टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर अडचणीत सापडली आहे. बेगुसराय कोर्टाने एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. एकता कपूरच्या वेब सीरिज थ्री एक्सच्या दुसऱ्या पर्वामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांबाबत आक्षेप घेण्यात आला होता. एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्यावर सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप करत गेल्या वर्षी बिहारच्या बेगुसराय न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वेब सीरिजमध्ये अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती. त्यामध्ये सैनिकांच्या पत्नींशी संबंधित आक्षेपार्ह दृश्यही होते. वेब सीरिजमधील एका दृश्यात, जेव्हा भारतीय जवान ड्युटीवर असतो, तेव्हा त्याची पत्नी लष्करी गणवेश घालून मित्रांबरोबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आली होती. याप्रकरणी गेल्या वर्षी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरुद्ध बिहारच्या बेगुसरायमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी बेगुसराय कोर्टाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांना समन्स बजावून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, बेगुसरायचे वकील हृषिकेश पाठक यांनी सांगितलं की, ही वेब सिरीज एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी रिलीज केली होती. यामध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांबद्दल व त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. एक्स-सर्व्हिसमेन सेलचे शंभू कुमार यांनी या वेब सीरिजच्या सीन्सबाबत बेगुसराय कोर्टात केस दाखल केली होती. हे प्रकरण राजीव कुमार यांच्या न्यायालयामार्फत विकास कुमार यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले आणि तिथून हे अटक वॉरंट जारी करण्यात आले.

रिपोर्ट्सनुसार, एकता कपूरने या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण देत सीरिजमधून सीन हटवल्याची माहिती दिली होती. शिवाय तिने माफीही मागितली होती. एकता कपूरची ही मालिका २०२० मध्ये रिलीज झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest warrant issued against ekta kapoor and shobha kapoor for insulting soldiers sentiments hrc