भक्ती परब
गेली ३० वर्ष आमिर खान आपल्या कामगिरीने त्याच्या चाहत्यांना चकित करून सोडतो आहे. वैयक्तिक आयुष्य, चित्रपट कारकीर्द, सामाजिक जाणीव आणि नातेसंबंध जपणे या चारही बाजूंचा समतोल त्याने साधलाय. त्याचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना नेहमीच भावतो. गप्पांमधून उलगडलेला हा एक मुक्त ‘आमिरा’नुभव..
अभिनयाचा हा पहला नशा कसा कधी आणि केव्हा याविषयी आमिर म्हणतो, अभिनय क्षेत्रात आलो तेव्हा माहीत नव्हतं की इतकी वर्ष मी काम करेन. हा शिकण्याचाच अनुभव होता. मी जसा आहे तसाच मी माझ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येतो. प्रत्येक दृश्य देताना हे मी अजून चांगले करू शकलो असतो असा विचार करतो. माझ्या व्यक्तिरेखेची इतर कुठल्याही सहकलाकारांच्या व्यक्तिरेखेशी तुलना करत नाही. तर त्या व्यक्तिरेखेच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचा विचार करतो.
आजवरच्या चित्रपट निवडीविषयी विचारले असता त्याने सांगितले, कुठल्याही चित्रपटाच्या पटकथेचा जास्त विचार करत नाही. पटकथा वाचताना मला मजा आली, त्यातलं काहीतरी मनाला भावलं तर ते स्वीकारतो. ‘फिरंगी मल्लाह’ करताना ही व्यक्तिरेखा अतिशय आवडली. खूप चांगल्या प्रकारे विजयने ते लिहिलंय. इतकं आकर्षक पात्रं होतं की मला वाटलं हे करायलाच पाहिजे. इंग्रजांच्या विरुद्ध रौनकपूर नावाच्या एका काल्पनिक जागेतील ठकांची लढाई यात आहे. फिरंगी मल्लाहची व्यक्तिरेखा आजवरच्या सगळ्या व्यक्तिरेखांपेक्षा कठीण होती. एक मनोरंजक तितकंच धोकेबाज असलेलं हे पात्र आहे, असं आमिरने सांगितलं.
पटकथेची निवड करताना आपल्यावर कुठलंही दडपण नसतं, असं सांगणारा आमिर प्रदर्शनाच्या वेळी मात्र दडपण येतंच याची कबुली देतो. पटकथा निवडीनंतर खरंतर मी कशाचाच विचार करत नाही. पटकथेत काय मांडलंय ते शोधण्याचा प्रयत्न करतो. पण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी काही दिवस मला तो प्रेक्षकांना आवडेल की नाही, हा विचार भंडावून सोडतो, असं तो सांगतो.
तुझ्या कामाला घरच्यांची दाद कशी मिळते असं विचारल्यावर तो म्हणाला, माझं काम नाही आवडलं तर माझ्या घरातले सगळेचजण आणि माझे काही जवळचे मित्र मला तुझं काम आवडलं नाही असं थेट सांगतात. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट माझ्या अम्मीला आवडला. आझादने हा चित्रपट अर्धाच पाहिला. तेव्हा त्याने प्रश्न विचारला की यात आझाद नाव का घेतलंय, तर मी त्याला सांगितलं की तुझं नाव त्यांना खूप आवडलं म्हणून घेतलं. त्याने माझे चित्रपट अजून पाहिले नाहीयेत. पण जेव्हा तो माझ्यासोबत बाहेर जातो.
तेव्हा छायाचित्रकारांची गर्दी वगैरे बघून तो गोंधळतो, आणि विचारतो ही गर्दी का.. तेव्हा मी त्याला सांगतो की माझं काम त्यांना आवडतं म्हणून ते आले आहेत. आझादला चित्रपट बघायला आवडत नाहीत. तो खूप हळव्या मनाचा आहे. त्याला साहसदृश्ये, मारामारी पडद्यावर बघायला आवडत नाही. तो रडायला लागतो, असा अनुभवही आमिर सांगतो.
दिवाळी सणाविषयी विचारले असता आमिर बालपणीच्या आठवणीत रमला. तेव्हा दिवाळीत आम्ही तीन पत्त्यांचा जुगार खेळायचो, ती एक प्रथा-परंपराच होती. त्या वेळी हजार रुपयांपर्यंत रक्कम लावून खेळत होतो. आता ती रक्कम वाढली आहे. या जुगारामध्ये जिंकणं-हरण्यापेक्षा खेळाचाच आनंद घ्यायचो. दिवाळीत फटाके वाजण्याच्या बाजूने मी कधीच नव्हतो, दिवाळी शांतपणे आनंदात साजरी व्हावी असं वाटतं. मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांची लहानपणी भीती वाटायची. शक्यतो फटाके टाळावेत, असं आमिर म्हणाला.
