आतापर्यंत बॉलिवूडमध्ये हिरोच्या मित्राची भूमिका म्हणजे काहीशी दुय्यम भूमिका मानली जायची. इतर भूमिकांच्या तुलनेत नेहमीच कमी महत्त्वाची ही भूमिका ठरली पण अपारशक्ती खुराना असं मानत नाही. आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटात अपारशक्ती सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेतच दिसलाय. या इण्डस्ट्रीत सर्वांना हिरो व्हायचंय, कोणीतरी हिरोच्या जिगरी दोस्ताचीही भूमिका साकारायला नको का? असं तो हसून म्हणतो.
‘स्त्री’, ‘दंगल’, ‘लुका छुपी’ सारख्या चित्रपटात अपारशक्ती सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला. त्यातल्या ‘स्त्री’, ‘लुका छुपी’ चित्रपटात हिरोच्या मित्राची भूमिका त्याच्या वाट्याला आली. मात्र छोट्या भूमिका पदरात आल्यानं आपल्याला वाईट वाटत नाही असं अपारशक्ती म्हणतो. इथे प्रत्येकाला हिरो व्हायचंय, कोणीतरी हिरोच्या जिगरी दोस्ताचीही भूमिका साकारायला नको का? असं तो हसून म्हणतो. माझ्यासाठी भूमिका लहान किंवा मोठी नसते मी चित्रपटाची कथा पाहतो. मला कथा आवडली की चित्रपट करायला तयार होतो असं त्यानं सांगितलं.
मी हिरोच्या मित्राला आदर मिळवून दिला असं मला अनेकजण सांगतात. त्याचक्षणी मी ठरवलं की यापुढे हिरोच्या मित्राची भूमिका जरी वाट्याला आली तरी ती हसत हसत करायची. अपारशक्ती कानपूर आणि स्ट्रीट डान्सरमध्येही दिसणार आहे. या चित्रपटातही माझ्या छोट्या भूमिका असतील असं त्यानं मुलाखतीत सांगितलं.