सिनेमा पटकथाकाराचा असतो याची जाणीव आपल्या सिनेसंस्कृतीला आजवर ठळकपणे झाली नाही. नायक-नायिका आणि त्यानंतर संगीतकार-गायक-गायिकांना आपल्या सिनेसृष्टीने जे झगमगते वलय मिळवून दिले, तेवढे दिग्दर्शकांच्याही वाटय़ाला आले नाही. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये पटकथा लिहिणारे कलाकारच आज बॉलीवूडवर साम्राज्य गाजवत आहेत. नेटफ्लिक्सच्या माध्यमातून जगासमोर भारताच्या वास्तववादी कलाकृतींचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
तरीही सर्वसामान्य प्रेक्षकांना आजही माहिती असतो तो सिनेमाचा नायक, खलनायक. चित्रपटाचा डोलारा उभा करणारा लेखक त्याच्या खिजगणतीतही नसतो. याउलट हॉलीवूडमध्ये चित्रपटाच्या लेखकाला सेलिब्रेटीपद प्राप्त असते आणि चित्रपट गाजला तर त्या लेखकाचा उदोउदो केला जातो. स्पीलबर्गपासून कॅमेरॉनपर्यंत आणि नोलानपासून टेरेन्टीनोपर्यंत सर्वच दिग्दर्शक आपल्या सिनेमाची पटकथा स्वत:च लिहितात. काही पटकथाकारांनी चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाहूनही अधिक लोकप्रियता मिळविली. उदाहरणच घ्यायचे तर हॉलीवूड रोमॅण्टिक सिनेमाचा फॉम्र्यूला रचणाऱ्या नोरा एफरॉनच्या नावावर ‘व्हेन हॅरी मेट सॅली’चे सारे यश दिले जाते, चार्ली कॉफमनने लिहिलेल्या सिनेमात कितीही तगडी स्टारकास्ट असली, तरी पटकथाकार म्हणून त्याचे नाव असल्यामुळे सिनेमा पाहिला जातो. ‘बिइंग जॉन माल्कोविच’, ‘अडाप्टेशन’, ‘इटर्नल सनशाइन ऑफ स्पॉटलेस माइंड’ हे चित्रपट त्यात असलेल्या प्रथम श्रेणीच्या हॉलीवूड कलाकारांसाठी नाही, तर निव्वळ कॉफमनच्या पटकथेतील कारागिरीसाठी ओळखले जातात.
गेल्या दहा वर्षांत हॉलीवूडच्या पटकथाकारांच्या पटलावर डिआब्लो कोडी हे नाव कॉफमनइतकेच आदराने घेतले जात आहे. अतिस्त्रीवादी असलेल्या या लेखिकेने आपल्या उमेदवारीच्या काळात स्ट्रीपक्लबमध्ये काम करून वेचलेल्या अनुभव बेगमीच्या आधारे ब्लॉग लेखन सुरू केले. त्यानंतर स्ट्रीप क्लबमधील आत्मकथा पुस्तकरूपात आणली. २००७-८ च्या काळात तिने लिहिलेल्या आणि जेसन राइटमनने दिग्दर्शित केलेल्या जुनो या चित्रपटाने इतकी खळबळ माजविली की डिआब्लो कोडीच्या पहिल्याच पटकथेला ऑस्कर पुरस्कार मिळाला. हायस्कूलमधल्या गर्भवती मुलीची ही ट्रॅजिकॉमेडी विसरली जाण्याच्या आतच तिने २०११ साली दिग्दर्शक राइटमनसोबत ‘यंग अॅडल्ट’ नावाचा आणखी एक सिनेमा लिहिला. चार्लीझ थेरॉन या अभिनेत्रीने यात साकारलेली यंग अॅडल्ट कादंबऱ्या दुसऱ्यांच्या नावे लिहून देणारी ननायिका आवर्जून पाहण्यासारखी आहे. मद्यपी,ओवाळून टाकलेली ही स्त्री व्यक्तिरेखा आणि तिच्या निग्रही कारवायांनी चित्रपट रंगत गेला आहे.
नोरा एफरॉन, एलिझाबेथ गिल्बर्ट, मिरांडा जुलै, गिलियन फ्लिन आणि पॉला हॉकिन्स या लेखिका-पटकथाकारांनी गेल्या काही वर्षांत ज्या करडय़ा नायिका उभ्या केल्या आहेत, त्याहून कित्येक कोस पुढे असलेली नायिका डिआब्लो कोडी हिने उभी केली आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ टॅरा या तिच्या टीव्ही मालिकेच्या यशानंतर मधल्या काही वर्षांच्या विरामानंतर तिने नुकताच ‘टली’ नावाच्या सिनेमाद्वारे पुनरागमन केले आहे. दिग्दर्शक अर्थातच पुन्हा जेसन राइटमन आणि अभिनेत्री पुन्हा चार्लीझ थेरॉन.
