अलीकडच्या काळात देशभक्ती आणि राष्ट्रवाद ही जणू काही आपलीच मक्तेदारी आहे असा दावा करत आपल्याशी व आपल्या आचारविचारांशी मतभेद व्यक्त करणाऱ्यांना व आपल्या चुकांवर बोट ठेवणाऱ्यांना ते देशद्रोही व राष्ट्रवादाचे शत्रू असल्याचे लेबल चिकटवण्याचा फंडा सत्तेला गवसणी घातल्यामुळे मदांध झालेल्यांनी सुरू केला आहे. सामान्यजनांना कथित देशभक्तीच्या संमोहनाची अफूची गोळी चढवून आपली पोळी भाजून घेण्याची अहमहमिका सध्या सुरू आहे. आपणच काय ते नैतिकतेचे ठेकेदार! इतर सारे भ्रष्ट, स्वार्थाध, देश बुडवायला निघालेले, लोकांना लुबाडणारे असं चित्र निर्माण केलं जात आहे. ही उन्मादी मंडळी ‘जितं मया’च्या घोषात आपल्या राष्ट्रप्रेमाचे आणि इतरांच्या राष्ट्रद्रोहाचे ढोल पिटत गावगन्ना फिरताहेत. स्वाभाविकपणेच या धर्माध व कथित राष्ट्रवादाने भारलेल्या वातावरणाचे पडसाद समाज, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रांत न उमटले तरच नवल. मात्र, अजून खूप उघडपणे हे कलाक्षेत्रात घडत नाहीए, इतकंच. हे सारं रामायण (!) लावायचं कारण : प्रसाद दाणीलिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘अर्धसत्य’ हे नाटक! नावाप्रमाणेच ते अर्धसत्य मांडणारं आहे. किंबहुना, यातली नाटककर्त्यांची राष्ट्रप्रेम वगैरेबद्दलची भूमिकाही काहीशी गोंधळीच आहे. कारण या नाटकाचा नायक इन्स्पेक्टर दिगंबर गोडसे याची पत्नी मूळची मुस्लीम आहे. तिच्या चांगुलपणाची भलामण करताना गोडसे अशा आशयाचं एक विधान करतो की, ‘ती जन्माने मुसलमान असली तरी कर्मानं हिंदू आहे.’ म्हणजे नेमकं काय? या विधानाचे दोन अर्थ निघतात. एक म्हणजे हिंदूच फक्त चांगले असतात! किंवा मग दुसरा बरोबर याच्या उलट अर्थ : धर्म कुठलाही असो; ती व्यक्ती आचारविचारांनी कशी आहे यावर तिचं चांगुलपण आणि माणूसपण ठरत असतं. इथं मात्र आपल्या नायकाने त्याच्या ‘राष्ट्रवादी’ विचारांशी काहीशी फारकत घेतलेली दिसते. परंतु ही परस्परविरोधी शेरेबाजी नाटककर्त्यांच्या लक्षात आलेली दिसत नाही. असो.

हे नाटक एका हादरवणाऱ्या घटनेभोवती फिरतं. मुंबईतील काळाचौकी पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर दिगंबर गोडसे याने त्याच्या कस्टडीत असलेला खतरनाक पाकिस्तानी अतिरेकी अहमद खान याला भावनिक प्रक्षोभाच्या भरात गोळ्या घालून ठार केलेलं असतं. अहमद खानने भायखळ्यात केलेल्या दहशतवादी हल्ल्यात २२ निरपराध व्यक्तींनी प्राण गमावलेले असतात. मात्र, अहमद खानला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं असतं. त्याच्यावर रीतसर खटला सुरू असतो. गोडसेने त्याला गाळ्या घालून पाकपुरस्कृत दहशतवादाचा महत्त्वाचा पुरावाच एका अर्थी नष्ट केलेला असतो. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा उघड करण्याची नामी संधी भारताने गमावलेली असते.

rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
maharashtra political crisis
चावडी :  १५० किलोंचा पैलवान !
Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण
rashtriya swayamsevak sangh, ideology
‘राष्ट्र निर्माण’ हे संघाचे ध्येय आहे… पण कसे राष्ट्र?
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
shahajibapu patil
उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून पन्नास खोके मिळाल्याचे सांगावे, शहाजीबापू पाटलांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित

