सौरभ कुलश्रेष्ठ

बॉलीवूड आणि राजकारण यांचा फार जवळचा आणि कित्येक वर्षांपासूनचा संबंध आहे. बॉलीवूड कलाकारांनी राजकारणात उतरणे किंवा कलाकारांच्या साथीने राजकारण्यांची झालेली वाटचाल अशा दोन्ही बाजूंनी हे नातं घनिष्ठ आहे. अनेकदा राजकारण, सत्ताकारण हे बॉलीवूडपटांचे विषय झाले आहेत. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘सुई धागा’सारखे सामाजिक प्रश्नांना मूर्त रूप देणारे चित्रपट असोत किंवा आता प्रदर्शित झालेले, येऊ घातलेले ‘केदारनाथ’, ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, ‘उरी द सर्जिकल अटॅक’ हे चित्रपट असोत. सामाजिक-राजकीय नाटय़ बॉलीवूडपटांमधून पुन्हा जोर धरू लागले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून एक प्रकारे राजकीय प्रचारयुद्धाला सुरुवात झाली आहे..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या विषयांवरचे चित्रपट ही गोष्टही फारशी नवीन नाही. किंबहुना, अनेकदा राजकीय, सामाजिक घटना हल्ली चित्रपटांमधून लवकर बोलक्या होऊ लागल्या आहेत. हा प्रकार या वर्षी तीव्रतेने जाणवतो आहे. मात्र पुढच्या वर्षी येणाऱ्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या चित्रपटांमागेही राजकीय प्रचाराचा छुपा हेतू आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. भाजपने २०१४ च्या निवडणुकीत फेसबुक- व्हॉट्सअ‍ॅपचा चलाखीने वापर करत प्रचाराचे नवे तंत्र रूढ केल्यानंतर पुढच्या वर्षीच्या निवडणुकांसाठी काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष त्याचाच कित्ता गिरवण्यात गुंतले आहेत. अशा वेळी विरोधकांना समाजमाध्यमांवर गुंतवून भाजपने प्रचारतंत्रात एक पाऊल पुढे टाकत थेट चित्रपटांच्या माध्यमातून राजकीय कुरघोडी केली असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षी अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेला ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. घराघरातून शौचालय असायला हवे ही मोहीम केंद्र सरकारने जोरदारपणे राबवायला सुरुवात केली होती. स्वच्छ भारतची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली हाक, त्याला बॉलीवूड कलाकारांचा मिळालेला प्रतिसाद आणि थेट त्याच अनुषंगाने घर घर शौचालय.. ही सरकारची मोहीम बोलकी करणारा हा चित्रपट लोकांसमोर आला. तोवर या विषयावर चित्रपट तेही बॉलीवूडपट होऊ शकेल, अशी कल्पना कोणी केली नव्हती. मात्र अक्षयकुमार हा चित्रपट करतोय म्हटल्यावर साहजिकच प्रेक्षक आपोआप चित्रपटगृहांकडे वळले. चित्रपट चांगला असल्यामुळे तो तिकीटबारीवरही कमाई करता झाला. याही वर्षी अक्षयकुमारने ‘पॅडमॅन’सारखा पुन्हा एकदा सामाजिक मुद्दय़ाला हात घालणारा चित्रपट केला तोही चांगला चालला. त्यानंतर काही महिन्यांत वरुण धवन आणि अनुष्का शर्मा या जोडीचा केंद्र सरकारचे मेक इन इंडियाचा घोष ठळकपणे लोकांपर्यंत पोहोचवणारा ‘सुई धागा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काँग्रेस नेतृत्वाने कसे कामापुरते वापरले याचे चित्रण करणारा ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट आणि त्यानंतर केंद्रातील भाजप सरकारच्या धडाकेबाज सर्जिकल स्ट्राइकची कथा सांगणारा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हे दोन चित्रपट ऐन निवडणुकांच्या तोंडावर झळकत आहेत.

‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित याच नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काँग्रेस पक्षात गांधी घराण्यातील नेत्यांव्यतिरिक्त कोणालाही फारसे महत्त्व नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या नामवंत अर्थतज्ज्ञाला पक्षनेतृत्वाने हतबल करून टाकले होते, असा या पुस्तकाचा आशय होता. तेच चित्रपटांतून अधिक प्रभावीपणे दाखवले जाईल. भाजपचा निकटवर्ती अभिनेता अनुपम खेर हे मनमोहन सिंग यांची भूमिका करत आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले असले तरी डिसेंबरअखेरीस तो प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर ‘उरी : सर्जिकल स्ट्राइक’ जानेवारीत झळकणार आहे. भाजपचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते परेश रावल हे या चित्रपटात अजित डोवाल यांची भूमिका करत आहेत. म्हणजे काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधणारा ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची धडाडी दाखवणारा ‘उरी : सर्जिकल स्ट्राइक’हे चित्रपट ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित होणार आहेत. अधिकृतपणे भाजपचा या चित्रपटांशी संबंध दिसत नसला तरी आधीच्या चित्रपटांचे विषय आणि येऊ घातलेल्या दोन्ही चित्रपटांच्या कथा आणि त्यात प्रमुख भूमिकांत भाजपशी जोडलेले अभिनेते आहेत हाही महत्त्वाचा योगायोग आहे.

वृत्तपत्रे-वृत्तवाहिन्या किंवा फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांचा प्रचारतंत्रासाठी भाजपने आक्रमकपणे वापर केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या समाजमाध्यमांचा भाजपने खुबीने वापर केला. त्या वेळी काँग्रेससह इतर सर्व विरोधी पक्ष त्यात मागे राहिले होते. मोदींचे यश पाहिल्यावर साऱ्या विरोधकांना जाग आली. आता विरोधी पक्ष समाजमाध्यमांवर गुंतून पडले असताना भाजपला अनुकूल ठरतील असे चित्रपट झळकणार असल्याने राजकीय प्रचाराचे युद्ध थेट चित्रपटांतून लढले जातेय असेच चित्र दिसू लागले आहे. शिवाय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा ‘ठाकरे’ हा चित्रपटही जानेवारीतच प्रदर्शित होणार आहे. हाही चित्रपट एका अर्थी भाजपच्याच विचारांना साहाय्य करणारा असल्याने चित्रपट माध्यमाचा सत्ताधारी पक्षाने प्रभावी वापर केला आहे हे जाणवल्याशिवाय राहत नाही.

‘वातावरणनिर्मितीपुरता उपयोग’

प्रचारतंत्र स्फोटाच्या आजच्या काळात भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी पारंपरिक माध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत प्रत्येक माध्यमाचा वापर केला आहे. कोणतेही माध्यम अस्पर्श ठेवायचे नाही हेच राजकीय पक्षांचे धोरण असते. ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ किंवा ‘उरी-सर्जिकल स्ट्राइक’सारख्या चित्रपटातून राजकीय वातावरणनिर्मिती निश्चितच होईल. पण त्यातून किती मते वळवता येतील हे अनिश्चितच असते. भारतीय मतदार सर्व प्रचारांना सामोरा जातो, पण मतदान करताना स्वत:चे गणित वापरतो हे अनेकदा दिसून आले आहे.

गिरीश कुलकर्णी, अभिनेता

भाजपचा संबंध नाही’

कोणत्या विषयावर चित्रपट काढायचा हा निर्माता-दिग्दर्शकांचा अधिकार आहे. ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट का काढला जात आहे, ते माहिती नाही. युद्धाच्या कथांनी कलावंतांना नेहमीच आकर्षित केले आहे. ‘छोटा जवान’, ‘हकीकत’पासून ते आताच्या चित्रपटांपर्यंत ही यादी मोठी आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकवर चित्रपट काढला जाणे हा भाजपच्या प्रचारतंत्राचा भाग मानण्याचे कारण नाही. मात्र यातून जो काही राजकीय संदेश जायचा आहे तो जाईलच. भाजपच्या निवडणूक प्रचाराशी किंवा २०१९ च्या लोकसभा निवडणुकांशी त्याचा काहीही संबंध नाही. प्रत्येक गोष्ट निवडणुकीशी जोडणे योग्य नाही.

माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते, भाजप

Story img Loader