दैदीप्यमान प्राचीन किंवा अर्वाचीन इतिहास नसलेल्या अमेरिका या राष्ट्रतील सिनेकर्त्यांना मात्र अलीकडच्या इतिहासाचे खोदकाम करण्याची मोठी खोड आहे. त्यातही एखादी घटना राष्ट्र किंवा जगव्यापी असली, तर या चित्रकर्त्यांच्या अंगात वारेच संचारते. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा (अनेकदा झालेला) बेछूट गोळीबार, ९/ ११चा दहशतवादी हल्ला आणि या सर्वाहून अधिक परिणाम करणारी आर्थिक मंदी या साऱ्या जगाला परिचित असणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांवर गेल्या दोन दशकांमध्ये कैक चित्रपट दाखल झाले आहेत. या घटनांचे सूक्ष्मदर्शी वार्ताकन आणि रिपोर्ताज यांचा आधार घेऊन आलेले चित्रपट नजीकच्या इतिहासातील प्रत्येक घटनेचे स्मरणरंजन करण्याऐवजी त्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन प्रेक्षकांमध्ये तयार करतात. अमेरिकेत परतफेडीची ऐपत नसताना दिल्या गेलेल्या गृहकर्जातून कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचे कैक कंगोरे ‘द बिग शॉर्ट’, ‘इनसाइड जॉब’, ‘वॉल स्ट्रीट: मनी नेव्हर स्लीप्स’सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमधून आणि शेकडो माहितीपटांमधून आले आहेत. ब्लॉकबस्टरी आवाका नसूनही केवळ वेगवान मनोरंजन मूल्यांमुळे गतदशकातील मंदीच्या इतिहासावरच्या चांगल्या चित्रपटांपैकी एक म्हणून त्याची निवड करता येईल.

अ‍ॅरिझोनाचा सारा डोलारा हा कोसळलेल्या अर्थव्यवस्थेनंतरच्या काही महिन्यांमधील घर व्यवसाय क्षेत्राला लागलेल्या घरघरीवर उभा आहे. दुप्पट किंमत येईल म्हणून कर्ज काढून घर खरेदी करण्याच्या नादातून तयार झालेली अ‍ॅरिझोनामधील दूरवर भागातील आलिशान संकुले वाळवंट बनण्याकडे प्रवास करत असताना यातील गोष्ट सुरू होते. घरे विकण्याच्या व्यवसायात असलेली केसी  (रोझमेरी डीविट) हार्डिग नावाच्या दूर वसलेल्या शहरात एका जोडप्याला आवाढव्य बंगल्यातील सुख-सोयींनी संपूर्ण असलेल्या घराची माहिती देताना चित्रपट सुरू होतो. तिरकसपणे चाललेल्या त्यांच्या संभाषणाला आणखी वाकडे वळण लागते. शेजारच्याच घरामध्ये आत्महत्येचा प्रयत्न उलथवून टाकण्यासाठी केसीला उपस्थित राहावे लागते. आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आलेली व्यक्ती मरणयाचना का करीत आहे, हे थोडय़ाच दृश्यांमध्ये घराघरांवर लागलेल्या फलकांवरून लक्षात येते आणि प्रेक्षक या आकर्षक आरंभाने पुरता प्रभावित होतो.

अ‍ॅरिझोना हा जराही गंभीर चित्रपट नाही. तो या मंदीच्या काळाकडे आणि वर उसळी घेणाऱ्या घर उद्योगाने गाठलेल्या तळामुळे आर्थिक आणि मानसिकदृष्टय़ा भरकटलेल्या माणसांचे प्रातिनिधिक चित्र मांडतो. इथल्या सगळ्या व्यक्तिरेखांना मंदीचा प्रचंड फटका बसलेला दिसतो. घर विकण्याच्या उद्योगात असलेल्या केसीला आपल्या घराचे कर्जहप्ते भरण्याची अडचण आहे. बँकांचा ससेमीरा टाळण्यात ती वाकबगार असली, तरी त्यातून सुटका नाही, याची तिला कल्पना आहे. पूर्वाश्रमीच्या प्रियकराची मदतीची इच्छा नाकारून ती आपल्या मुलीसह सुखात असल्याचे त्याला भासवत राहते.

