लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेचा जल्लोष विविध केंद्रांवर सुरू आहे. काही ठिकाणी विभागीय अंतिम फेरीतून महाअंतिम फेरीचे शिलेदार गवसले आहेत तर काही केंद्रांवर विभागीय फेऱ्या सुरू आहेत. विभागीय प्राथमिक आणि अंतिम फेरीतून निवड झालेल्या एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम फेरीत सादर होतील. विभागीय प्राथमिक फेरीत विविध आठ केंद्रांवर सादर झालेल्या लोकांकिकांमध्ये परीक्षकांना वेगळेपण जाणवले. लोकांकिकांचे परीक्षण केलेल्या काही परीक्षकांनी त्याविषयी निरीक्षण मांडले. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या ‘अस्तित्व’च्या रवी मिश्रा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

‘नाटक माध्यमाविषयी विद्यार्थ्यांना जाण’

लोकसत्ता लोकांकिकासाठी परीक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव फारच छान होता. अत्यंत उत्तम पद्धतीने आयोजन केले होते. मराठवाडा किंवा आजूबाजूच्या परिघात मुलांना नाटकाविषयी तळमळ आहे, नाटक या माध्यमाविषयीची जाणही आहे, हे या प्राथमिक फेरीत पाहायला मिळाले. या मुलांना नाटक करायचे आहे, अभिव्यक्त व्हायचे आहे. हे त्यांच्या उत्साहातून, सादरीकरणांतून दिसत होते. त्यांच्यामध्येही अस्वस्थपणा आहे, बंडखोरी आहे. त्यांच्या सादरीकरणांमध्ये प्रामाणिकपणा आहे. आपल्या मनातल्या भावना नाटकातून मांडता येतील, हे त्यांना कळते आहे. त्यांच्यात उत्तम अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आहेत. त्यांच्या एकांकिकेतील भाषा, तंत्र काय आहे हे पाहावेसे वाटत नव्हते. अर्थात स्पर्धा म्हणून विचार करणे भाग होते. पण उत्तम एकांकिका पाहायला मिळाल्या. ज्या एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या नाहीत, त्यांच्यात काहीतरी उणीव होती, तंत्रामध्ये काहीतरी कमतरता होती. पण आशय आणि विषयात त्या एकांकिका कुठेही कमी होत्या असे अजिबातच नाही. त्यांचे विचार समकालीन आणि आधुनिक आहेत, हेही एकांकिकांमधून जाणवत होते. या भागातील विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर कमी असूनही नाटक करण्यासाठीची त्यांची धडपड कौतुकास्पद आहे. ‘लोकसत्ता’ने विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेले हे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. लोकांकिका या उपक्रमाचा अधिक मोठय़ा प्रमाणात वापर व्हायला हवा. कारण, अशी संधी वारंवार मिळत नाही. औरंगाबादमध्ये पाहिलेल्या एकांकिकांमधील काही एकांकिका पुण्यात आणता येतील का, त्यांना अन्य कोणत्या व्यासपीठावर संधी देता येईल का, या दृष्टीने माझा विचार सुरू आहे. आपल्या अभिव्यक्तीसाठी विद्यार्थी जी धडपड करत आहेत, ते नक्कीच कौतुकास्पद आहे.

गिरीश परदेशी, परीक्षक औरंगाबाद प्राथमिक फेरी

‘विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव’

वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या रूपात अनेक नवीन कलाकार दडलेले असतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना समोर आणण्याचे महत्त्वाचे काम ‘लोकसत्ता’ आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन लोकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. एकांकिकांची संहिता कधी परिपूर्ण तर कधी पात्रांचे सादरीकरण कमकुवत असते. कधी सादरीकरण बळकट असते तर संहितेत दम नसतो. मात्र संहिता, अभिनय, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजनेची भट्टी जमली की कोणत्याही स्पर्धेत नाटक बाजी मारतेच. अभिनय करताना एक मुद्दा कायम लक्षात ठेवला पाहिजे, नाटक करणे म्हणजे नाटकीपणाने ते करणे असे नव्हे. कलाकाराला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेता आला पाहिजे. कलावंतांच्या अभिनयावर प्रेक्षक फिदा झाले पाहिजेत. प्रेक्षक खिळून राहायला हवेत, एवढा सकस अभिनय करता यायला हवा. त्यासाठी मेहनत, सराव, अभ्यास हवा. कलाकारांना नाटकातून नेमके काय पोहोचवायचे आहे? काय सांगायचे आहे? ते थेट कळायला हवे. नागपूर प्राथमिक फेरीत सादर झालेल्या सर्वच एकांकिका छान वाटल्या. महाविद्यालयांनी ठेवलेला विश्वास विद्यार्थ्यांनी सार्थ केल्याचे जाणवले. थोडे फार कमी जास्त असते, पण त्याला सुधारणेला वाव असतो. एखाद्या एकांकिकेने आधी कुठे पुरस्कार पटकावला असेल म्हणून लोकांकिकेतही तशाच तोडीचे सादरीकरण झाले असे म्हणता येत नाही. काही नवीनसंकल्पना होत्या. काही जुन्याच होत्या पण अभिनयात दम होता तर एक-दोन एकांकिकांमध्ये नेपथ्य चांगले असताना पात्रांचे संवाद कळत नव्हते. काही विषय नवीन तर जुने असले तरी रटाळ नव्हते. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत दर्जा पाहायला मिळेल.

