रवींद्र पाथरे

स्वल्प कथाबीजावर दोन अंकी नाटक उभं राहू शकतं? अवघड आहे; परंतु अशक्य बिलकूल नाही. आपल्याकडे संतोष पवार, केदार शिंदे, देवेंद्र पेम या मंडळींनी इम्प्रोव्हायझेशन तंत्रानं हा चमत्कार गेली कित्येक वर्षे करून दाखवलेला आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील मध्यंतरीच्या दशकाहून जास्तीच्या वाईट काळात संतोष पवार यांच्या नाटकांनीच मराठी रंगभूमी तगविली होती, हा नजीकचा इतिहास आहे. मात्र आता पुनश्च मराठी रंगभूमी आपल्या मूळ रूपाकडे परतली आहे. अर्थात हे सुचिन्ह आहे.

तर.. वरील मंडळींच्या पठडीतलंच, परंतु थोडंसं हटके एक नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर अवतरलं आहे. ते म्हणजे मकरंद देशपांडे लिखित-दिग्दर्शित ‘एपिक गडबड’! मकरंद देशपांडे हे नाव मराठीजनांना माहीत आहे ते पृथ्वी थिएटरमधील नाटकवाला म्हणूनच! ते जन्माने मराठी असले तरी त्यांचं निकटचं नातं राहिलेलं आहे ते हिंदी रंगभूमीशीच! पृथ्वी परिसरातच कायम वावर असणाऱ्या मकरंद देशपांडे यांचं नाटक.. आणि  तेही मराठी रंगभूमीवर? अनेकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. मकरंद देशपांडे यांना हिंदी रंगभूमीकडून आपल्या मुळांकडे परतावं असं वाटलं असावं बहुधा. म्हणूनच कदाचित त्यांनी हा उद्योग केला असावा. असो.

तर- त्यांचं हे नाटक आहे अल्प-बीजी! म्हणजे त्यात रूढ अर्थानं कथानक असं नाहीए. कुणा देशपांडे नामक लेखकानं लिहिलेल्या नाटकातील पात्रांच्या आयुष्यात हे नाटक घडतं. त्यात जगद्विख्यात नाटककार विल्यम शेक्सपीअरही आहे. पेशव्यांच्या अकराव्या पिढीतील कुणीएक तोतया पेशवासुद्धा आहे. ऐतिहासिक पुरुषाशी लग्न करू इच्छित असलेली आरती नामक एक यौवना आहे. नाटकात कायम प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा तिचा मामा आहे. तशीच तिची आईही आहे. या सर्वाच्या जोडीनं नाटकांतून दुय्यम भूमिका साकारणारा बाब्या नावाचा एक महत्त्वाकांक्षी तरुणही आहे. आपल्या भाचीची पेशवे घराण्यात सोयरीक व्हावी अशी मामाची इच्छा आहे. त्यासाठी त्यानं पेशव्यांच्या अकराव्या वंशजाला मुलीला दाखवण्याकरता बोलावलं आहे. आरतीही उत्कंठेनं त्याची प्रतीक्षा करतेय. परंतु हे वाट पाहणं चाललेलं असताना अचानक तिथं विल्यम शेक्सपीअर अवतीर्ण होतो. आणि प्रथमदर्शनीच आरती त्याच्यावर फिदाही होते. खरं तर नाटककार शेक्सपीअर हा आपल्या शोकांतिकेचा फार्स करणाऱ्या देशपांडे नामे लेखकाला खडसावून जाब विचारायला आलेला आहे. परंतु आरती त्याच्या प्रेमात पडल्यानं नाटक वेगळंच वळण घेतं.

रत्नपारखी दृष्टीच्या शेक्सपीअरनं प्रमुख भूमिका साकारणाऱ्या मामांची तोकडी कुवत क्षणार्धात जोखलेली आहे. नेहमी दुय्यम भूमिका वाटय़ाला येणारा बाब्या आपल्या हुन्नरावर एक दिवस मामाची जागा घेणार असं भाकित तो वर्तवतो. स्वाभाविकपणेच मामा शेक्सपीअरचा तिरस्कार करतो. आरतीनं त्याच्या नादी लागू नये म्हणून तो जंग जंग पछाडतो. पेशव्याच्या वंशजास मुलगी बघण्यासाठी येण्याचं निमंत्रण दिलेलं असताना आरतीनं असं करणं उचित नाही असं त्याचं म्हणणं असतं. आपली बहीणही मुलीलाच धार्जिणी असल्याचं पाहिल्यावर त्याचा धीर सुटतो.

