प्रेग्नंट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान दुसऱ्यांना त्यांचे आयुष्य जगू द्या. त्यांच्या आयुष्यात असे प्रसंग का आणले जातात. मग त्या व्यक्तिला जबदरस्ती त्यावर बोलणे भाग पडते आणि मला या गोष्टीची चीड येते असल्याचे अनुष्काने म्हटले आहे.