मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मागच्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१९ मध्ये पहिल्यांदा या दोघांनी सोशल मीडियावरून या नात्याची जाहीर कबुली दिली होती. मागच्या काही दिवसांपासून हे दोघंही या वर्षाच्या शेवटी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. हे लग्न कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थित पार पडणार असल्याचंही बोललं जात आहे. या चर्चांवर आता अर्जुन कपूरची प्रतिक्रिया आली आहे.
मागच्या काही दिवसांपासून लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत असलेल्या अर्जुन कपूरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लग्नाच्या चर्चांचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र त्याचा रोख या चर्चांकडे असल्याचं बोललं जात आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करताना लिहिलं, ‘मी या गोष्टीच्या प्रेमात पडलोय की, लोकांना माझ्यापेक्षा जरा जास्तच माझ्या आयुष्याबद्दल माहीत आहे.’
आणखी वाचा- अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात, समोर आला लग्नाचा पहिला फोटो
सूत्रांकडून माहितीनुसार, अर्जुन आणि मलायका यांनी आपल्या नात्यात आणखी पाऊल पुढे टाकत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघंही या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हे दोघंही सप्तपदी घेणार असल्याची चर्चा सुरू आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आणखी वाचा- Video: चुलीवरचं जेवण अन् नाना पाटेकरांनी वाढलेली थाळी, राहुल देशपांडेंनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
मलायका आणि अर्जुन नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल बिनधास्तपणे बोलताना दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मलायका अरोरानं अर्जुनचं खूप कौतुक केलं होतं. लग्नाच्या चर्चांबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, ती आणि अर्जुन कपूर यावर विचार करत आहेत. दरम्यान दोघांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. मलायका ४८ वर्षांची आहे तर अर्जुन ३६ वर्षांचा आहे.