या घटनेतील आरोपी दिगंबर गोडसे याची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून शेखर इनामदार हे आयबी ऑफिसर मुंबईत येतात. दरम्यान, गोडसेच्या या कृत्याचे कथित राष्ट्रवादाने भारलेल्या लोकांनी उन्मादी स्वागत केलेले असते. आपल्या देशावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला दीर्घकाळ पोसून, त्याच्या सुरक्षेवर करोडो रुपये खर्च करून त्याचे नको इतके चोचले पुरवले जाताहेत अशी समजूत झाली असल्याने गोडसेने योग्य तेच केले अशी या लोकांची भावना असते. पण त्याचवेळी गोडसेने अहमद खानला मारून देशाची पंचाईत केलेली असते याचे कुणाला सोयरसुतक नसते. या पाश्र्वभूमीवर चौकशीसाठी आलेल्या इनामदारांना लोकभावनेच्या क्षोभाला सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे तर ज्या काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये गोडसे कार्यरत होता तेथील पोलीस कर्मचारीही त्याचे समर्थन करतात. कायद्याचा भक्षक असूनही त्यांच्या लेखी गोडसे देशभक्त ठरतो. अशा वातावरणात इनामदार गोडसेच्या चौकशीस प्रारंभ करतात. गोडसे मात्र आपण जे केले ते योग्यच असून त्यातून आपली देशभक्ती सिद्ध होते असं स्वसमर्थन करतो. या कृत्यास आपला भावनोद्रेकही कारणीभूत ठरल्याचे तो सांगतो. मात्र, त्याबद्दल अधिक काही सांगण्यास तो नकार देतो. एकीकडे लोकांचा गोडसेला वाढत चाललेला पाठिंबा आणि दुसरीकडे राजकीय नेतृत्वाचा प्रचंड दबाव यास तोंड देत इनामदार आपली चौकशी जारी ठेवतात. यथावकाश गोडसे आपल्या कृत्यामागचं खरं कारण काय, हे सांगून टाकतो. ते व्यक्तिगत निघतं. या कृत्यामुळे लोकांमध्ये गोडसेला नायकत्व प्राप्त होण्याची शक्यता दिसत असल्याने विद्यमान राजकीय नेतृत्व कमालीचं अस्वस्थ होतं. आपल्या सत्तेस नवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता त्यांना त्यातून दिसते. अखेरीस व्यवस्थेच्या चौकटीत गोडसेचा आवाज कायमचा बंद केला जातो.

लेखक प्रसाद दाणी यांना या नाटकातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, कशाचे समर्थन करायचे आहे, ते उघडच आहे. कथित राष्ट्रवादाचा हिरीरीने पुरस्कार करताना ते गोडसेच्या तोंडी गांधीजींना कमी लेखणारंही एक विधान घालतात : ‘देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांऐवजी एक थेंबही रक्त न सांडणाऱ्याला आपल्याकडे राष्ट्रपिता म्हणवलं जातं..’ हे ते विधान. नथुरामी प्रवृत्तीचंच ते द्योतक आहे. (दिगंबर गोडसे असं नायकाचं नाव ठेवताना लेखकाला नथुरामचं उदात्तीकरणच अपेक्षित असावं.) यातून एकच दिसतं, की एकतर लेखकाचा इतिहासाचा अभ्यास कच्चा असावा, किंवा मग त्यांना आपल्याला हवा तसाच इतिहास मांडायचा असावा. अन्यथा गांधीजींबद्दलचा असा बादरायण संदर्भ ते नाटकात आणते ना! त्यासाठी त्यांनी आधी इनामदारांच्या तोंडी गांधीजींच्या सहिष्णुतेचा उल्लेख बुद्धय़ाच आणला आहे. हे दोन्ही संदर्भ नाटकात गैरलागू आहेत. पुढे आपलं म्हणणं काहीसं सावरून घेताना गोडसे म्हणतो, ‘आज भ्रष्टाचारी, काळेधंदेवाले, बेकायदा कृत्ये करणाऱ्यांच्या हातीही गांधींचीच मुद्रा असलेल्या नोटा असतात.’ आता यात गांधीजींचा काय दोष? गोडसेचं हे म्हणणं जगातील अन्य राष्ट्रांतील चलनांनाही लागू पडतं. एकुणात काय, तर सध्या देशातल्या कथित राष्ट्रवादाच्या ज्वराची लागण लेखकासही झालेली आहे, हे निर्विवाद. असो.

