यंदाच्या ऑस्करसाठी ‘ला ला लॅण्ड’ चित्रपटाला विक्रमी चौदा नामांकने या पुरस्काराचे स्वरूप ठरवून देणारे असले, तरी त्यानंतर मिळालेली सर्वाधिक म्हणजे आठ नामांकने ‘अरायव्हल’ या परग्रहवासींचे अस्तित्व दाखविणाऱ्या विज्ञानपटाला का आहेत, याची कल्पना हा चित्रपट अनुभवताना येऊ शकते. टेड चिआंग या विज्ञान लेखकाच्या ‘स्टोरी ऑफ युअर लाइफ’ नावाच्या गाजलेल्या लघुकादंबरीवर बेतलेला हा चित्रपट कुणालाही परग्रहवासींच्या आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व चित्रपटांपासून पूर्णपणे वेगळा असल्याचे लक्षात येईल. त्यात तथाकथित तबकडय़ांमधून येऊन मानवावर आक्रमण करू धजणारे (इण्डिपेण्डन्स डे) आणि क्रूर रंगविलेले परग्रहवासी नाहीत. वाट चुकून पृथ्वीवर आलेला आणि येथे समाजविलग ठरलेल्या लहान मुलांना मदत करणारा विचित्र शरीराची हतबल व्यक्ती (ई.टी -एक्स्ट्रा टेरेस्ट्रीअल, मॅक अॅण्ड मी, ते ‘कोई मिल गया’पर्यंतचे बाळबोधपट) नाही. कॉलेज कॅम्पसमध्ये अनाकलनीय शक्तींद्वारे भयनाटय़ घडविणारा (फॉकल्टी) छापाचा टीन हॉरर प्रकारही इथे नाही. तुलनाच करायची झाली तर स्टीवन स्पीलबर्गच्या ‘क्लोज एन्काऊण्टर ऑफ थर्ड काईंड’ आणि मनोज नाइट श्यामलनच्या ‘साईन्स’ या चित्रपटांच्या जातकुळीशी त्याचे किंचित साधम्र्य आहे. पण या चित्रपटांप्रमाणे मनोरंजन मूल्यांसह ‘अरायव्हल’मधील वैचारिक पातळी अधिक वरची आहे.
परग्रहवासीयांचे पृथ्वीवर येणे आणि जगाची काळजी करणाऱ्या अमेरिकेने जीगरबाज नायक-नायिकांची फळी घेऊन आपल्या देशाची आणि पर्यायी जगाची सुटका करून देणे, त्यासाठी प्रगत अमानवांशी साग्रसंगीत युद्ध करणे, कथानकामध्ये सेकंदासेकंदाला गिमिक घडवत टोकाच्या क्षणी मानवच कसा श्रेष्ठ अन् सर्वगुणसंपन्न आहे, याच्या टाळीफेक-पैसेवसुली सिनेप्रकाराशी ‘अरायव्हल’ने फारकत घेतलेली नाही. पण इथले खरे युद्ध मानव आणि परग्रहवासी यांच्यातील संवादाचे आहे. तो संवाद करताना मानवी आयुष्याकडे सर्वार्थाने पाहण्याचे इथले कसब या चित्रपटातून प्रत्येकाला काही ना काही देऊ पाहते.
इथले जीगरबाज नायक-नायिका आहेत भाषातज्ज्ञ लुईस बँक्स (अॅमी अॅडम्स) आणि वैज्ञानिक इअन डॉनली (जर्मी रेनर). चित्रपट सुरू होताना लुईस आपल्या मुलीच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूस्मरणाचा दाखला देताना दिसते अन् पुढच्या क्षणाला विद्यापीठात आंतरराष्ट्रीय भाषांबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या क्षेत्रातील परमोच्च ज्ञानवंत असल्याचे आपल्याला कळते. वर्गातील अनाकलनीय भयाबाबत तिच्या मनात निर्माण झालेले कोडे तिने तिथेच सुरू केलेल्या वृत्तवाहिनीमुळे सुटते. अमेरिकेसह जगभरात १२ ठिकाणी परग्रहावरून यानसदृश वस्तू दाखल झाल्यामुळे पृथ्वीवर भयकंप निर्माण झालेला असतो.
