इसकजादे, औरंगजेब, गुंडे, टू स्टेट्स या चित्रपटांतून आपले अभिनयाचे नाणे खणखणीतपणे वाजवणारा अर्जुन कपूर व्यक्तिगत जीवनात तसा लाजाळू मुलगा. त्यामुळेच तो सतत माध्यमांपासून दूर राहण्यास पसंती देतो. तर मग समाजमाध्यम अर्थात सोशल मीडिया तर अर्जुनसाठी दूरचीच गोष्ट. अर्जुन ना फेसबुकवर ना ट्विटरवर. मात्र, आता अर्जुनने ट्विटरवर दमदार आगमन केले आहे. आणि १४० शब्दांच्या या ‘टेक्स्ट बॉक्स’वर त्याचे दणदणीत स्वागत झाले आहे. अर्जुनच्या या टिव टिवाला कारणीभूत ठरलीय त्याची लाडकी बहीण अंशुल! तिच्याच आग्रहाखातर अर्जुनने ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे.
प्रत्येक चित्रपटागणीक अर्जुनच्या चाहत्यांमध्ये वाढ होत होती. असे असताना हा पठ्ठय़ा मात्र मागे मागे राहात होता. म्हणूनच अंशुलने भय्या अर्जुनकडे निदान ट्विटर अकाऊंट तरी सुरू करण्याचा आग्रह धरला. लाडकी बहीण असल्याने अर्जुनलाही तिचा हा आग्रह मोडवेना. अखेर अंशुलच्या मदतीने त्याने ट्विटर अकाऊंट सुरू केले. आणि काय आश्चर्य त्याच्या सहकलाकारांनी तर त्याचे जंगी स्वागत केलेच शिवाय चाहत्यांनीही तातडीने अर्जुनला फॉलो केले! गुंडे चित्रपटातला त्याचा सहकलाकार रणवीरसिंग याच्याशी त्याची कट्टी असल्याचे बोलले जात होते. मात्र, रणवीरनेच ‘ब्रेड का बादशाह.. ऑम्लेट का राजा. महापुरूष अर्जुनचे स्वागत’, अशा शब्दांत त्याचे स्वागत केले आहे. ‘गुंडे’तला त्यांचे एकत्र छायाचित्रही त्याने ट्विटरवर टाकले आहे.
टू स्टेट्समधली त्याची सहकलाकार आलिया भट्ट हिनेही अर्जुनला ट्विटरवर आल्याबद्दल बधाई दिली आहे. करण जोहर, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, अभिषेक बच्चन, वरुण धवन, सोनम कपूर, रितेश देशमुख सगळ्यांनी अर्जुनवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे, अर्जुनवरून सध्या जी काही चर्चा होत होती त्याला तरी या प्रतिक्रियांनी विशेषत: रणवीर आणि अलियाच्या ट्विट्सनंतर पूर्णविराम मिळाला आहे.
अर्जुन कपूरची टिव टिव सुरू
इसकजादे, औरंगजेब, गुंडे, टू स्टेट्स या चित्रपटांतून आपले अभिनयाचे नाणे खणखणीतपणे वाजवणारा अर्जुन कपूर व्यक्तिगत जीवनात तसा लाजाळू मुलगा.
First published on: 27-06-2014 at 06:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoor on twitter