रसिका शिंदे

सर्वसाधारणपणे चित्रपटातील नायक किंवा मुख्य अभिनेता हा दिसायला देखणा किंवा अलीकडच्या काळातील सिक्स पॅक असणारा अशीच प्रतिकृती आपल्या डोळय़ांसमोर येते. मात्र केवळ आपल्या अभिनयाच्या ताकदीवर प्रेक्षकांना स्वत:ची दखल घ्यायला लावणारे काही मोजकेच अभिनेते आहेत. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर भूमिका असो, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मराठी अभिनेता भरत जाधव हा अशा मोजक्या अभिनेत्यांपैकी एक. ‘सही रे सही’, ‘ऑल द बेस्ट’, ‘मोरुची मावशी’ अशा हाऊसफुल्ल नाटकांची रांग लावणारे भरत जाधव पुन्हा एकदा बऱ्याच काळानंतर मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करत आहेत. गेली काही र्वष चित्रपटसृष्टीपासून ठरवून लांब राहिलेले भरत जाधव आता ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘धोंडी-चंप्या’ या चित्रपटातून पुन्हा एकदा मायबाप प्रेक्षकांना हसवायला येत आहेत.

Nalasopara, girl was raped Nalasopara,
वसई : नालासोपार्‍यात १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, अश्लील छायाचित्राआधारे उकळली २५ हजारांची खंडणी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन

मनाला भिडणारी चित्रपटाची संहिता असेल तर ती भूमिका वठवण्यास आनंद वाटतो, अशी विचारसरणी असलेल्या भरत जाधव यांनी गेली काही र्वष मराठी चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याच्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. ‘‘२०१३ पासून मी मराठी चित्रपटात काम करायचे बंद केले. त्याच त्याच विषयांवर आधारित चित्रपट करायचा मला कंटाळा आला होता. त्याच भूमिका किती वेगळय़ा पद्धतीने साकारायच्या याचा वीट आल्यामुळे आलेले चित्रपटही मी नाकारत होतो. मी चित्रपटात दिसत नसल्याचे पाहून समाजमाध्यमांवर अशा बातम्याही येत होत्या की मला काम मिळत नाही का? जर अशी परिस्थिती असती तर माझी नाटकेदेखील थांबली असती,’’ असे त्यांनी सांगितले. एक उत्कृष्ट अभिनेता चित्रपटात त्याची भूमिका किती मोठी आहे हे पाहण्यापेक्षा त्या चित्रपटाचे कथानक कसे वेगळे आहे हे पाहतो. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या विषयांचे चित्रपट मिळू लागले असल्याने आता लागोपाठ चित्रपटांचा सपाटाच लावणार असल्याचे भरत सांगतात. ‘कल्ला’, ‘लंडन मिसळ’ हे भरत जाधव यांचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आणखी एका धम्माल चित्रपटाचे चित्रीकरण नागपूरमध्ये सुरू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

अनेक भूमिका आपल्या वाटय़ाला येणं म्हणजे मोठी पर्वणीच असते असे म्हणत मला दिग्दर्शक चित्रपटांत घेतात हीच मोठी गोष्ट असल्याचे मिश्कीलपणे भरत जाधव म्हणतात. ‘मी आजवर सर्वाधिक विनोदी चित्रपट केले, कारण त्या वेळी तसे चित्रपट करणे ही माझी गरज होती. चित्रपटात काम मिळत असल्यामुळेच माझे घरदार चालत होते. मात्र नंतर कालांतराने माझी चित्रपटांची भूक संपली, पण नाटकाची भूक ही तितकीच होती, किंबहुना ती वाढत गेली, अशी प्रामाणिक कबुली भरत यांनी दिली. बराच काळ भरत जाधव यांचा चेहरा मोठय़ा पडद्यावर न दिसल्यामुळे लेखक, दिग्दर्शक दखल घेत त्यांना चित्रपटांत काम करण्यासाठी विचारणा करत असल्याचेही ते सांगतात.

परदेशातही मराठी नाटकांचे चाहते..

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारच परदेशवारी करत असतात हा समज गेल्या काही काळात मराठी कलाकारांनी खोडून काढला आहे. इतकेच नाही तर फक्त हिंदी चित्रपटांचेच चित्रीकरण परदेशात केले जाते ही संकल्पनाही मराठी चित्रपटसृष्टीने मोडून काढली आहे. यात अनेक मराठी कलाकारांपैकी अग्रस्थानी नाव येते ते म्हणजे भरत जाधव यांचे. २०१८ पासून अमेरिका दौरे वाढल्याचे ते सांगतात. परदेशातही मराठी नाटकांचा चाहता वर्ग असल्याने तिथे नाटकांचा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. दरवर्षी तिथे एकतरी नाटक घेऊन यावे असा अट्टहास अमेरिकेच्या प्रेक्षकांचा असल्याचे भरत सांगतात. त्यामुळे मी मोठय़ा पडद्यावर जरी दिसत नसलो तरी नाटकात काम करत असतो आणि माझे सुखी आयुष्य जगत असतो, असे ते सांगतात.

