एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची, त्याच्या कामाबद्दलची प्रशंसा करणं ही दोन्ही कलाकारांसाठी तशी सुखावणारीच बाब आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी आपल्या आवडत्या कलाकारांचे आणि त्यांच्या कामाचं कौतुक करत असतात. अशातच बॉलीवूडचा सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक अरिजीत सिंहने (Arijit Singh) एका मराठी अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. अरिजीतने गाणं गाता गाता या अभिनेत्याचं कौतुक केलं आहे आणि हा अभिनेता म्हणजे शरद केळकर (Sharad Kelkar).
अभिनेता शरद केळकरने आजवर अनेक बॉलीवूड व मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांकडून शरदच्या कामाचे कौतुक किंवा प्रशंसा होतच असते. मात्र नुकतंच अरिजीतने शरद केळकरचं कौतुक केलं आहे आणि याचा व्हिडीओ अभिनेत्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. अभिनेता शरद केळकर नुकताच अरिजीतच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता.
या लाईव्ह कॉन्सर्टचे काही खास क्षण शरदने त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. यापैकी पहिल्या व्हिडीओमध्ये अरिजीत सिंग गाणं गाता गाता थांबतो आणि शरदचं कौतुक करत त्याला म्हणतो की, “खूप खूप प्रेम भाऊ, इथं आल्याबद्दल धन्यवाद”. यानंतर अरिजीत पुन्हा त्याचं गाणं गाण्यास सुरुवात करतो. शरद व त्याची पत्नी किर्ती दोघांनी अरिजीतच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभाग घेतला असून दोघेही त्याच्या सुरांमध्ये तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अरिजीतने केलेल्या कौतुकाबद्दल शरदनेही त्याला पोस्टद्वारे धन्यवाद असं म्हटलं आहे “अरिजीत सिंह! तू माझा दिवस सार्थकी लावलास. खरंतर माझं वर्ष सार्थकी लावलंस. माझ्या कामाची प्रशंसा केल्याबद्दल धन्यवाद. तुझ्यासारख्या दिग्गज कलाकाराचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याचा अनुभव कमाल होता. तू खरोखरच अद्भुत आहेस”. शरदने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पत्नीसह अरिजीतच्या गाण्याच्या आनंद घेताना दिसत आहेत.
दरम्यान, शरद केळकरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आठ वर्षांनंतर तो छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘तुम से तुम तक’ हिंदी या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शरदबरोबरच अभिनेत्री निहारिका चौकसी मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे शरदच्या या नवीन मालिकेसाठी आणि मालिकेतील त्याच्या नवीन भूमिकेसाठी त्याचे चाहते मंडळी उत्सुक आहेत.