रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाटककार सुरेश जयराम आणि दिग्दर्शक विजय केंकरे ही जोडी फार्स हा प्रकार हाताळण्यात चांगलीच माहीर आहे. या दुकलीचं नवं नाटक ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस लांडगे’ याच कुळीतलं आहे.

लांडगे अ‍ॅण्ड कोल्हे पब्लिशर्सचे श्री. लांडगे आणि रसिक कोल्हे हे दोघे भागीदार. लांडगेंच्या नव्या घरातलं इंटिरिअर करायला हसमुख हा इंटिरिअर डिझाइनर तीन महिने त्यांच्या घरी ठाण मांडून आहे. त्याचं काम संपता संपत नाही. त्यामुळे लांडगे वैतागले आहेत. त्यांच्या बायकोनंच हसमुखला आणलेलं असल्यानं त्यांना त्याला फार झापताही येत नाही. लांडगेंची धरसोड वृत्तीही याला कारण आहे. कुठलाही निर्णय ठामपणे न घेण्याच्या त्यांच्या स्वभावामुळेही त्याचं फावलं आहे. तशात हसमुखचं त्यांच्या घरातली मोलकरीण मंजुळाशी सूत जुळलंय. तिचा जास्तीत जास्त सहवास मिळावा म्हणूनही तो कामात चालढकल करतोय. लांडगेंचा भागीदार रसिक कोल्हे ही तर भानगडखोरच असामी आहे. सध्या त्याचं मोनिका मॉंडेसा नामक टेलिफोन ऑपरेटर तरुणीशी लफडं सुरू आहे. रसिक आपल्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत असल्याकारणाने त्याची बायको देवयानी हिचं योगा क्लासमधील विश्वास किल्लेदारशी गुटर्गू सुरू आहे.

त्या दिवशी श्रीयुत लांडगे आपल्या बायकोसोबत एका पार्टीला जाणार असल्याचं वर्तमान समजल्यानं रसिक आपल्या प्रेमपात्राला- मोनिका मॅंडोसाला लांडगेच्या फ्लॅटवर घेऊन यायचा बेत आखतो. तसं तो लांडगेला सांगतो. पण लांडगे आपल्या घरी रसिकला ‘तसले’ धंदे करू द्यायला तयार होत नाहीत. खूप मिनतवारी केल्यावर नाइलाजानं ते रसिकला परवानगी देतात. गंमत म्हणजे त्याचवेळी देवयानीही मिसेस लांडगेंना भरीस पाडून ते पार्टीला गेल्यावर दोन तास विश्वास किल्लेदारसोबत मजा करण्याचा मनसुबा जाहीर करते. मिसेस लांडगे तिला अशा कुकर्मासाठी आपलं घर द्यायला स्वच्छ नकार देते. पण देवयानीच्या गळेपडूपणाला अखेरीस तीही बळी पडते. तिकडे हसमुखलाही लांडगे पती-पत्नीच्या गैरहजेरीत मंजुळासोबत मौजमजा करायची असते. त्यांनी तशी तयारीही केलेली असते.

परंतु आयत्या वेळी वेगळीच भानगड उपटते. देवयानीला विश्वास किल्लेदारनं लिहिलेल्या पत्रातलं एक पान चुकून मिस्टर लांडगेंच्या हाती लागतं. आणि आपल्या बायकोची कुणाशी तरी भानगड असावी असा संशय त्याच्या मनात निर्माण होतो. रसिकही त्या पत्रातली भाषा आणि अशा चोरटय़ा संबंधांत अडकलेली व्यक्ती आपल्या नवऱ्याशी वा बायकोशी कशी वागते याचे जे दाखले देतो, ते सगळे लांडगेंना आपल्या बायकोच्या वागण्या-बोलण्यात दिसून येतात. त्यामुळे त्यांचा संशय आणखी बळावतो. तिला याचा जाब विचारण्यासाठी तो पार्टीला जायचं रद्द करतो. आणि मग जो काही गोंधळ उडतो त्याचं नाव- ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस लांडगे’! रसिक, देवयानी व हसमुख तिघंही लांडगे नवरा-बायकोनं पार्टीला जायला हवं म्हणून आकाशपाताळ एक करतात. कारण ऐनवेळी उपटलेल्या या संकटामुळे त्यांनी आपल्या प्रेमपात्रांसोबत ठरवलेली गंमत करायला आता त्यांना मिळणार नसते. बरं, ठरलेली अपॉइंटमेंट रद्द झाल्याचं आपल्या प्रेमपात्रांना कळवायलाही आता वेळ उरलेला नसतो. मिस्टर लांडगे आपल्या बायकोची भानगड शोधून काढण्याकरता इरेस पेटल्यानं या तिघांची भलतीच तारांबळ उडते. या गोंधळातच मिस् ढमढेरे ही ‘बेस्ट सेलर’ लेखिका तिच्या नेहमीच्या प्रकाशकाशी तिचं वाजल्यानं लांडगे अ‍ॅण्ड कोल्हे पब्लिशर्सकडे आपली नवी कादंबरी प्रकाशनासाठी घेऊन येते. सेक्सबद्दल कमालीचा तिरस्कार असलेली मिस् ढमढेरे ‘तशा’ भानगडी करणाऱ्या प्रकाशकाकडे आपलं पुस्तक द्यायच्या विरोधात असते. आणि इथे कोल्हे हा तर भानगडींचा अर्क  असतो. अशा सगळ्या चित्रविचित्र पात्रांच्या एकत्र येण्यातून जो काही हलकल्लोळ माजतो त्याचं मूर्तरूप म्हणजे ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस लांडगे’!