भाग्यश्री चिटणीस, परीक्षक, नागूपर विभागीय प्राथमिक फेरी

‘तरुणाईशी जोडून घेण्याचा उद्देश सफल’इतर स्पर्धाप्रमाणे कलाकारांना आयोजकांकडे यावे लागत नाही, तर आयोजक स्वत: कलाकारांकडे येतात, हेच या स्पर्धेचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठीची मुलांची धावपळ वाचते. ‘लोकसत्ता लोकांकिका’चे वेगळेपण हे आहे की महाराष्ट्रभरातून शेकडो विद्यार्थी यात सहभागी होत असतात. गेल्या पाच वर्षांत बरेच बदल लोकांकिकेच्या सादरीकरणामध्ये झाले आहेत. तांत्रिकदृष्टय़ा सक्षम अशा एकांकिका महाविद्यालयीन रंगकर्मी घेऊन येत आहेत. तरुणांशी स्वत:ला जोडून घेणे हा लोकांकिका स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. गेल्या पाच वर्षांत तो साध्य झाला आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला इथे एक सामाजिक व्यासपीठ उपलब्ध होते. ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही खऱ्या अर्थाने ‘लोकांची’ स्पर्धा आहे, त्यामुळे या स्पर्धेत माझा सहभाग असल्याने अभिमान वाटतो.

रवी मिश्रा, अस्तित्त्व

‘प्रत्येक एकांकिकेत नावीन्य’ 

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी लोकसत्ता लोकांकिका ही महत्त्वाची स्पर्धा आहे. एकांकिका स्पर्धेच्या ठरलेल्या पठडीपेक्षा ही स्पर्धा वेगळी होते हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच विद्यार्थीही उत्साहाने सहभागी होतात. लोकसत्ता या स्पर्धेचे आयोजक असल्याने विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळते, स्पर्धेला लाभलेल्या प्रायोजकांमुळे चांगल्या कलाकारांना झटपट संधी मिळण्याचीही शक्यता असते. पुण्यातील प्राथमिक फेरीविषयी सांगायचे, तर प्रत्येक एकांकिकेत विषयाचे नावीन्य होते. त्यामुळे पाहण्यात उत्साह टिकून होता. विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न सुंदर होते. त्यासाठी त्यांनी कष्टही घेतले होते. त्यांनी जे काही केले, ते विचारपूर्वक होते. कलाकारांना एकांकिकेतून जे म्हणायचे होते, त्याच्याशी ते घट्ट चिकटून होते. काही एकांकिका तंत्राच्या आहारी गेल्याचे जाणवले. खरं तर एकांकिका, नाटक करताना संहितेवर अधिक भर असायला हवा. कारण कोणत्याही तंत्राची मदत न घेता उत्तम नाटक करता येते. म्हणून संहिता आणि अभिनयावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. तंत्रात अडकण्याची अजिबातच गरज नाही. तंत्राकडे अधिक लक्ष देताना अभिनयातील महत्त्वाचे अंग असलेल्या वाचिक अभिनय, आवाजातील चढ-उतार, आवाजाची पट्टी याकडे दुर्लक्ष झाले. तसे करून चालत नाही. काही एकांकिकांमधील विद्यार्थ्यांनी विषयानुसार अभ्यास करून लेखन, सादरीकरण केले. जे करायचे आहे, ते समजून करण्याची त्यांची धडपड जाणवली. मात्र, नाटक या माध्यमाची म्हणून असलेली समज जाणवली नाही. अर्थात ती अनुभवाने येईल. त्यासाठी इतरांच्या एकांकिका, बाहेरून येणारी नाटकेआवर्जून पाहिली पाहिजेत. म्हणजे नाटकाच्या अवकाशात काय आणि कसे घडते हे समजून घेता येईल.

शुभांगी दामले, परीक्षक पुणे विभागीय प्राथमिक फेरी

(संकलन – नमिता धुरी, ज्योती तिरपुडे, चिन्मय पाटणकर)