देशात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने काही क़डक निर्बंध लावले आहेत. वैद्यकीय सुविधांवरचा ताणही वाढला असून काही सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशा कठीण परिस्थिती लोकांनी घराबाहेर पडू नये, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन समाजातील अनेक घटकांकडून वारंवार करण्यात येत आहे. गायक अरिजित सिंगनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अरिजितने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्याने आपली ही पोस्ट इंग्रजी आणि हिंदीतही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अरिजितने आपल्या चाहत्यांना प्रार्थना करण्यास सांगितली आहे. तो म्हणतो, मी कायम मनात ही प्रार्थना करत आहे की काहीही करुन आपण ही लढाई जिंकायलाच हवी. अशा पद्धतीने लोकांचा जीव जाणं योग्य नाही. मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आवाहन करतो की तुम्हीही माझ्यासोबत प्रार्थना करा”.
I have been Been praying continuously with one focus in mind.
We should win this battle.No more people should pass…
Posted by Arijit Singh on Thursday, April 22, 2021
“यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा वेळ देण्याची गरज नाही. तुम्ही जे काही करत आहात ते सुरु ठेवून फक्त माझ्यासोबत प्रार्थना करा. सामूहिक प्रार्थनेचा जास्त ताकदीची असते. कितीतरी जीवांचं रक्षण करण्याची ताकदही त्यात असते. हे परमेश्वरा, आता एकही श्वास या महामारीमुळे थांबता कामा नये. सध्या ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या सर्व गोष्टी आपल्याला मिळोत.
“चाचण्या, चाचण्यांचा अहवाल, दवाखाने, बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन, औषधे, आयसीयू, डॉक्टर, नर्सेस आणि एकमेकांसाठीची सहानभूतीची भावना…अशा सर्व गोष्टी!”
त्याने आपल्या चाहत्यांना विनाकारण घराबाहेर न पडण्याची विनंतीही केली आहे. तसंच सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचंही आवाहन त्याने केलं आहे. तब्येतीची काळजी घेण्यासाठी त्याने काही टीप्सही शेअर केल्या आहे. व्यवस्थित खाणंपिणं, योगाभ्यास, नियमित झोप, वाचन, शारिरीक आणि मानसिक खेळ असे उपायही त्याने सांगितलं आहेत. त्याचसोबत त्याने रविंद्रनाथ टागोरांच्या ओळीही शेअर केल्या आहेत.
त्यावर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या विचारांना सहमती दर्शवली आहे आणि प्रार्थना करणास असल्याचंही कमेंट्समध्ये सांगितलं आहे.