मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगितले आहे. गँगस्टर ते नेता असा प्रवास असलेल्या अरुण गवळीबरोबरच्या त्याच्या भेटीसंदर्भात पोलिसांकडून त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे समजते. चौकशीसाठी हजर राहाण्याचे पत्र अर्जुन रामपालला पाठविण्यात आले असून, अद्याप त्याने पत्राला उत्तर न दिल्याचे पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले. या संदर्भात बोलताना जे. जे. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल मादवी म्हणाले की, आम्हाला अलीकडेच या दोघांच्या भेटीविषयी समजले असून, संबंधित माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे. या भेटीबाबतच्या चौकशीसाठी लवकरात लवकर पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश गेल्या आठवड्यात एका पत्राद्वारे अर्जुनला देण्यात आले आहेत. अर्जुनच्या घरी पाठविण्यात आलेले हे पत्र त्याच्या पत्नीने स्विकारले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. याच विषयी माहिती देताना अन्य एक पोलिस अधिकारी म्हणाले की, अर्जुनकडून पत्राला प्रतिसाद न आल्यास काही दिवस वाट पाहून याबाबत आठवण करून देणारे आणखी एक पत्र त्याला पाठविण्यात येईल. संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगिशीवाय कोणत्याही कैद्याला भेटण्याची अनुमती नसल्याचेदेखील या अधिकाऱ्याने सांगितले.
‘डॅडी’ या आगामी चित्रपटात अरुण गवळीशी साधर्म्य असलेली व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अर्जुनने २८ डिसेंबरला जे. जे. रुग्णालयात अरुण गवळीची भेट घेतली होती. अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका हुबेहुब साकारता यावी, यासाठी अरुण गवळीचे व्यक्तिमत्व जवळून जाणून घ्यावे, या उद्देशाने अर्जुनने अरुण गवळीची भेट घेतल्याचे सुत्रांकडून समजते. २००७ साली झालेल्या कमलाकर जामसंडेकर या नगरसेवकाच्या खुनाच्या संदर्भात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Story img Loader