हल्ली सगळे कलाकार ओटीटीला प्राधान्य देतात. भरत लवकरच  ‘स्कॅम २’ या वेब मालिकेत भ्रष्टाचारी व्यक्तीची भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेबद्दलचा किस्सा सांगताना ते म्हणतात, ‘‘मी या वेब मालिकेचे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांना विचारले की, माझी निवड या भूमिकेसाठी कशी केली? यावर मी तुझी सगळी कामे पाहिली आहेत. मात्र मराठीत तू अशी भ्रष्ट व्यक्तिरेखा केली नसल्याने तू हे पात्र उत्तम साकारशील असा मला विश्वास होता म्हणून तुझी निवड केली असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मराठीच नव्हे तर हिंदीतील दिग्दर्शकही आपल्या मराठी कलाकारांची कामे पाहून त्यांना संधी देतात याचा आनंद होतो,’’ असे ते सांगतात.

केदार-भरत-अंकुश हे त्रिकूट पुन्हा येणार भेटीला

प्रत्येक क्षेत्रात आपले जवळचे मित्र असतातच आणि एखादे तरी त्रिकूट हे नावाजलेले असतेच. असेच मराठीतील नावाजलेले त्रिकूट म्हणजे केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी. आजवर या तिघांनीही एकत्रित अनेक एकांकिका, मालिका आणि नाटकांत काम केले आहे. मात्र पुन्हा एकदा हे त्रिकूट प्रेक्षकांना दिसेल का, या प्रश्नावर लवकरच केदार शिंदे दिग्दर्शित ‘कल्ला’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे भरत यांनी सांगितले. या चित्रपटात भरत जाधव, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा हे  विनोदवीर भन्नाट कलाकृती घेऊन येणार आहेत. तसेच, ह्यालागाड आणि त्यालागाड या गावाची नवी गोष्ट पुन्हा एकदा भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव ‘जत्रा’ चित्रपटातून घेऊन येणार असल्याचेही भरत यांनी सांगितले. 

केवळ स्वत:पुरतीच मैत्री न ठेवता एकमेकांची कुटुंबेही एकत्रित येत एक नवं विश्व तयार होतं ती खरी मैत्री. ‘‘केदार, मी आणि अंकुश फार चांगले मित्र आहोतच. चुकलो तर कान धरणारे आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे मित्र आहोत. एकमेकांच्या कुटुंबाचा विश्वास असणारे मित्र आहोत. आणि मैत्रीचा एक काळ असतो.. कधीतरी त्यात खंड पडू शकतो, पण आमच्या मैत्रीचा काळ इतका पुढे गेला आहे की आमची मैत्री किती घट्ट आहे हे आम्ही एकत्रित करत असलेल्या चित्रपटांत अथवा नाटकांत प्रतिबिंबित होते. आणि हेच आमच्या मैत्रीचे यश आहे,’’ असे भरत सांगतात.

वाहिन्यांवर टीआरपीचा खेळ सुरू

नाटक, चित्रपट, वेब मालिकांबरोबरच भरत जाधव यांनी मालिकांमध्येही नानाविध भूमिका साकारल्या आहेत. ‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये विनोदी भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. पुन्हा एकदा मालिकांकडे वळावेसे वाटत असल्याची इच्छा भरत जाधव यांनी व्यक्त केली असून आवडती संहिता हातात यावी असेही ते पुढे म्हणतात. मात्र सध्या वाहिन्यांवर टीआरपीचा खेळ सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोणत्या वाहिनीवर कोणत्या वेळेत कोणता कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचा टीआरपी किती आहे हे पाहण्यात चांगला विषय मांडायचा राहतो. आणि आपल्या वाहिनीवर त्या वेळेत तशाच प्रकारचा कार्यक्रम सादर करायची शर्यत लागते असे भरत म्हणतात. त्यामुळे सर्जनशीलता खडडय़ात गेली आहे आणि मधल्यामध्ये लेखकांचे भजे होत असल्याच्या विदारकतेकडेही त्यांनी लक्ष वेधले.