भक्ती परब

ही गोष्ट करायला तुला अजिबात जमणार नाही, असं कोणी आपल्याला म्हटलं, की आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी अधिक चेव चढतो. हुरूप येतो. समोरच्याने आपल्या बाबतीत केलेले विधान पोकळ होते, खोटे होते हे सिद्ध करण्यासाठी आपण प्राण पणाला लावतो. या प्रवासात कधी आपण निर्विवादपणे जिंकतो, तर कधी ती गोष्ट साध्य करण्यासाठी आजूबाजूला इतकी उलथापालथ करतो, की समोरचा नाइलाजाने उसासे टाकत म्हणतो, हो गं बाई करशील गं तू, तुला काहीही अशक्य नाही. असाच आशय घेऊन आलेली ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ ही मालिका सध्या चर्चेत आहे.

मालिकेतील अक्षत जिंदल आणि गुड्डन गुप्ता या दोघांच्या मुख्य भूमिकांभोवती मालिका फिरते. गुड्डनचं लग्न अक्षत जिंदलशी झाल्यामुळे तिने भारतातील सगळ्यात तरुण सासू असा लौकिक मिळवला आहे. हे तरुण सासू काय प्रकरण आहे? त्यासाठी मालिकाच पाहा. तर या दोघांची व्यक्तिरेखा साकारणारे निशांत सिंग मलकानी आणि कनिका मान प्रेक्षकांचे लाडके झाले आहेत. त्यांचं ‘लकीरें’ हे प्रेमगीतही अनेकांना तोंडपाठ झालं आहे, कारण या गाण्यात वर्णन केल्याप्रमाणेच हे दोघे आहेत. त्याचं जमिनीवर पाय रोवून घट्ट उभं राहणं, तर तिचं हवेत उडणं..गुड्डनचा स्वच्छंदी स्वभाव कनिका या अभिनेत्रीने उत्तम दाखवलाय. तसंच खडूस पण तितकाच काळजी करणारा नायक निशांतने अप्रतिम साकारलाय.

याच मालिकेबरोबर झी टीव्हीवर ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’ या मालिकांचा प्रभाव असला तरी ‘इश्क सुभान अल्लाह’, ‘तुझसे है राबता’ या मालिकाही लोकप्रिय ठरल्या आहेत. ‘इश्क सुभान अल्लाह’ ही मालिका ज्येष्ठ लेखक दानिश जावेद यांच्या लेखणीतून उतरलीय. ‘तिहेरी तलाक’ या संकल्पनेवर आधारित एका मुसलमान जोडप्याची गोष्ट प्रेक्षकांनी पसंत केली आहे. ‘तुझसे है राबता’ मालिकेची निर्मिती सोनाली जाफर यांनी केली आहे. सोनाली जाफर आधी लेखिका म्हणून प्रसिद्ध होत्या; परंतु ‘मेरी बहु रजनीकांत’ या मालिकेतून त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यांच्या लेखनाविषयी चांगलं बोलणारे आहेत तसे वाईटही. या लेखिकाबाई बरीच कथानकं पुस्तकांतून किंवा परदेशी मालिका-चित्रपटांतून उचलतात असं बोललं जायचं. ‘तुझसे है राबता’ मालिकाही कुठल्याशा पुस्तकावर बेतलेली आहे, असं वाटतंय; पण राणे, देशमुख, बापट अशी मराठी कुटुंबातली ही गोष्ट हा एक वेगळा सुखद धक्का आहे. मुलीचं सावत्र आईबद्दलचं प्रेम अशी मालिकेची संकल्पना आहे. ‘राजा बेटा’ ही नव्याने दाखल झालेली मालिका ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेसारखीच आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांची ती पाहायची राहून गेली तर हरकत नसावी.

सोनी टीव्हीवरील इतर मालिकांपेक्षा ‘मैं मायके चली जाऊंगी’ आणि ‘ये उन दिनों की बात है’ या दोन मालिका विशेष उल्लेख कराव्याशा आहेत. त्याचं श्रेय या मालिकेच्या लेखक आणि निर्मिती संस्थांना जातं. ‘मैं मायके चली जाऊंगी’ ही मालिका प्रसिद्ध लेखक धीरज सरना यांनी लिहिली आहे. त्यांच्या लेखनातून आजवर १४ मालिका साकारल्या गेल्या. त्यात ‘कहानी घर घर की’पासून ‘थपकी प्यार की’ या मालिकांचा समावेश आहे. ते मुंबईत आले तेव्हा त्यांना अभिनेता व्हायचं होतं. त्यांनी एकता कपूरबरोबर काम करताना काही मालिकांमध्ये छोटय़ा भूमिका करून ती हौसही भागवली; पण त्यांचा मूळ पिंड हा लेखकाचा. कारण त्यामुळे त्यांची ओळख बनली. आता ते निर्मिती आणि लेखन या दोन्ही बाजू सांभाळतायेत. त्यांच्यामुळे खुसखुशीत, प्रभावी आणि नेटके संवाद प्रेक्षकांना ऐकायला मिळतात. तीच जादू त्यांनी ‘मैं मायके चली जाऊंगी’ मालिकेत ओतलीय. वकील आईची आपल्या विवाहित मुलीच्या संसारात ढवळाढवळ हा विषय तसा मराठी प्रेक्षकांसाठी नवीन नाही. वर्षां उसगावकर आणि अशोक सराफ जोडीचा ‘शुभमंगल सावधान’ चित्रपट अनेकांना आठवत असेल, साधारण याच कथानकाच्या जवळ जाणारी ही मालिका आहे, परंतु मांडणी वेगळी आहे.

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘कृष्णा चली लंडन’ आणि ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिका नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळ्या ठरल्यात. ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेची निर्मिती गुल खान हिने केली आहे. ‘कलर्स’ वाहिनीवर ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ मालिकेचे प्रोमो सुरू झाले होते तेव्हा आली एक मालिका घर मोडणाऱ्या बाईचं समर्थन करणारी.. अशा प्रकारे त्याकडे पाहिलं गेलं; पण या मालिकेने लग्नानंतर नवरा-बायकोच्या नात्यात होणारा बदल, भावनिक बंध, लग्नानंतर दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडणं, घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणं असा प्रवास संयतपणे हाताळला. ‘बालिका वधू’ या मालिकेचे लेखक गज्रा कोठारी यांनी ती लिहिली आहे. अभिनेता शक्ती अरोरा, अभिनेत्री द्रष्टी धामी, अदिती शर्मा यांनीही त्या भूमिका समर्थपणे साकारल्या. आता याच मालिकेचं दुसरं पर्व सुरू झालं असून त्यात अनेरी वंजानी, रोहन गंडोत्रा, तेजस्वी प्रकाश आणि कुणाल जयसिंग हे लोकप्रिय कलाकार आहेत. त्यामुळे हे पर्वही लक्षवेधी ठरेल अशी आशा आहे.

‘स्टार भारत’ वाहिनीवरील ‘मुस्कान’ आणि ‘मिमकी मुखिया’ या दोन आवर्जून पाहाव्यात अशा मालिका आहेत. त्यांच्या विषयांसाठी तर जरूर पाहाव्यात. हिंदी मनोरंजन वाहिन्यांवर सध्या वर उल्लेख केलेल्या मालिकांचे नायक-नायिका आणि त्यांचं लेखन करणारी मंडळी प्रभावी असल्यामुळेच या मालिका अभिनय आणि विषयांच्या जोरावर लोकप्रिय ठरत आहेत.

Story img Loader