अभिनेता अर्जुन कपूर बॉलिवूडच्या उत्तम अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. अर्जुनने २०१२ मध्ये परिणिती चोप्रासह ‘इश्कजादे’ चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. अर्जुन कपूर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो आणि त्याचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. अर्जुन कपूर नेहमीच एखाद्या विषयावर आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. बिनधास्त स्वभाव आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जाणाऱ्या अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड चित्रपटांच्या विरोधात सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर संताप व्यक्त केला आहे.
आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ या चित्रपटांच्या विरोधात सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’ ट्रेंड सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा होताना दिसत आहे. नुकतंच ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुनच्या मते आता या सर्व गोष्टींचा अतिरेक होत आहे. अर्जुन म्हणाला, “मला वाटतं आम्ही याबाबत गप्प राहून चूक केली आहे. आम्ही शांत राहिलो याचाच लोकांनी जास्त फायदा घेतला आहे.”
आणखी वाचा- शहनाझ गिल पुन्हा प्रेमात? ‘या’ अभिनेत्याशी जोडलं जातंय नाव
अर्जुन कपूर पुढे म्हणाला, “आम्ही असा विचार केला की, भविष्यात आमचं काम बोलेल. पण इथेच चूक झाली. आपल्याला माहीत असतं की प्रत्येक वेळी आपले हात खराब करण्याची गरज नसते. पण मला वाटतं आम्ही आतापर्यंत खूप सहन केलं आहे. आता लोकांना याची सवय झाली आहे आणि या सगळ्याचा आता अतिरेक होत आहे. हे फार चुकीचं आहे. इंडस्ट्रीतील लोकांनी आता याबाबत खरंच काहीतरी करण्याची गरज आहे.”
आणखी वाचा- “…म्हणून मलायकाशी अफेअर असल्याचं सर्वांपासून लपवलं” अर्जुनने केला मोठा खुलासा
दरम्यान अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसला होता. आगामी काळात त्याचे ‘कुत्ते’ आणि ‘द लेडी किलर’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.