महिनाभर एखाद्या कलाकृतीवर काम करायचे, संहिता, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय याचा अभ्यास करून एकांकिका साकारायची आणि परीक्षकांच्या निकालाची वाट पहायची ही सादरकर्त्यांची प्रक्रिया. मात्र आपण सादर केलेले सर्वागाने परिपूर्ण आहे का? आपल्याला जे सांगायचंय ते प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचलंय का? काही त्रुटी राहिल्यात का?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात ती या स्पर्धाचे परीक्षण करणाऱ्या अनुभवी परीक्षकांकडून. गेली चार वर्षे नीळकंठ कदम, डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी वेगवेगळ्या केंद्रांवर लोकांकिका स्पर्धेचे परीक्षण केले. अभिनेत्री अश्विनी गिरी यांनी पुण्यातील एकांकिका या स्पर्धेच्या निमित्ताने पाहिल्या. भाषा, विषयाचे सादरीकरण, संहिता यानुसार प्रत्येक केंद्रावर या परीक्षकांना बदल जाणवला. पिढी बदलत होती तसा विचार बदलत होता. सादरीकरणाचे स्वरूप बदलत होते. तरुणांचे विचार त्यांनी लोकांकिका स्पर्धेच्या स्वरूपात अनुभवले. या प्रेक्षक आणि परीक्षक या दोन्ही भूमिकेत एकांकिका पाहताना नेमकं काय गवसलं हे त्यांच्याच शब्दात.

‘विषयात सामाजिक जाणिवांचे भान’

‘लोकसत्ता’च्या लोकांकिका स्पर्धा हा समृद्ध आणि संपन्न करणारा अनुभव आहे. ही संपन्नता सर्व अंगाने आहे. भाषा, त्याचा प्रादेशिक लहेजा, त्या त्या भागातील अनुभव विश्व तरुण रंगकर्मी मांडत असतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय रंग या स्पर्धेत पाहावयास मिळतात. समकालीन प्रश्न, व्यक्तीच्या जीवनातील पेच आणि दुष्काळ, शेतकरी आत्महत्या असे ज्वलंत प्रश्न असणाऱ्या संहिता गेल्या चार वर्षांत अनेक महाविद्यालयातील नव्या रंगकर्मीनी हाताळल्या. केवळ एवढेच नाही तर धार्मिक परंपरा आणि जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळे निर्माण झालेली गुंतागुंतही तरुण हाताळताना दिसतात. ही स्पर्धा केवळ पुणे, मुंबई या मोठय़ा शहरांपर्यंत राहिलेली नसल्याने ग्रामीण भागातील एखादा संघ त्याच्या भाषेच्या लहेजासह सादरीकरण करतो.  त्या भागातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय मतांवरची प्रतिक्रिया म्हणून ती एकांकिका भाष्य करून जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नृत्य विभागाने सादर केलेली ‘माकडं’ ही एकांकिका असेल किंवा अण्णा भाऊ साठे यांच्या कथेचं केलेले ‘मसनातलं सोनं’ सारखा प्रयोग असेल तो नवी दृष्टी देणारा आहे. मुंबई, पुणे या भागांतील प्रयोगशीलता आता ग्रामीण महाराष्टातूनही तेवढय़ाच ताकदीने पुढे येत आहे, असे या स्पध्रेतून दिसून येत आहे. गेल्या वर्षीची ‘सॉरी परांजपे’ ही पुणे केंद्रातून आलेली एकांकिका भेदक आणि परखड होती. ‘अशी ही श्यामची आई’ ही मुंबई केंद्रातून आलेली एकांकिका वास्तवलक्ष म्हटली पाहिजे. नागपूरच्या केंद्रातून आलेली ‘कुरूप’ नावाची एकांकिका किंवा वारीच्या अनुभवाच्या आधारे मानवी नात्यांवर भाष्य करणारी ‘दृष्टांत’ ही एकांकिका अजूनही लक्षात आहे.   ग्रामीण भागातून येणारे रंगकर्मी सामाजिक, राजकीय भान तर देतातच शिवाय नृत्य, नाटय़, काव्य याचे मिश्रण ग्रामीण भागातील रंगकर्मीमध्ये दिसून येते. चिकित्सा करणारे आणि विचाराचे खंडण-मंडण करणारे जसे ‘लोकसत्ता’चे स्वरूप आहे तसेच स्वरूप या स्पध्रेचेसुद्धा आहे, असे म्हणावे लागेल.