अमिताभ यांच्यासोबत पहिल्यांदा काम करण्याच्या अनुभवाविषयी आमिरनं सांगितलं. खूप पूर्वी एक गाणं चित्रित झालं होतं, त्यात एकत्र होतो. पण चित्रपट करण्याची संधी खूप उशिरा मिळाली. काही पटकथा आल्या, पण त्या मनाला पटल्या नाहीत. इंद्रकुमार यांचा ‘रिश्ता’ नावाचा चित्रपट होता, त्यात एकत्र काम करणार होतो. पण तेही नाही जमलं. तेव्हापासून अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याची वाट बघत होतो. त्यांच्या अभिनयात जादू आहे, ते जी व्यक्तिरेखा साकारतात ती त्यांच्या डोळ्यात दिसते. ते भाव त्यांच्यात उतरतात. अमिताभ बच्चन यांचा प्रत्येक दृश्याची खूप वेळा तालीम करण्यावर भर असतो. मी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याआधी चार ते पाच महिने पटकथा तोंडपाठ करतो. ती पटकथा स्वत:च्या हस्ताक्षरात डायरीत लिहून काढतो. त्यामुळे सेटवर पटकथा हातात घ्यावी लागत नाही. दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी सांगितलं तर त्यांच्याबरोबर तालीम करतो. काही भावनिक दृश्यं असतात तेव्हा त्याची तीन-चार वेळा तालीम करतो. पण अमिताभ सेटवर ५० ते ६० वेळा कधीतरी शंभर वेळाही संवादांची उजळणी करतात.
आणि इच्छा अपुरी राहिली
आमिरने अभिनेत्री श्रीदेवी यांच्याविषयी एक आठवण सांगितली. तो म्हणाला, श्रीदेवी यांचा खूप मोठा चाहता होतो. त्या खूप आवडायच्या. त्यांच्याकडे पाहण्याची माझी हिंमतच व्हायची नाही. त्यांच्या डोळ्यात पाहिल्यावर मी मोहित व्हायचो. त्यामुळे कुठल्या कार्यक्रमात त्या भेटल्याच तर त्यांच्याशी नजरानजर टाळायचो. त्यांना कळलं तर.. ही भीती वाटायची. त्यांच्याबरोबर चित्रपटात काम करू शकलो नाही, ही खंत मनात कायम राहणार आहे. श्रीदेवीसारखं कलावंत व्यक्तिमत्त्व आजवर पाहिलं नाही. एकदा दिग्दर्शक महेश भट्ट यांना, ‘रोमन हॉलिडे’ नावाच्या रोमँटिक, विनोदी हॉलीवूडपटावर आधारित एक चित्रपट बनवा. त्यात मला आणि श्रीदेवी यांना कलाकार म्हणून घ्या, असे म्हणालो होतो. त्या हॉलीवूडपटात ग्रेगरी पेक आणि ऑड्री हेपबर्न यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. महेश भट्ट यांनी चित्रपट बनवला. तो होता ‘दिल है की मानता नही’. पण त्या चित्रपटात पूजा भट्टने माझ्याबरोबर काम केले. त्यामुळे श्रीदेवी यांच्याबरोबर चित्रपट करायचं स्वप्न अपूर्णच राहिलं.
‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट विविध आर्थिक स्तरांतील प्रेक्षकांनी पाहिला पाहिजे. भारतात ‘इकॉनॉमिकल थिएटर्स’ ही संकल्पना यायला हवी. प्रत्येकाला त्याच्या आर्थिक स्तराप्रमाणे चित्रपट पाहता आला पाहिजे. प्रत्येक प्रेक्षकाला चित्रपटगृहात जाऊ न चित्रपट पाहणे परवडणारे नसते. त्यामुळे आर्थिक स्तरानुसार विभाजन करायला हवे. तिकीट दर कमीच असावे या मताचा मी आहे. भारतात आर्थिक स्तरानुसार परवडणारी, मध्यमवर्गीय आणि आरामदायी अशी वर्गवारी असलेली चित्रपटगृहं असावीत, असं माझं स्वप्न आहे. त्यामुळे प्रत्येकाला चित्रपट पाहण्याची संधी मिळेल.
आमिर खान