अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचं प्राण्यांवर असलेलं प्रेम हे सर्वश्रुत आहे. अनुष्का लवकरच रत्नागिरीतील एका गावात पशुवैद्यकीय रुग्णालय उभारणार आहे. तसेच भटक्या, पाळीव प्राण्यांसाठी ती निवाराही बांधणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती रुग्णालय बांधण्याच्या प्रयत्नात होती. अनुष्कानं रत्नागिरीतील गावात जागा घेतली होती, मात्र २०१६ पासून या जागेवरून वाद सुरू आहेत. आता तिला रुग्णालय बांधण्यासाठी हिरवा कंदील मिळाला असून लवकरच रुग्णालयाचं काम सुरू होणार असल्याचं समजत आहे.
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार अनुष्काला पशुवैद्यकीय रुग्णालय तसेच भटक्या, पाळीव प्राण्यांसाठी निवारा उभारायचा आहे. याच रुग्णालयाच्या शेजारी तिला वडिलांसाठी घरही बांधायचं आहे. मात्र काही कारणांमुळे ही जागा वादात सापडली होती आता मात्र या जागेचा वाद मिटला असून लवकरच रुग्णालयाच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. अनुष्काचे वडिल रुग्णालयाचं व्यवस्थापन पाहतील असं समजत आहे. अनुष्कानं तिच्या अधात्मिक गुरूंच्या सल्ल्यावरून प्राण्यांसाठी निवारा उभारण्याचं ठरवलं असल्याचंही सुत्रांकडून समजत आहे.
अनुष्काचं प्राणीप्रेम हे सर्वश्रुत आहे. प्रत्येक जीवाचं मोल आहे कोणत्याही प्राण्याला आपण ईजा पोहोचू नये या मताची ती आहे. प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेनं अनुष्काला २०१७ मध्ये ‘पेटा पर्सन ऑफ द इअर’चा किताबही दिला होता.