लेखक सुरेश जयराम यांनी हे चावटपणाकडे झुकणारं नाटक त्यातल्या बेतीव गुंतागुंतीसह घटना-प्रसंगांची रंगतदार माळ ओवत उत्तमरीत्या आकारलं आहे. दुसऱ्या अंकात नाटकातल्या गुंतागुंतीची मात्रा त्यांनी इतकी टिपेला नेली आहे, की आपली विचारशक्तीही काही क्षण कुंठित होते. हा सगळा बेतीव मसाला आहे, हे माहीत असूनदेखील आपण त्यात कळत-नकळत गुंतत जातो. दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या सिद्धहस्त हाताळणीलाही याचं श्रेय जातं. परिस्थितीजन्य घटना-प्रसंगांतून व्यक्ती आणि त्यांच्या विरोधाभासी हितसंबंधांची होणारी टक्कर यांतून प्रयोग उत्तरोत्तर फुलत जातो. कलाकारांची विनोदाची समज आणि टायमिंग सेन्स यांची जोड त्यास मिळते आणि एक धमाल फार्सिकल कॉमेडी रंगमंचावर अवतरते. दिग्दर्शक केंकरे यांनी यातल्या प्रत्येक पात्राला त्याचा त्याचा म्हणून एक स्वभाव दिला आहे, लकबी दिल्या आहेत. उदा. मिसेस लांडगे यांना ऐन मोक्याच्या क्षणी ज्या भन्नाट थापा सुचतात, त्याला तोड नाही. किंवा हसमुखच्या शारीर बोलीतून निर्माण होणारा विनोद.. विश्वास किल्लेदारचं उठसूठ कुणालाही झुकून सलाम करणं, वगैरे. नाटकात त्रुटी नाहीत असं नाही, पण प्रयोगाच्या भन्नाट वेगामुळे त्या तितक्याशा लक्ष वेधून घेत नाहीत.

नाटकात सुशांत शेलार यांनी सरळमार्गी मिस्टर लांडगे आपल्या वागण्या-बोलण्यातून आणि व्यवहारांतून नीटस उभे केले आहेत. परी तेलंग यांची ‘मिसेस लांडगे’ विनोदाच्या परिपक्व जाणिवेमुळे बहारदार झाली आहे. थापांवर थापा मारतानाच्या त्यांच्या अफाट कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. राजेश भोसले यांनी नित्य नव्या पाखराच्या शिकारीवर असणारा रसिक कोल्हे छान वठवला आहे. खरं तर त्यांचं उपजत व्यक्तिमत्त्व या पात्राच्या विरोधी आहे. तरीही त्यांनी त्यावर मात करत रसिकची स्त्रीलंपटता धमाल दर्शविली आहे. त्यामानानं मधुरा देशपांडे यांची देवयानी (रसिकची बायको) कृतक वाटते. हसमुखच्या भूमिकेत भूषण कडू आपल्या वाटय़ाचे हशे चोख वसूल करतात. अलका परब यांनी उठवळ मंजुळेचे रंगढंग थोडक्यात, पण लक्षवेधी केले आहेत. रमा सोहनी-रानडे यांनी सेक्सबद्दल तिटकारा असलेली ‘मी नाही त्यातली..’छाप लेखिका मिस् ढमढेरे समजून उमजून साकारली आहे. प्रियांका कासले यांची मोनिका मॉंडेसा हावभावांतून छछोरपण दाखवण्यात यशस्वी झाली आहे. अमर कुलकर्णीचा विश्वास किल्लेदार लोभस. बाकी तांत्रिक बाबीही जिथल्या तिथं आहेतच.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about mr and mrs landge drama
Show comments