‘टली’ या चित्रपटाची गोष्ट आकर्षक नसली, तरी जे सांगायचे ते अत्याकर्षक पद्धतीने आणि डिआब्लो कोडीछाप विनोदाने आले आहे. अमेरिकी उच्च मध्यमवर्गातील पालकत्वाच्या एका टप्प्याला कथारूपात बसविण्याचा हा प्रयत्न आहे.
चित्रपट सुरू होतानाच दिसते ती मालरे (चार्लीज थेरॉन) ही दोन मुलांच्या संगोपनात अडकलेली आणि लवकरच तिसऱ्या अपत्याला जन्म देण्यास सज्ज झालेली अमेरिकी गृहिणी. दिवसेंदिवस उग्र होत चालल्यामुळे शाळेत चिंतेचा विषय बनलेल्या मुलाला शांत करण्यापासून ते मुलगी आणि नवऱ्याच्या साऱ्या गरजा पूर्ण करीत गर्भार अवस्थेतही धडपडत राहणारी मालरे थकून जाते. तिच्या गडगंज श्रीमंत भाऊ क्रेग (मार्क डुप्लास) तिला होणाऱ्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी दाई पाठवून देण्याची व्यवस्था करतो. सुरुवातीला ती त्यास नकार देते. मात्र बाळंत झाल्यानंतर तिसरे अपत्य आपत्तीसारखे तिचे जगणे बिघडवून टाकते आणि तिचे आयुष्य आधीपेक्षा खडतर बनून जाते. या दरम्यान भाऊ पाठवणार असलेल्या दायीला ती बोलावून घेते. टली (मॅकेन्झी डेव्हिस) नावाची ही अत्यंत तरुण दायी तिचे आयुष्य अल्पावधीत सहजसोपे करून ठेवते.
तिचे मुलांच्या संगोपनात हरविलेले स्वत:चे जगणे पुन्हा सुरू होते. काही दिवसांतच ती आनंदी दिसू लागते. तिच्या सतत होणाऱ्या संतापाची स्थिती शांततेमध्ये परावर्तित होते. टली आणि मार्गो सख्ख्या मैत्रिणी होतात. मार्गोसाठी टली अनेक धाडसी गोष्टी करून दाखविते. एका रात्री अचानक टली मार्गोला घेऊन दूरच्या शहरात जाते. दोघी मौजमजा करतात आणि परतीच्या प्रवासात टली आपण काम सोडत असल्याचे मार्गोजवळ स्पष्ट करते. मार्गो चालवत असलेल्या गाडीला अपघात होतो. अपघातातून मार्गो पूर्णपणे बचावते, मात्र त्यातून एक वेगळेच सत्य समोर येते. मार्गोच्या भूतकाळातील मानसिक दु:स्थितीचे.
पाल्य संगोपनाच्या जंजाळातून मार्गोने तयार केलेल्या जगाचे प्रतिरूप आपल्यासमोर आलेले असल्याने हा चकवेदार शेवट गोष्टीला गमतीशीर गांभीर्य देतो.
डिआब्लो कोडीने वास्तव जगातील विवंचनेला फॅण्टसीच्या आधारे केलेली गंमत ही इथली जमेची बाजू आहे. अमेरिकेत शिल्लक असलेल्या मजबूत कुटंब रचनेतील आत्यंतिक बारीक तपशील इथे पाहायला मिळतात. रविवारच्या जेवणानिमित्ताने होणाऱ्या भेटी, व्हिडीओगेममध्ये अडकलेला नवरा, सतत काहीतरी खेळणारी मुले, कराओकेवर गाणारे कुटुंब, बाळासह टीव्हीवर भलताच कार्यक्रम पाहणारी मार्गो आणि टलीसोबतच्या तिच्या गप्पा या सगळ्या विसंगत वाटणाऱ्या गोष्टींमध्ये डिआब्लो कोडीला सांगायचे असलेले सुसंगत सूत्र आहे. ते कळाले, तर या पटकथाकाराच्या सिनेमाचे आपल्याकडेही मोठे चाहते पाहायला मिळतील.