बॉलीवूड स्टार हिरो आणि त्यांचे चित्रपट, त्यांचे चाहते हे सगळेच एक अजब समीकरण आहे. गेली पंचवीस र्वष बॉलीवूडमध्ये हिरो म्हणून राज्य करणाऱ्या अभिनेता सलमान खान, आमिर खान आणि शाहरूख खान या तिघांनीही आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यांच्या केवळ नावावर चित्रपट बंपर कमाई करतात, पहिल्या तीन दिवसांत तिकीटबारीवर चित्रपटांनी किमान शंभर कोटींचा आकडा पार केलेला असतो. मात्र गेल्या दोन वर्षांत या तिघांचे वय आणि त्यानुसार त्यांची चित्रपटाची निवड अशा वेगवेगळ्या निकषांवर त्यांचे चित्रपट फ्लॉप-हिट होत आहेत. त्यातल्या त्यात आमिर खानने वर्षांला सुपरहिटचे समीकरण कायम ठेवले होते. मात्र यंदा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ने त्याच्या अपेक्षा धुळीला मिळवल्या. सातत्याने अपयशाची चव चाखणाऱ्या शाहरूखचा ‘झीरो’ हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र ट्रेलरपासूनच चित्रपट टीकेचा धनी झाला आहे.

सलमान खानच्या ‘एक था टायगर’ चित्रपटाने दोनशे कोटी रुपये कमाईचा विक्रम केला. त्यानंतर त्याने ‘दबंग’, ‘दबंग २’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’ असे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिले. त्याच काळात आमिरनेही ‘थ्री इडियट्स’, ‘धूम ३’, ‘पीके’, ‘दंगल’ अशी कोटय़वधीची कमाई करणाऱ्या चित्रपटांचा सिलसिला कायम ठेवला. शाहरूख खानलाही आपले स्टारडम टिकवण्यासाठी सुपरहिट चित्रपट गरजेचे होते. त्यानेही ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘हॅप्पी न्यू इअर’ असे चित्रपट करत हे आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी त्याने वेगळे चित्रपट निवडण्याचा धोका पत्करायला सुरुवात केली. त्याने ‘फॅन’सारखा चित्रपट केला. मात्र त्याला यश मिळाले नाही. इम्तियाज अलीसारख्या दिग्दर्शकाचा ‘हॅरी मेट सेजल’ही त्याला तारू शकला नाही. तरीही राहुल ढोलकियाचा ‘रईस’, गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डीअर जिंदगी’ असे प्रयोग त्याने सुरूच ठेवले. व्यावसायिक यशासाठी त्याने पुन्हा एकदा रोहित शेट्टीवर मदार टाकत ‘दिलवाले’सारखा प्रयत्न करून पाहिला पण तोही फारसा यशस्वी ठरला नाही आणि आता ‘झीरो’सारखी वेगळी भूमिका करण्याचा त्याचा प्रयोगही लोकांना फारसा पसंतीस उतरलेला नाही.

एकूणच चित्रपटांकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा बदललेला दृष्टिकोन तिन्ही खानांनाच नाही तर सैफ अली खान, अजय देवगण आणि अक्षय कुमारसारख्या त्यांच्या समकालिनांनाही भारी पडतोय, असे चित्र निर्माण झाले आहे. मध्यंतरीच्या काळात ‘कॉकटेल’, ‘लव्ह आज कल’, ‘रेस’सारख्या चित्रपटांतून यशस्वी ठरल्यावर सैफ अली खानलाही ओळीने ‘कालाकांडी’, ‘बाजार’ अशा अपयशी चित्रपटांचा शिक्का त्याच्या माथी बसला. आपल्या चित्रपटांची निवड चुकते आहे हे खुद्द सैफनेही ‘बाजार’च्या अपयशानंतर दिलेल्या मुलाखतीत मान्य केले. मात्र वितरकांच्या मते बॉलीवूडची ही स्टार कलाकार मंडळी अजूनही तितकीच प्रभावी आहेत.