विल्यम शेक्सपीअर लेखक देशपांडेला आपल्या गाजलेल्या शोकांतिकेचा फार्स केल्याबद्दल जाब विचारण्याकरता जातो खरा; परंतु देशपांडे त्यालाच आपल्या नाटकातील एक पात्र बनवून टाकतो. त्यामुळे शेक्सपीअरची प्रतिभा त्याला सोडून जाते. त्याच्यावर देशपांडेची वाक्यं उच्चारण्याची नौबत येते. त्याने आरतीचा भ्रमनिरास होतो आणि ती नाइलाजानं तोतया पेशव्याच्या गळ्यात वरमाला घालायला राजी होते. एव्हाना आपल्या स्मार्ट करामतींमुळे बाब्याने मामांची जागा घेतलेली असते. तो प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा नट झालेला असतो..

आता या सगळ्या व्यापांतून काय निष्पन्न होतं? तर.. ‘एपिक गडबड’!  लेखक-दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांना या नाटकातून नेमकं काय दर्शवायचं आहे, हे ज्यानं त्यानं प्रत्यक्षच अनुभवावं. तथापि एक सळसळत्या ऊर्जेचा प्रयोग पाहिल्याचं समाधान हे नाटक निश्चितपणे देतं. आंगिक व वाचिक अभिनयाचे काही पाठ यातून होतकरू रंगकर्मीना नक्की मिळू शकतात. यातली सगळीच पात्रं ‘जिवंत’ आहेत. त्यांच्या संवेदना आणि त्यांची अभिव्यक्तीही तीव्र आहे. त्यामुळे यात पेशवा आणि आरती यांच्यातला सवाल-जवाबाचा सामना असो अथवा शेक्सपीअरची स्वगतं.. त्यात एक जोश आहे.. उसळता ज्वालामुखी म्हणजे काय, हे त्यातून प्रतीत होतं. मुद्राभियनयाचे पाठ यातली सगळीच पात्रं देतात. वेगवेगळ्या काळांतली माणसं नाटकात वावरत असल्याने नेपथ्यकार टेडी मौर्य यांनी वर्तमान आणि ऐतिहासिक काळांच्या फ्युजनातून नेपथ्य केलं आहे. पेशवाई, शेक्सपीअरन काळ आणि वर्तमान यांचं संमिश्रण नेपथ्यात दिसतं. अमोघ फडके यांनी प्रकाशयोजनेतून अपेक्षित नाटय़परिणाम साधला आहे. रचिता अरोरांच्या पाश्र्वसंगीतानं प्रयोगातले आघाती क्षण अधोरेखित केले आहेत. तर मकरंद देशपांडे यांच्या वेशभूषेनं पात्रांना ‘चेहरे’ दिले आहेत.

सगळ्या कलाकारांची कामंही उत्तम झाली आहेत. याचं कारण संहितेतला मॅडनेस प्रयोगात पुरेपूर उतरला आहे. त्यासाठी आवश्यक ती ऊर्जा त्यांच्या देहबोलीतून आणि संवादशैलीतून अभिव्यक्त होते. निनाद लिमयेंचा शेक्सपीअर अस्सल वाटावा इतक्या ताकदीनं त्यांनी त्याची स्वगतं पेलली आहेत. आरतीची उत्स्फूर्त उत्फुल्लता आकांक्षा गाडे यांनी रंगमंचीय अवकाशातील मुक्त, मोकळ्या बागडण्यातूून व्यक्त केली आहे. तिची तितकीच मॅड आई साकारलीय माधुरी गवळी यांनी. भरत मोरेंचा सतत भयभीत अवस्थेत वावरणारा तोतया पेशवाही फर्मास. खरी बाजी मारली आहे ती बाब्याच्या भूमिकेतील अजय कांबळे यांनी. कळीचं फूल होण्याची प्रक्रिया (दुय्यम भूमिकेतून केन्द्रीय भूमिकेकडे जाण्याचा प्रवास) त्यांनी इतक्या नितळपणे दाखवली आहे, की शेक्सपीअरची भविष्यवाणी सत्यात उतरलेली प्रेक्षकही मान्य करतात. मामाच्या भूमिकेत अंकित म्हात्रे शोभले आहेत.

Story img Loader