घरांच्या कोसळलेल्या किमतींमुळे एके दिवशी केसीच्या ऑफिसात भांडायला सॉनी (डॅनी मॅकब्राइड) नावाची व्यक्ती दाखल होते. दोन वर्षांत घरांची किंमत दामदुप्पट होईल, या कंपनीच्या मालकाच्या भाकितावर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे गुंतवलेले पैसे मातीमोल झाल्याबद्दल तो केसीच्या बॉसला फैलावर घेतो. या दोघांमध्ये हिंदीमधील ‘तेरेको क्या-तेरेको क्या’ छापाचे भांडण सुरू असते. मात्र त्याचे पर्यवसान केसीच्या बॉसचे (अत्यल्प काळातील भूमिकेत विनोदवीर सेट रोगन) अपघाताने कठडय़ावरून पडून मृत्यूत होते.

कर्जबाजारीपणामुळे आधीच भैसटलेला सॉनी आपल्यामुळे घडलेल्या या हत्येमुळे आणखी बिथरतो. पोलिसांनी आपल्याला पकडल्यानंतर आपल्या पत्नी आणि मुलांचे काय होणार, या जाणिवेने तो या घटनेची एकमेव साक्षीदार असलेल्या केसीचे अपहरण करतो. केसी सुरुवातीला घरविक्री करीत असते, त्याच संकुलामधील एका प्रशस्त घरात कोंडून ठेवतो. खुनाचा गुन्हा दडवायला जाण्याच्या अट्टहासातून नवनवे गुन्हे सॉनीच्या हातून घडत जातात आणि परिस्थिती न सावरण्याइतकी बिकट होऊन जाते.

चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे यात कुणीही नायक नाही. पण खलनायक मात्र आर्थिक संकट आहे. इथे सॉनीची व्यक्तिरेखा नायक आणि खलनायक यांच्या अधल्या-मधल्या अवस्थेत बेतली आहे. पण त्याच्या झालेल्या मानसिक अध:पतनास घर घरघर कारणीभूत असली, तरीही तो प्रेक्षकांची सहानुभूती मिळवू  शकत नाही. पापभीरू माणसांचा पाय गुन्ह्य़ात अडकला, तर ते निष्णात गुन्हेगारांना लाजविणारे कृत्य कसे करू शकतात, याचा दाखला डॅनी मॅकब्राइडने वठविलेल्या व्यक्तिरेखेतून दिला आहे.

अपहरणासारखे कृत्य विनोदाचा धारदार वापर करून येथे सादर करण्यात आले आहे. लोकांना विकण्यासाठी घरे दाखविणाऱ्या केसीला बंधक अवस्थेत ठेवून सॉनी आपल्या संपूर्ण घराचे दर्शन घडवून आणणारा प्रसंग किंवा केसीसह तिच्या मुलीला ठार मारण्याच्या एका प्रयत्नात पाठीत चमक भरल्याने होणारी सॉनीची दशा म्हणजे तिरकसपणाचा कहर आहे. ठासून भरलेला काळा विनोद आणि केसी आणि सॉनी यांच्यातील उंदरा-मांजराचा खेळ निव्वळ हाय-व्होल्टेज मनोरंजन आहे.

आकडय़ांना आणि अर्थव्यवस्थेच्या किचकट कल्पनांना सोप्या भाषेत भांडणाऱ्या अमेरिकी मंदींवरच्या इतर सिनेमांपेक्षा इथल्या मनोरंजनाचे स्वरूप आणि धार पूर्णपणे भिन्न आहे.