रवींद्र पाथरे

रामायण-महाभारत ही प्राचीन महाकाव्ये भारतीय साहित्याचे दोन मानदंड आहेत. रामायणात काळ्या-पांढऱ्या रंगाची पात्रं आधिक्यानं आहेत. महाभारतात मात्र मानवी वृत्ती-प्रवृत्ती आणि भावभावनांची व्यामिश्र आंदोलनं, नैतिक-अनैतिकतेचे अगणित पेच, मूल्यसंघर्षांची गुंतवळ आणि धर्म-अधर्म संकल्पनांचा परस्परविरोधी कल्लोळ मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे वर्तमान मानवी जीवनातील समस्यांशी साधम्र्य सांगणाऱ्या असंख्य घटना-प्रसंग महाभारतात आढळतात. या अर्थानं महाभारत ही सार्वकालिक कलाकृती ठरते. त्यामुळेच महाभारतातील घटना-प्रसंग तसंच पात्रांच्या वर्तणुकीचं अर्थनिर्णयन, त्यावरील भाष्यं आणि विवेचन-विश्लेषण अनंत काळ सुरू आहे.. आणि दरएक पिढीत ते होत राहणार आहे. यातली पात्रं सुष्ट-दुष्ट अशा दोनच रंगांत रंगवली गेलेली नाहीत. त्यात अनेक करडय़ा छटा आहेत. महाभारतात मर्यादापुरुषोत्तम कुणीही नाही. अगदी कृष्णही. खरं तर तोच अनेक समरप्रसंगांचा रचियेता आणि कर्ताकरविता आहे असं म्हटलं तर ते अनाठायी नाही. कृष्ण सर्वज्ञानी असूनही त्याने महाभारत घडू दिलं. एवढंच नव्हे तर त्यात सक्रीय सहभागही घेतला. तो धर्माच्या आणि सत्याच्या बाजूने उभा राहिला असं जरी चित्र रंगवलं जात असलं तरी ते सर्वस्वी खरं नव्हे. याची वानगीदाखल उदाहरणं महाभारतातील घटनांचं, पात्रांचं स्वरूपनिर्णयन करून प्रसवलेल्या अनेक कलाकृतींतून सापडतात. आणि तर्काधारे ते अर्थनिर्णयन आपल्याला पटतंदेखील. कुरुक्षेत्रावरील र्सवकष युद्धात कृष्ण नैतिकतेनं वागला असं अनेक प्रसंगांत आढळत नाही. तो पांडवधार्जिणा होता. अर्धमाच्या आधारे कौरवांच्या अनेक रणधुरिणांना धारातीर्थी पाडण्यात त्याने कळीची भूमिका बजावली. स्वत: युद्धात न उतरता पांडवांकरता युद्धाचे डावपेच आखण्यात त्याने आपलं सारं बुद्धीकौशल्य खर्च केलं. त्यासाठी त्याने त्याची कथित कृष्णनीती वापरली. जी काही वेळा अधर्मीपणाकडे झुकलेली होती. म्हणूनच कुरुक्षेत्रावरील भीषण नरसंहारापश्चात गांधारीसह अनेकांनी कृष्णालाच दोष दिलेला आहे. असो.

Dabeli recipe at home easy way of making dabeli trending now
घरच्या घरी झटपट करा चविष्ट ‘दाबेली’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Art and Culture with Devdutt Pattanaik | What sculptures tell us about Indian culture
UPSC Essentials:हडप्पा ते चोल कालखंड: भारतीय शिल्पकृती इतिहास कसा उलगडतात?| देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती
loksatta chaturang Happiness Thomas Hobbes philosophy advertisers
जिंकावे नि जगावे : आनंदाचे डोही
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
book review my journey in lyrics and music memoir of syed aslam noor
 ‘पॉपी’ पर्वाचे पुराण…
Pune Kasba Peth Ganesha Temple Gundacha Ganpati
Pune : कसबा पेठेतील ‘या‘ मंदिराबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या प्रसिद्ध मंदिराची रंजक गोष्ट
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास

हे सारं रामायण- नव्हे महाभारतायण लावण्याचं कारण- प्रा. वसंत देवलिखित ‘अरण्य-किरण’ हे काव्यमय नाटक! खरं तर मूळातली ती एक दीर्घकविता आहे. पं. सत्यदेव दुबे यांनी तीवरील रंगाविष्कार यापूर्वी सादर केला होता. आता ‘आविष्कार’तर्फे दिग्दर्शक अजित भगत यांनी ते पुनश्च मंचित केलं आहे. ‘अरण्य-किरण’ हे नाटक म्हणजे महाभारतकालीन पात्रांनी कृष्णनीतीची केलेली चिरफाड आहे. या तक्रारदारांत नंद आहे. रुक्मिणी आहे. गांधारी आहे. बलराम आहे. या सर्वाची कृष्णाबद्दल जोरदार तक्रार आहे. त्याने आपल्यावर अन्याय केला अशी त्यांची ठाम भावना आहे. त्याच्यामुळेच आपण उद्ध्वस्त झालो अशी त्यांची समजूत आहे. त्याबद्दल ते त्याला धिक्कारतात. आपले शंभर पुत्र कुरुक्षेत्रावर गमावणाऱ्या गांधारीला कृष्णाचा सर्वनाश व्हावा असं तळतळून वाटतं. ती त्याला तसा शापही देते. कृष्णाची धर्मपत्नी असूनही त्याने आपल्यावर कधीच प्रेम केलं नाही, आपण कायम उपेक्षित राहिलो ही रुक्मिणीची खंत आहे. कृष्णामुळे यशोदा आपल्याला दुरावली अशी नंदाची तक्रार आहे. तर थोरला भाऊ असूनही आपण दुर्लक्षिले गेलो, सत्ताधीश असूनही आपला प्रभाव निर्माण होणार नाही याची तजवीज कृष्णानं केल्याचा बलरामाला संशय आहे. राजा म्हणून आपण घेतलेल्या निर्णयांची परस्पर वासलात लावण्याचं काम कृष्णानं केलं. किंबहुना, त्याने आपला हेका सर्वत्र चालवला ही खंत बलरामाला आहे. महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखांच्या अंतर्मनीच्या या व्यथा-वेदना तशा खऱ्याच आहेत. त्यांचं दु:ख, उद्विग्नता, संताप, शोक आदी भावनिक कल्लोळ प्रा. वसंत देव यांनी ‘अरण्य-किरण’मध्ये रेखाटला आहे. मावळतीच्या किरणांत माणसाच्या मनात फिरून एकदा आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहण्याची इच्छा जागवते. आत्मपरीक्षण आणि भोवतालच्यांच्या वर्तन-व्यवहारांचं विश्लेषण करताना माणसाच्या मनी साकळलेलं वर्षांनुवर्षांचं गूज अलवारपणे बाहेर येतं. संमिश्र भावनांचा कोलाहल त्याला घेरून येतो. आजवर आपण काय कमावलं, काय गमावलं याचा हिशेब मांडताना हाती शून्य उरल्याची भयाण जाणीव कधी कधी माणसाला होते. यासमयी घडल्या गोष्टींकडे दूरस्थ नजरेनं पाहण्याची दृष्टी त्यानं स्वाभाविकपणे कमावलेली असते. स्वत:कडे काही अंशी तटस्थपणे पाहणं त्याला आता शक्य होतं. या सगळ्याचं प्रतिबिंब ‘अरण्य-किरण’मध्ये पाहावयास मिळतं. हे एक मुक्तचिंतन आहे.. आयुष्याबद्दलचं.