पुढल्या काही मिनिटांतच कर्नल वेबर (फॉरेस्ट विटेकर) हा अधिकारी तिच्याकडे दाखल होऊन एक अनाकलनीय ध्वनीफीत तिच्यासमोर धरून त्याचे भाषांतर करण्याचा आग्रह धरतो. या ध्वनीफितीमधील आवाज हा अर्थातच परग्रहवासीयांचा असतो. लुईस त्याबाबत अधिक तपशील मागते. कर्नल आधी तिला धुडकावून लावतो, मग मध्यरात्री तिच्या अंगणात हेलिकॉप्टरसह लुईसला यानाजवळच्या प्रतिबंधित क्षेत्रात न्यायला सज्ज होतो.
इथे इअन डॉनलीशी तिची ओळख होते. परग्रहवासीयांशी संवाद करण्यासाठी थेट यानाच्या आतील भागात दाखल होणाऱ्या निवडक तज्ज्ञ लोकांच्या ताफ्यात हे दोघे अग्रभागी राहतात. लुईसला परग्रहवासीयांशी संवाद साधण्यात सुरुवातीपासून अंधूक यश मिळत राहते. परग्रहवासीयांच्या चिन्हभाषा, संवादाबाबत १०० टक्के चूक किंवा बरोबर असलेल्या आडाख्यांच्या पातळीवर लुईस आणि इअन काम करीत राहतात. पण अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांचा अण्वस्त्रसज्ज समूह याच भाषेचा वेगवेगळा अर्थ लावून या परग्रहवासीयांशी युद्धाची तयारी आखतात. लुईसकडे संवादाचा अर्थ लावण्यासाठी आत्यंतिक कमी वेळ राहतो आणि गोष्टी अवघड होऊन बसतात.
काचेच्या पडद्याआडून लुईसच्या संवादाला प्रतिक्रिया देणारे परग्रहवासी, तिच्या कामातील क्लिष्ट संकल्पना, एकाच वेळी विज्ञानाशी आणि तिच्या भूत-भविष्य- वर्तमानाशी घातलेली वेगवान सांगड यातून चित्रपटाचे कथानक दिग्दर्शक डेनिस व्हिल्नूव्ह यांनी फुलविले आहे. मानवी आयुष्यात संवाद नाते घडवितात तितकेच बिघडवितात. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात सुसंवादाच्या अस्तित्वाची गरज किती, याचा दाखला इथे देण्यात आलेला आहे. त्यासाठी लुईसच्या आयुष्यपटाची उघडझाप परग्रहवासीयांशी संवादयुद्ध करताना कामी येत राहते. मध्यंतरानंतर चित्रपट सुरुवातीच्या निवेदनापासून तयार करीत असलेल्या अनेक कुतूहलांचे शमन करायला सुरुवात करतो. देमारपटाहून मग इथले संवादयुद्ध आवडू लागते.
परग्रहवासीयांच्या पृथ्वीवरील अस्तित्वाद्वारे मानवी आयुष्यावर भरपूर बोलणाऱ्या उत्तम वैज्ञानिकांमध्ये गेल्या वर्षी आलेला जेफ निकोल्सचा अमेरिकी चित्रपट ‘मिडनाइट स्पेशल’, २०११ सालातील नाचो विगलाँडो या स्पॅनिश दिग्दर्शकाचा ‘एक्स्ट्राटेरेस्ट्रियल’ आणि माइक चाहिल या दिग्दर्शकाचा ‘अनदर अर्थ’ हे पाहावेच असे चित्रपट आहेत. माणूस म्हणून जगण्यातील संवादमाहात्म्याच्या जाणिवेची आपली पायरी विस्तारण्यास ‘अरायव्हल’इतकीच मदत ते करू शकतात.