-निळकंठ कदम

‘ग्रामीण भागातील निरागसता दिसते’

‘लोकांकिका’साठी गेली दोन वर्षे मी परीक्षक म्हणून काम केले आहे. ‘लोकसत्ता’च्या लौकिकाला साजेशी अशीच ही स्पर्धा आहे, असे मी आवर्जून म्हणेन. या स्पर्धेच्या आयोजनापासून प्रत्येक गोष्ट उत्तम होते. मी औरंगाबाद केंद्रांवरही काम केले. स्पर्धेतील एकांकिका वेळेत सुरू झाल्या नाहीत, परीक्षक म्हणून गैरसोय झाली असा अनुभव कधीच आला नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षक म्हणून पूर्ण स्वातंत्र्य मिळते. अलीकडे बऱ्याच एकांकिका स्पर्धा होत असतात. त्यामुळे परीक्षक म्हणून मला पुणे, मुंबईत काम करण्याची संधी मिळते. ग्रामीण भागात इतके मोठे व्यासपीठ महाविद्यालयीन रंगकर्मीना मिळत नाही. ‘लोकांकिका’ स्पर्धेत औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर अशा केंद्रांतूनही उत्तम प्रतिसाद असतो, ही गोष्ट आवर्जून नमूद करावी लागेल. या केंद्रावर स्पर्धा होत असल्याने संबंधित ठिकाणी कशा पद्धतीने नाटक होत आहे, याचा अनुभव आम्हाला मिळतो. ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या नाटकातील निरागसतेला या स्पर्धेने व्यासपीठ दिले आहे. पुणे-मुंबईतील विद्यार्थ्यांना स्पर्धा कशी करायची, पारितोषिके मिळवण्यासाठी कसा विषय निवडायचा, मांडणीत काय गिमिक केले तर प्रभाव पडेल याची गणिते कळली आहेत. ग्रामीण भागातील नवखे कलाकार हे अशा स्पर्धामुळे टप्प्याटप्प्याने शिकत असतात. लोकांकिका स्पर्धेत होणाऱ्या ग्रामीण भागातील एकांकिकांमधून निरासगता पहायला मिळते. त्या मुलांना गिमिक्स कळत नाहीत, त्यांना बक्षिसापेक्षा नाटक करणे जास्त महत्त्वाचे वाटते, हे परीक्षक म्हणून मी पाहिले आहे. या एकांकिकांची गुणवत्ता शहरातील स्पर्धा करणाऱ्या एकांकिकांच्या बरोबरीची आहे. लोकांकिकाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो, ते पाहून असे वाटते की विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता आणि उत्साह आहे. या स्पर्धेत सादर होणाऱ्या एकांकिकांच्या विषयात वैविध्य असते, मांडणीत वेगळेपणा असतो. अंतिम निकालातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्थान मिळवल्यामुळे त्यांना ही स्पर्धा अधिक महत्त्वाची वाटते.

-अश्विनी गिरी

‘नवीन पिढीचे प्रयत्न कौतुकास्पद ’

महानगर वगळता ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रयोगांत प्रादेशिकतेचे दर्शन होते. अस्सल ग्रामीण बाज, ठसका येथे पहायला मिळतो, त्यातील  साधेपणाही  थेटपणाने भिडणारा. साधेपणात सौंदर्य असते याचे सुगम्य दर्शन यातून घडते. त्यांचा अवकाश, त्यांचे प्रश्न रसरशीतपणे पहायला मिळतात. उदाहरण सांगायचे झाले तर सोलापूर, पंढरपूर भागांतून ‘वारी’सारखे विषय स्वाभाविकपणे दिसतात तर कोकणात दशावतार परंपरा दिसून येते. याचे कारण त्यातील कलाकारांवर झालेल्या नाटय़ संस्काराचा तो नैसर्गिक भाग असतो. ‘खटारा ‘ ‘तक्षक ‘, ‘दप्तर‘, ‘माणसं’ अशा अनेक एकांकिकामधून याचा प्रत्यय आला आहे. महानगरातील तरुणाई झगमगाट, गिमिक्स यांवर भर देते. त्यांच्यावर पश्चिमेकडील प्रभाव दिसतो. ग्रामीण भागातून आलेल्या कलाकारांच्या सादरीकरणात कुठेही उणेपणा, न्यूनत्व जाणवत नाही. तोडीस तोड सादरीकरण होते. यामुळे अंतिम स्पर्धेसाठी सर्व केंद्रातून एकांकिका सादर होतात तेव्हा त्यातील एखाददुसरी उत्तम आणि बाकीच्या खराब अशा दऱ्या येथे दिसत नाहीत. त्यामुळेच अंतिम फेरी अटीतटीची होते, तिची रंगत उत्तरोत्तर वाढत जाते. लोकांकिकामधून कलाक्षेत्रात पुढे जाण्याची ऊर्मी बाळगणाऱ्यांना एक चांगले व्यासपीठ महाविद्यालयीन तरुणांना उपलब्ध झाले आहे.  हे सारे नजरेसमोर  घडत असते. वेगळे काही सांगायची गरजच उरत नाही. ‘लोकसत्ता’सारख्या प्रभावी माध्यमातून विलोभनीय प्रसिद्धी होत असल्याने कोणत्या केंद्रात कोणते सादरीकरण झाले हे घरबसल्याही कोणालाही समजते. कमी काळात ‘लोकसत्ता’ने या उपक्रमात मोठा पल्ला गाठला आहे. जाणकारांचेही याकडे बारीक लक्ष असते. यामुळेच या स्पर्धेत सादर होणाऱ्या एकांकिका या ८० टक्के नव्या आणि ताज्या दिसतात. त्यासाठी नवी पिढी करीत असलेले प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत.

– डॉ. अनिल बांदिवडेकर

Story img Loader