Apoorva Mukhija Instagram Post: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजा ऊर्फ द रिबल किडने ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादानंतर पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. समय रैनाच्या वादग्रस्त ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखिजा यांनी काही अश्लाघ्य आणि अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. या भागाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचले होते. त्यानंतर अपूर्वा मुखिजाने आपल्या सोशल मीडिया हँडलवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या होत्या. मात्र आता तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर पदार्पण केले असून मागच्या काळात आलेल्या धमक्यांचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.

‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादानंतर बरोबर दोन महिन्यांनी अपूर्वाने इन्स्टाग्रामवर परतण्याचा निर्णय घेतला आहे. तीस लाख फॉलोअर्स असलेल्या अपूर्वाने पहिल्या पोस्टमध्ये तिला आलेल्या धमक्यांचे स्क्रिनशॉट दिले आहेत. बलात्कार, जीवे मारणे आणि अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी असल्याचे हे स्क्रिनशॉट शेअर करत अपूर्वाने म्हटले की, हे स्क्रिनशॉट एकूण धमक्याच्या केवळ १ टक्के इतके आहेत.

“ट्रिगर वॉर्निंग: या पोस्टमध्ये अ‍ॅसिड हल्ला, बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकीचे स्क्रिनशॉट आहेत”, असे शीर्षक देऊन अपूर्वाने सर्व स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.

चाहत्यांकडून मिळाला पाठिंबा

अपूर्वाच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टच्या माध्यमातून तिचे सोशल मीडियावर स्वागत केले आहे. या पोस्टला आतापर्यंत पावणे सात लाख लाईक्स तर जवळपास ४६ हजार कमेंट्स प्राप्त झाल्या आहेत. चाहत्यांनी तिचे स्वागत करत असताना या धमक्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. आता सायबर पोलीस कुठे गेले? असा सवाल एका चाहत्याने विचारला आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, कुणालाही अशा प्रकारच्या तिरस्काराचा सामना करावा लागू नये.

एका युजरने लिहिले की, अपूर्वाने असा कोणता गुन्हा केला की, तिला जीवे मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी दिली जात आहे.

काय आहे इंडियाज गॉट लेटेंटचा वाद

८ फेब्रुवारी रोजी इंडियाज गॉट लेटेंटचा शो युट्यूबवर प्रदर्शित झाला होता. या शो’चे जगभरात चाहते आहेत. या शोच्या एका भागात रणवीर अलाहाबादियाने पालकांबाबत एका स्पर्धकाला अश्लील प्रश्न विचारला होता. तर अपूर्वा मुखिजाने स्पर्धकाशी बोलताना गुप्तांगाबाबत अश्लिल टिप्पणी केली होती.