रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात रणवीर सिंगइतकंच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त लक्षात राहत असतील तर ते मराठी कलाकारांचे चेहरे. एकाच हिंदी चित्रपटात ११ मराठी कलाकारांच्या चांगल्या भूमिका ही सुखद पर्वणी ठरली आहे. मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटांमधून काम केलेच नाही, असे नसले तरीही मराठी कलाकारांचा हिंदीतील सहज वावर आणि हिंदीतील कलाकार, निर्मात्यांची मराठी ओढ ही आता जितक्या सहजपणे दिसून येते आहे तशी ती याआधी दिसलेली नाही. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शकांनी हिंदीत आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे एकीकडे नागराज मंजुळे-अमिताभ जोडीच्या झुंड चित्रपटाची चर्चा होते. दुसरीकडे संगीतकार अजय-अतुल एकापाठोपाठ एक ठग्ज ऑफ हिंदुस्थान, झीरोसारख्या बिग बजेट चित्रपटांमधून धडक थरार निर्माण करतायेत. नव्या विचारांच्या प्रयोगशील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यामुळे ही दरी सांधली गेली आहे..

गेल्या वर्षी दिग्दर्शक राही अनिल बर्वे दिग्दर्शित तुंबाड हा भयपटांच्या शैलीतील अनोखा चित्रपट हिंदीत प्रदर्शित झाला. वेगळी गोष्ट आणि व्हीएफएक्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मांडलेली तुंबाडची गोष्ट लोकांना भलतीच आवडून गेली. आणि दिग्दर्शकाने संयमाने काही सलग वर्ष घेतलेल्या मेहनतीचे कौतूकही झाले. एकीकडे नागराज मंजुळे, ओम राऊत, अभिजीत पानसे ही दिग्दर्शक मंडळी या वर्षी हिंदीत मोठय़ा कलाकारांबरोबर चित्रपट करताना दिसणार आहेत. नागराज मंजुळेंचा पहिलाच हिंदी चित्रपट आणि त्यात अमिताभ बच्चन यांची भूमिका हा जसा उत्सुकतेचा विषय ठरतोय. तसंच अभिनेता अजय देवगणला तानाजीच्या भूमिकेत लोकांसमोर आणणाऱ्या दिग्दर्शक ओम राऊतच्या चित्रपटाबद्दलही तितकीच चर्चा आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीला बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत दिग्दर्शित करणाऱ्या अभिजीत पानसे यांचा ठाकरे हा चित्रपट तर एकाअर्थी नव्या वर्षांचा शुभारंभ ठरणार आहे.

