Apoorva Mukhija : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (Indias Got Latent) या शोमुळे प्रसिद्धी झोतात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजे अपूर्वा मुखिजा (Apoorva Mukhija). या शोमधील पालकांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली. शोमधील वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेल्या गदारोळामुळे ती काही काळ सोशल मीडियापासून दूर होती. त्यानंतर दोन दिवसांपुर्वी तिने शोमधील वादग्रस्त वक्तव्यानंतर तिला आलेल्या धमक्यांचे शेकडो मॅसेज आणि कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले.

अपूर्वाने ‘ट्रिगर वॉर्निंग’ असं नाव देत तिच्या सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली होती. यात अ‍ॅसिड हल्ल्यापासून, बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्यांच्या अनेक कमेंट्स व मॅसेजेसचे स्क्रीनशॉट्स होते. अपूर्वाने शेअर केलेल्या या स्क्रीनशॉट्सच्या एकूण १९ पोस्ट आहेत. ज्यात अपूर्वा मुखिजाविरुद्ध अ‍ॅसिड हल्ला, बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे मॅसेज आणि कमेंट्स आहेत. तसंच अनेक शिव्या व अपशब्ददेखील आहेत.

काही टिप्पण्यांमध्ये ‘तुझ्या पालकांनी तुला काही शिकवले नाही का?’, ‘वाईट मुलगी’, ‘तुला लाज वाटली पाहिजे’, ‘हिला पण अटक करा’, ‘ही जिथे मिळेल तिथं हिला गोळी मारा’, यांसारख्या अनेक कमेंट्सचा समावेश आहे. त्यानंतर अपूर्वाने युट्यूबवर एक भावनिक व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चाहत्यांना वादाच्या कठीण दिवसांची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. अपूर्वाने रडत रडत सांगितलेल्या या व्लॉगचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विदिशा म्हसकर इन्स्टाग्राम स्टोरी
विदिशा म्हसकर इन्स्टाग्राम स्टोरी

अपूर्वाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर आता अनेक नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकजण तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत. अशातच मराठी अभिनेत्री विदिशा म्हसकर हिनेदेखील अपूर्वाबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्रीने अपूर्वाच्या व्लॉगचा व्हायरल व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यासह तिने असं म्हटलं आहे की, “त्यांनी तो शो बंद केला कारण तो नॉर्मल (सामान्य) नव्हता. आणि आता तिला (अपूर्वा मुखिजा) बलात्काराच्या धमक्या येत आहेत, हे नॉर्मल आहे का?”

दरम्यान, अपूर्वाने शेअर केलेल्या व्हिडीओखाली अनेकजण तिच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. “हे हृदयद्रावक आहे, पण तू हे हे शेअर केलंस याचा आनंद आहे”, “तू सगळं कसं हाताळलंस माहीत नाही, पण यासाठी तुला आणखी शक्ती मिळो”, अशा कमेंट्स करत तिला धीर दिला आहे. अशातच विदिशानेदेखील “तिला बलात्काराच्या धमक्या येत आहेत, हे नॉर्मल आहे का?” असा प्रश्न विचारला उपस्थित केला आहे.