शाहरूख, सलमान, आमिर किंवा अजय -अक्षय कुमार ही मंडळी एका रात्रीत स्टार झालेली नाहीत. गेली कित्येक र्वष चित्रपट करणाऱ्या या मंडळींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची आवड- निवड लक्षात घेतानाच सुनियोजित पद्धतीने त्यांनी आपली कारकीर्द उभी केली असल्याने आजपर्यंतचे त्यांचे स्टारडम टिकून राहिले आहे. काळानुरूप स्वत:ला बदलणे हीच त्यांची खरी ताकद आहे, त्यामुळे यापुढेही ते टिकून राहतील, असा विश्वास निर्माता रमेश तौरानी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे. आजही या कलाकारांच्या नावावर चित्रपटांचे जोरदार बुकिंग होते आणि चित्रपट तितकीच कमाई करतात. वितरकांना यापेक्षा मोठा फायदा असूच शकत नाही, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.

चित्रपट फ्लॉप-हिट होणे हा अनुभव अगदी गुरुदत्त, शोमन राज कपूर यांच्या काळापासून आहे. असा एक टप्पा प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात येतो, असे मत चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केले. अनेकदा दिग्दर्शकावर, त्याच्या विषयावर विश्वास ठेवून चित्रपटांची निवड केली जाते. मात्र चित्रपट पूर्ण होतो तेव्हा तो त्या अपेक्षेप्रमाणे खरा ठरतोच असे नाही. जे ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’च्या बाबतीतही झाले. त्यामुळे अशा वेळी आमिर खान किंवा अमिताभ बच्चन यांची निवड चुकली असे म्हणता येत नाही. शोमन राज कपूर यांनी ‘संगम’ हा दोन मध्यंतर असलेला चित्रपट पहिल्यांदा केला. तो यशस्वी ठरला. त्यानंतर सहा वर्षांनी त्यांनी ‘मेरा नाम जोकर’ हाही दोन मध्यंतर असलेला चित्रपट केला, मात्र तो सपशेल आपटला. पण त्यावेळचे फ्लॉप आणि आताचे फ्लॉप यात फरक आहे, असे मत ठाकूर यांनी मांडले. तेव्हा सुरुवातीला फ्लॉप वाटलेला चित्रपट काही महिन्यांनी प्रदर्शित झाला आणि त्यातला आशय चांगला आहे हे लक्षात आले तर प्रेक्षक पुन्हा चित्रपटांना गर्दी करायचे. आताचे चित्रपट मात्र आठवडय़ाभरातच फ्लॉपमध्ये वाहून जातात, असे त्यांनी सांगितले.

सुपरस्टार आणि फ्लॉप हे पुरातन काळापासून चालत आले आहे. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्यासारख्या सुपरस्टार्सनी ओळीने दिलेले फ्लॉप चित्रपट प्रेक्षकांनी अनुभवलेले असले तरी आजच्या स्टार कलाकारांसाठी हे गणित तितकेसे सोपे राहिलेले नाही. त्यांनी चित्रपटांचे मानधन घेण्याऐवजी निर्मितीत सहभाग घेत फायदा-तोटय़ात भागीदारी स्वीकारली असल्याने चित्रपट फ्लॉप झाला तर वितरक संबंधित कलाकारांकडे नुकसानभरपाईची मागणी करतात. याआधी शाहरूख खान आणि सलमान खान दोघांनीही आपापल्या फ्लॉप चित्रपटांची जबाबदारी स्वीकारून काही टक्के नुकसानभरपाई म्हणून वितरकांना पैसे दिले आहेत. आता ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’साठीही वितरकांनी नुकसानभरपाई मागितली आहे. त्यामुळे चित्रपट फ्लॉप ठरला तर कारकीर्दीच्या दृष्टीने आणि आर्थिकदृष्टय़ाही कलाकारांचे नुकसान होते. त्यामुळे नाही म्हटले तरी सध्या स्टार कलाकारांसाठी हा कसोटीचा काळ ठरतो आहे. एकीकडे ‘स्त्री’, ‘बधाई हो’ असे छोटय़ा बजेटचे चित्रपट तिकीटबारीवर कमाई करत असताना बिग बजेट चित्रपट मात्र सपशेल नांगी टाकत असल्याने या परिस्थितीतून योग्य त्या चित्रपटांची निवड करत आपली कारकीर्द यशस्वी करणे हे या कलाकारांसमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे.