सहा वर्षे, सात चित्रपट आणि त्यातले के वळ तीनच चित्रपट रूढार्थाने यशस्वी ठरलेले आणि तरीही ‘रब ने बना दी जोडी’मधील तानी ते ‘पीके’ची जगत्जननी असा वेगाने प्रवास झाला आहे तिचा.. आमिरची सध्या ‘पीके’ म्हणून ओळख झाली असेल तर अनुष्काही सध्या ‘जगत्जननी’ या नावाने प्रसिद्ध झाली आहे. कुठे तो ‘रब ने बना दी जोडी’ या पहिल्याच चित्रपटातला तिचा साधा लुक आणि ‘पीके’मधला जग्गूचा भन्नाट लुक.. असा तिच्यासमोर उल्लेख केला तर ‘जगत्जननी’ साकारण्याकरता जो आत्मविश्वास लागतो तो माझ्यात फार लवकर आला आहे, असं ती सांगते. याचं श्रेयही ती आपल्याला वेगळ्या भूमिका करण्याची संधी देणाऱ्या राजकुमार हिरानी आणि अनुराग कश्यपसारख्या दिग्दर्शकांना देते.
सध्या चित्रपट सोडून ओठांवरची शस्त्रक्रिया, विराट कोहलीबरोबरचे प्रेमसंबंध असा सगळ्या विचित्र गोष्टींसाठी ती चर्चेत आहे. ‘पीके’ प्रदर्शित होऊ द्या.. या चर्चा हवेत विरून जातील, असं ती म्हणते. खरेतर, या वर्षी ‘पीके’ आणि अनुरागचा ‘बॉम्बे वेल्वेट’ असे तिचे दोन महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शित होणार होते. शाहरुखबरोबरचा ‘जब तक है जान’ हा तिचा शेवटचा हिट चित्रपट होता. मात्र, ‘बॉम्बे वेल्वेट’ पुढच्या वर्षीपर्यंत पुढे ढकलला गेला; तर ‘पीके’ प्रदर्शित होता होता वर्ष संपत आलंय. सलग दोन वर्षे मोठय़ा पडद्यावर न दिसणं हा तिच्यासाठी धोका नव्हता का.. यावर प्रामाणिकपणे आपली भूमिका करणं एवढंच आपल्या हातात असतं, असं ती म्हणते. तुम्ही चांगलं काम केलं असेल तर वर्षांनुवर्ष त्या एका भूमिकेसाठी ओळखले जाता. मात्र, अमुक एक चित्रपट ठरल्या वेळी प्रदर्शित झाला नाही, असा प्रत्येक चित्रपट आणि महिन्यांचा हिशेब लावत तुम्ही काम करू शकत नाही, असं तिने सांगितलं.
‘पीके’साठी एवढा वेगळा लुक, विचित्र केसांचा टोप आणि तेवढंच विचित्र नाव कसं स्वीकारलं, या प्रश्नावर ती मुळात नायिका म्हणून जगत्जननीला ‘पीके’मध्ये एवढं महत्त्व का आहे, याचा किस्सा सांगते. राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांमध्ये नायकाबरोबर नायिकेलाही एक अनन्यसाधारण महत्त्व असतं; पण तरीही हिरानी यांच्या पत्नीने त्यांच्याकडे तक्रार केली होती की अजूनही आधुनिक स्त्रीची खरी प्रतिमा तुमच्या नायिकांमधून उमटत नाही. आजच्या स्त्रीचा स्वतंत्र बाणा, त्यांचे लुक्स, त्यांचे विचार करण्याची पद्धत हे सगळं तुमच्या नायिकांमध्ये दिसायला हवं. पत्नीचं म्हणणं हिरानींना कुठेतरी मनापासून पटलं असावं म्हणूनच ‘पीके’साठी ‘जगत्जननी’ची व्यक्तिरेखा लिहितानाच वेगळ्या पद्धतीने लिहिली होती. त्यानंतर तिचे लुकही हटके असतील यासाठी तिच्या केसांपासून कपडय़ांपर्यंत प्रत्येक गोष्ट हिरानींनी विचारपूर्वक निवडली आहे. कारण, काही का असेना त्यांच्या चित्रपटातून आपल्याला ‘जग्गू’सारखी अफलातून व्यक्तिरेखा साकारायला मिळाली. या भूमिकेतूनही खूप काही शिकायला मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. ‘पीके’मध्ये अनुष्काने एकीकडे ‘द आमिर खान’ची नायिका रंगवली आहे, तर दुसरीकडे तुलनेने अगदीच नवख्या सुशांत सिंग राजपूतची नायिकाही साकारली आहे. या दोघांबरोबर काम करताना मजा आली मात्र. दोन्हीकडचा अनुभव अर्थात वेगळा होता. आमिर आपल्याला कितीही मोकळेपणा देत असला तरी त्याच्याबद्दल मनात असलेली आदराची भावना आपल्या वागण्यातही सहजतेने येते आणि दोघांमध्ये एक अंतर असतंच. सुशांतच्या बाबतीत तो प्रकार होत नाही. आम्ही दोघेही एका वयाचे आहोत, त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन काम करण्यात एक सहजता असते, जी मला अभिनेत्री म्हणून महत्त्वाची वाटते, असं अनुष्काने सांगितलं. आठ-दहा चित्रपट जुनी असलेली अनुष्का ‘एनएच-१०’ चित्रपटाची निर्माती म्हणूनही पुढे आली आहे. एवढय़ा कमी वयात निर्माती बनण्याची घाई कशाला, यावर चित्रपट करताना केवळ अभिनय नाही तर ती संपूर्ण प्रक्रियाच आपल्याला खूप आवडते, असं ती म्हणते. चित्रपटनिर्मितीचे वेगवेगळे घटक हे अभ्यास करण्याजोगे आहेत आणि मला ती प्रक्रिया आत्ताच अनुभवायची आहे. ‘एनएच-१०’चा विषय चांगला होता, त्याची निर्मिती अनुराग कश्यपसारख्यांबरोबर करायची होती. आर्थिक दृष्टय़ाही त्यात अडचण नव्हती. म्हणून मी या चित्रपटाची निर्माती बनले. पुढे जाऊन दिग्दर्शक वगैरे बनायचं नाही, असं सांगणाऱ्या अनुष्काने आपल्याला पटकथा लेखक म्हणून काम करायचे असल्याचे उघड केले. त्यासाठी तिने प्रशिक्षणही घेतले असून पटकथा लेखनाला सुरुवातही केली आहे. ‘पीके’नंतर ‘बॉम्बे वेल्वेट’, झोया अख्तरचा ‘दिल धडकने दो’, ‘एनएच-१०’ आणि करण जोहरचा ‘ए दिल है मुश्कील’ असे चांगले चित्रपट आपल्या वाटय़ाला आले आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षभरात एक नवी अनुष्का या चित्रपटांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असे ती विश्वासाने सांगते.

 

Story img Loader