मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांची लव्हस्टोरी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. लग्नानंतर १९ वर्षांनी अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायकानं काही वर्षांतच अर्जुन कपूरसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. २०१९ मध्ये सोशल मीडियावरून या दोघांनीही आपल्या नात्याचा खुलासा केला होता. नुकताच अर्जुनचा आगामी चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या निमित्तानं दिलेल्या एका कार्यक्रमात अर्जुननं मलायकासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. या मुद्द्यावरून या दोघांना नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आहे. नुकतंच ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात बोलताना अर्जुन म्हणाला, “तुमच्या कहाणीमध्ये कधी तुम्हाला हिरो व्हावं लागतं तर कधी व्हिलन. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम करता तेव्हा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यातले हे परिणाम वेगवेगळे असतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा ते प्रामाणिक असावं असा तुमचा हट्ट असतो. त्यामुळे कधी तुम्ही एका बाजूने एका व्यक्तीसाठी हिरो असता तर दुसऱ्या व्यक्तीसाठी व्हिलन ठरता.” अर्जुनच्या या प्रतिक्रियेचा संबंध सध्या त्याच्या खासगी आयुष्याशी जोडला जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्याच्या ३७ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पॅरिस व्हेकेशनला गेले होते. या व्हेकेशनचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. याशिवाय अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पाटनी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.