मात्र, प्रा. वसंत देवांसारख्या उत्तम नाटय़-अनुवादकानं लिहिलेलं हे दीर्घकाव्य नाटय़गुणांत मात्र उणं ठरतं. (त्यांच्या मूळ काव्याचा भावानुवाद डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांनी केला आहे.) त्यात अलंकारिक काव्यमयतेच्या अट्टहासात अर्थाचा गाभा हरवला आहे. मूळात ते नाटक स्वरूपात लिहिलेलं नसल्यानं त्याला ओढूनताणून रंगाविष्काराचं रूप दिल्यासारखं वाटतं. दिग्दर्शक अजित भगत यांनी बसवलेल्या ‘अरण्य-किरण’च्या प्रयोगात तर हे विशेषत्वानं जाणवतं. नटी-सूत्रधार या जोडगोळीचं या प्रयोगात नेमकं प्रयोजन काय असा प्रश्न पडतो. निरनिराळ्या पात्रांच्या आगमन-निर्गमनाच्या मधली पोकळी भरून काढण्याचं साधन म्हणून त्यांची योजना केलेली दिसते. त्यामुळे प्रयोगाचा ओघ खंडित होतो. विशेषत: ही जोडी वर्तमान काळातली दाखवल्याने तर हे जास्त जाणवतं.

नंदाच्या स्वगतानं या रंगाविष्कारास प्रारंभ होतो. परंतु शब्द.. शब्द अन् शब्दांचे फसवे अलंकारिक बुडबुडे प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात अपयशी ठरतात. नंदाचा प्रवेश संपता संपत नाही. पुढेही मग याचीच आवर्तनं सुरू राहतात. रुक्मिणीचं जळतं अंतरंग प्रकट करणारा प्रवेश खरं तर प्रेक्षकाला धरून ठेवायला हवा. परंतु प्रारंभच असा सपक झाल्यानं उत्तरोत्तर हा रंगाविष्कार अधिकच कंटाळवाणा होत जातो. अपवाद वगळता यातले सगळे कलावंत तयारीचे आहेत. तरीही असं का व्हावं, हा प्रश्न सतावत राहतो. गांधारी साकारणाऱ्या नंदिता धुरी-पाटकर या तर पट्टीच्या कसलेल्या कलावंत. त्या प्रत्येक भूमिका अगदी समरसून करतात. तरीही का कुणास ठाऊक, गांधारीचा आक्रोश, तिचा शोकसंतप्त आवेग मनाला स्पर्शत नाही. प्राणहीन शब्दांचे हवेत सोडले जाणारे फुगेच जणू आपण पाहतो आहोत असा भास होत राहतो. अर्थासाठी आटापिटा करणारी शब्दबंबाळ स्वगतं हा या कलाकृतीचा मोठा दोष आहे. त्यातूनच हे घडलं आहे. सगळे कलावंत आपल्या परीनं त्यात प्राण फुंकण्याचे प्रयत्न करतात; पण व्यर्थ!

रवी-रसिक यांनी घनगर्द अरण्याचं सूचक नेपथ्य उभं केलं आहे. प्रकाशयोजनेत मात्र त्यांनी रंगांची अनावश्यक उधळण केलेली आहे. दृश्यात्मकतेचा अट्टहास त्यामागे असावा. दीपाली विचारे (कोरिओग्राफी), मयूरेश माडगांवकर (संगीत), नंदलाल रेळे- प्रतीक यादव (ध्वनिसंकेत), शरद विचारे- दत्ता भाटकर (रंगभूषा), अक्षता दळवी (वेशभूषा) यांनी तांत्रिक बाजू उत्तमरीत्या पेलली आहे. नंदू सावंत (नंद) यांचा अपवाद (त्यांचं संभाषण बऱ्याचदा नीट पोचतच नाहीत.) सोडता नंदिता पाटकर (गांधारी), दीपक करंजीकर (बलराम), मृणाल वरणकर (रुक्मिणी), सुशील इनामदार (कृष्ण), तृप्ती जाधव (नटी), नवनीत येसारे (सूत्रधार) यांनी आपापली कामं चोख केली आहेत.