तुंबाडचे लेखक दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्या मते, एखादी कलाकृती निर्माण करायची असल्यास त्याला आता भाषिक बंधनं उरलेली नाहीत. त्यामुळे प्रादेशिक भाषेतील खासकरून आपल्या मराठी भाषेतील कलाकार, चित्रपटकर्मी आता सहज मराठीव्यतिरिक्त इतर भाषांमध्ये आणि बॉलीवूडमध्ये चित्रपट निर्मिती करू लागले आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. हे खूप आधी घडायला हवं होतं. २००० सालापासून हे घडलं असतं तर फारच चांगलं झालं असतं. पण उशिरा का होईना हे घडतंय, हे चांगलं आहे, असं त्यांनी सांगितलं. तुंबाड चित्रपटाबद्दल सुरुवातीला बॉलीवूडमधून गोंधळाच्या प्रतिक्रिया येत होत्या, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंर तीन आठवडय़ांनी मला चित्रपटाचं कौतुक करणारे फोन येऊ  लागले. आता तुंबाड ही एक कल्ट सिनेमा झाला आहे. त्याला इंडस्ट्रीने बॉलीवूड फिल्म मानलं आहे. चित्रपटाची निर्मिती करताना त्याला बॉलीवूड फिल्म म्हणून की प्रादेशिक म्हणून गणलं जाईल हे माहीत नव्हतं. त्यामुळे मीही गोंधळलो होतो. पण माझं काम अधिक सोपं झालं ते चित्रपट महोत्सवामुळे, असं राही म्हणतो. चित्रपट महोत्सवांमध्ये तुंबाडला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांनी आपलंसं केलं. त्यामुळे मराठी किंवा प्रादेशिक विषय मांडलाय असा समज न होता त्या विषयाला देशभरात सार्वत्रिकरीत्या स्वीकारलं गेलं, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगण, निर्माता करण जोहर, दिग्दर्शक अनुराग कश्यप या मंडळींमुळे सातत्याने मराठी कलाकार हिंदी चित्रपटांमधून दिसतायेत. मात्र केवळ मराठी कलाकार-संगीतकार हिंदीत जातायेत असं नाही, तर हिंदीतील अनेक कलाकार निर्माते म्हणून मराठीत उतरले आहेत. गेल्या वर्षी जॉन अब्राहम, अक्षय कुमार, अनुराग कश्यप अशी हिंदीतील नामवंत मंडळी मराठी चित्रपट निर्मितीत उतरली. त्याहीआधी अजय देवगण, संजय लीला भन्साळी, प्रियांका चोप्रा हे मराठी चित्रपट निर्मितीशी जोडले गेले होते. यावेळी तर मराठीतील अनेक दिग्दर्शक हिंदीत पदार्पण करतायेत. तानाजी या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ओम राऊत यांना मात्र हे नवीन आहे असे वाटत नाही. ‘मराठी आणि बॉलीवूड चित्रपट यामध्ये कधी दरी होती, असे मला वाटत नाही. कला ही कला आहे. नाना पाटेकर, महेश मांजरेकर, माधुरी दीक्षित, निशिकांत कामत, रितेश देशमुख यांसारख्या मराठी व्यक्तिमत्त्वांचा बॉलीवूडमध्येही तितकाच दबदबा आहे. लक्ष्मीकांत बेर्डे दोन्ही भाषांमध्ये काम करायचे. कित्येक मराठी कलाकार निर्मात्यांनी हिंदीत आपलं नाणं याधीही खणखणीत वाजवलं आहे. व्ही शांताराम यांनी आपली कारकीर्द सुरू केली तेव्हापासूनच त्यांनी हिंदीतही काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे मला हा मुद्दा पटत नाही’, असं ओम राऊत यांनी सांगितलं. प्रकाश कपाडिया यांनी देवदास, बाजीराव मस्तानी चित्रपट लिहिला. त्यांनीच मराठीमध्ये कटय़ार काळजात घुसली हा चित्रपट लिहिला. रितेश देशमुखने मराठीमध्ये चित्रपट निर्मितीही केली आणि हिंदीमध्ये अभिनय केला. तानाजी चित्रपट मी हिंदीत करायचा ठरवला तेव्हा अजय देवगण यांना त्या चित्रपटाची कथा ऐकवली. त्यांना तो विषय आवडला आणि त्यांनी तो चित्रपट वरून निर्माता म्हणून करायचा हे सांगितलं आणि त्यांनी भूमिकाही स्वीकारण्याचं ठरवलं. त्यावेळी मराठी आणि हिंदी हा फरक जाणवला नाही. कारण चित्रपट हिंदीमध्येच करायचा हा माझा विचार होता. मी लोकमान्य चित्रपट करायच्या आधीपासून तानाजी चित्रपट करण्याच्या विचारात होतो. मराठी चित्रपटकर्मी आपल्या प्रादेशिक भाषांमध्येही यशस्वी झालेले आहेत आणि ते हिंदीत गेल्यावरही यशस्वी झालेले आहेत. मराठीसाठी कधीच बॉलीवूड दूर नव्हतं. इथले तंत्रज्ञ, कलाकार आणि दिग्दर्शक तेव्हाही बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवत होते आणि आताही ते यशस्वी होत आहेत. तानाजीमध्ये ८० टक्के तंत्रज्ञ मराठी आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट दोन्ही वेगवेगळे आहेत असे वाटतच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनेक हिंदीतील कलाकार यावेळी मराठी चित्रपटात मुख्य भूमिकांमधून काम करताना दिसले. के. के. मेननसारख्या अभिनेत्याने एक सांगायचंय- द अनसेड हार्मनी या लोकेश गुप्ते दिग्दर्शित चित्रपटात काम केले. याच चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी सचदेवनेही काम केले आहे. न्यूड चित्रपटात नसीरूद्दीन शहा महत्त्वाच्या भूमिकेत होते. आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटात मीनाताईंची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अमृता राव हिच्या मते प्रादेशिक भाषेतून हिंदीमध्ये आणि हिंदीतून प्रादेशिक भाषेत काम करणारे कलाकार यांच्याकडे पाहण्याचा मनोरंजन क्षेत्राचा आणि प्रेक्षक दोघांचाही दृष्टिकोन बदलला आहे. ‘मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की मी २०१९ साली मराठी चित्रपट ठाकरेमधून पदार्पण करणार आहे. पण आता खरंच लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. एका ठिकाणी काम मिळत नाही म्हणून दुसऱ्या ठिकाणी काम करताय अशातलाही तो भाग नसतो. ही कलाकारांसाठी संधीची नवीन दारं आहेत. कलाकारांसाठी विविध प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे माध्यमं कलाकारांसाठी बदलत राहतील आणि विविध भाषिक चित्रपटात ते काम करताना दिसतील. याकडे केवळ चांगली संधी याच दृष्टीने पाहिलं गेलं पाहिजे’, असं ती म्हणते. एकंदरीतच प्रेक्षक आणि मराठी-हिंदी चित्रपटकर्मीचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असल्याने ही देवाणघेवाण सहजतेने होताना दिसतेय. नवीन वर्षांत हे नातं अधिक घट्ट झालेलं पाहायला मिळेल, यात शंका नाही.

Story img Loader