बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल याने कहानी २ चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण केले असून तो आता मुंबईत परतला आहे. या चित्रपटानंतर अर्जुनने लगेचचं आगामी डॅडी या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केलीयं. डॅडी चित्रपट कुख्यात गुंड अरुण गवळीच्या जीवनावर आधारित असून अर्जुन हा गवळीच्या भूमिकेत दिसेल.
या चित्रपटातील अर्जुनच्या लूकबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात होती. पण दक्षिण मुंबईत अर्जुन चित्रपटाचे चित्रीकरण करत असतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात अरुण गवळीचा हुबेहुब लूक असलेला अर्जुन पाहावयास मिळतो. पांढरा सदरा, डोक्यावर टोपी आणि गवळींप्रमाणेच मिश्या असा अर्जुनचा लूक आहे. इटलीतील रंगभूषाकाराने अर्जुनच्या रंगभूषेचे काम हाती घेतले आहे.
सर्वप्रथम मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने अर्जुनचा अरुण गवळींच्या लूकमधील फोटो प्रदर्शित केला.  या चित्रपटाच्या सेटवरील सूत्रांनी मिररला दिलेल्या माहितीनुसार, डॅडी चित्रपटाचा बहुतांश भाग चित्रीत झाला आहे. अंधेरी वर्सोवा येथील भागात नुकतेच याचे चित्रीकरण झाले. अर्जुनचा लूक कुठेही लीक होऊ नये म्हणून चित्रपटाच्या सेटवर सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले होते. महिन्याभरात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्यात शक्यता वर्तविण्यात येतेय. दाक्षिणात्य अभिनेत्री ऐश्वर्या राजेश ही या चित्रपटात अरुण गवळीच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

Story img Loader