नाटकात नाटय़पूर्णता येण्याकरता तोडीस तोड व्यक्तिरेखांतील वा घटना-प्रसंगांमधील संघर्ष गरजेचा असतो. इथे गोडसेला ‘हीरो’ बनवून समोर इनामदारांचं बुजगावणं उभं केलं गेलं आहे. त्यांना संहितेत इतकं कमकुवत ठेवलं गेलं आहे, की हा सामना एकतर्फी व्हावा अशीच चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, दीपक करंजीकर (आयबी अधिकारी इनामदार) यांनी आपल्या हाती असलेल्या तुटपुंज्या साधनांनिशी प्रयोगात एका कर्तव्यकठोर, भावनाशून्य अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत ताकदीनं निभावली आहे.

दिग्दर्शक कुमार सोहोनी हे क्षोभनाटय़ आकारण्यात माहीर आहेतच. त्यांनी उपलब्ध संहितेच्या कक्षेत ही कामगिरी चोख बजावली आहे. प्रेक्षकांना भावोद्दिपित करून त्यांचं रंजन करण्यात त्यांनी कसलीच कसर ठेवलेली नाही. नेपथ्यकार सुनील देवळेकर यांनी उभारलेलं पोलीस स्टेशन वास्तवदर्शी आहे. श्रद्धा कुमार यांची प्रकाशयोजना व अशोक पत्कींचं पाश्र्वसंगीत आघाती नाटय़ाची मागणी पुरवणारं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या प्रचलित प्रतिमेस तडा जाऊ नये याची खबरदारी घेत इन्स्पेक्टर दिगंबर गोडसेची ‘लार्जर दॅन लाइफ’ देशभक्त ही प्रतिमा साकारली आहे. टाळीबाज संवादफेक, वावरण्यातील शैलीदारपणा, विरामाच्या हिशेबी जागी यांचा सढळ वापर त्यांनी केला आहे. चौकशी अधिकारी शेखर इनामदारच्या भूमिकेत दीपक करंजीकर सर्वार्थानं शोभले आहेत. आपल्या व्यक्तिरेखेचा गाभा त्यांना सापडला आहे. त्यांची देहबोली, पोलिसी खाक्याचा थंडपणा, मधूनच आरोपीचा थरकाप उडवणारा गौप्यस्फोट, व्यवस्थेच्या चौकटीत काम करताना होणारी घुसमट, क्षुद्र राजकीय नेतृत्वाच्या तालावर नाचताना होणारी कोंडी आणि त्यांची गोठवणारी शेवटची कृती.. या साऱ्या भावावस्था, ताणतणाव त्यांनी समर्थपणे अभिनित केले आहेत. प्रसाद दाणींनी गोडसेचा खाकी वर्दीतील सहानुभूतीदार मित्र इन्स्पेक्टर राणे आणि पाकपुरस्कृत दहशतवादी सय्यद या दोन्ही भूमिका उठावदार केल्या आहेत. विशेषत: इन्स्पेक्टर राणेंची तगमग त्यांनी प्रभावीरीत्या व्यक्त केली आहे. गोडसेभक्त उद्धट हवालदार जाधव- गौरीश शिपूरकर आपलं ‘माइलेज’ पूर्णपणे वसूल करतात. गोडसेची प्रेमळ, तितकीच करारी पत्नी मधुरा.. सरिता मेहेंदळे यांनी उत्तम साकारली आहे.

ज्यांना कथित राष्ट्रवादाचा उन्माद अनुभवायचा असेल त्यांना ‘अर्धसत्य’ नक्की आवडेल. ज्यांना त्यातलं वैय्यथ्र्य अनुभवायचं असेल, त्यांनीही नाटक पाहायला हरकत नाही.