भक्ती परब

मराठी वाहिन्यांच्या संख्येत वाढ होत असून यात आता ‘सोनी मराठी’ या आणखी एका नव्या मराठी वाहिनीची भर पडणार आहे. या वाहिनीवरूनही नव्या मालिका सादर होणार आहेत. मनोरंजनाच्या ऑनलाइन माध्यमांनी  प्रेक्षकवर्ग आधीच आपल्याकडे आकर्षित केल्यामुळे हिंदी आणि मराठी मनोरंजन वाहिन्यांसमोर प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. प्रेक्षकांसाठी नवीन मालिका हव्या आहेत. नवीन मालिकांसाठी नवीन विषय हवे आहेत आणि त्यासाठी चांगले लेखकही हवे आहेत. एकूणच माध्यमे वाढल्यामुळे लेखकांची जबाबदारी वाढली असून नवोदित लेखकांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. लेखकांसाठी चांगले दिवस आले असल्याचे चित्र किती खरे आणि किती खोटे? यावर दूरचित्रवाहिन्यांवर कार्यरत असणाऱ्या लेखकांशी बोलून घेतलेला वेध..

‘देवाशपथ’ आणि ‘सब’वर आलेल्या ‘नमूने’ या मालिकांसाठी कथालेखन करणाऱ्या शिरीष लाटकर यांच्या मते दूरचित्रवाहिनीच्या प्रेक्षकांचे वय ३० ते ५० वर्षे आहे. पण हा प्रेक्षक टिकेल की नाही ही शंका आहे. त्यामुळे दूरचित्रवाहिन्यांपुढे कुठले नवे विषय आणायचे आणि ‘टीआरपी’च्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक कसा टिकवून ठेवायचा हे आव्हान आहे. आधी आपण त्या त्या वेळेला मालिका बघत होतो, पण आता ऑनलाइनमुळे वेळेच्या बंधनाचा मुद्दाच उरलेला नाहीय. त्यामुळे मग मालिकांच्या ‘टीआरपी’मध्ये घसरण होते आणि त्याचा ताण लेखकांवर येतो. असा कोणता नवा विषय देता येईल जेणेकरून ऑनलाइनकडे वळलेला प्रेक्षक छोटय़ा पडद्याकडे परत येईल, हा विचार वाहिनी आणि लेखक दोघांनाही करावा लागत आहे. तरुण पिढीला मालिका आपली वाटावी म्हणून त्यांचे विषय घेऊन त्यावर लेखन करण्याकडे कल जास्त आहे.

सध्या तरी वाहिन्या लेखकांकडे कौटुंबिक विषयाचीच मागणी करत असल्याचे सांगून लाटकर म्हणाले, ‘आजच्या काळाचे प्रतिनिधित्व करणारे नायक-नायिका घेऊन, आजच्या काळाशी सुंसगत असलेली गोष्ट आणि त्यांच्या माध्यमातून घडणारे नाटय़ यापलीकडे जाऊन वाहिन्या फार काही वेगळे करण्याच्या मन:स्थितीत नाही. याचे कारण पुन्हा ‘टीआरपी’च आहे. लेखकाला त्याच्या कथेसाठी श्रेय दिले जाते कारण दूरचित्रवाहिनी व्यवसायात माहीत आहे की हा उद्योग लेखकांवर चालतो, पण त्यांना ग्लॅमर मिळत नाही. त्याला चेहरा नसतो, प्रेक्षकांनी लेखकापर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्यासाठी वाहिन्यांनीही प्रयत्न करायला हवे.

अभिजित गुरू यांच्या मते, नवीन वाहिन्या आल्यामुळे लेखकांवरचा ताण वाढत आहे. पण सकारात्मक गोष्ट ही आहे की संधी खूप मिळतील. आधी चार-पाचच लेखक होते. ते चार मराठी वाहिन्यांवर एकाच वेळेस दोन-तीन मालिका लिहायचे. आता कदाचित एक वाहिनी-एक लेखक असाही प्रकार होऊ शकेल. मालिका जास्तीत जास्त चांगल्या होण्यासाठी एखाद्या नावाजलेल्या लेखकाला फक्त त्यांच्याच वाहिनीवरील मालिकांचे लेखन करण्याबाबतची मर्यादा पुढेमागे घातली जाऊ शकते. एक लेखक एकच मालिका लिहीत असेल तर इतर अनेक लेखकांसाठी लेखनाच्या संधी निर्माण होतील. अशा परिस्थितीत उत्तम लेखकांच्या मानधनात वाढ होऊ  शकते. वाहिन्यांमधील चढाओढीचा ताण लेखकांवर येणारच ही बाबही खरी आहे. जोपर्यंत स्पर्धा स्वत:चीच स्वत:शी असते, तेव्हा ताण जाणवत नाही. स्पर्धेचा चांगला परिणाम असतो, तसा वाईटही परिणाम असतो. ही सर्जनशीलतेची नाही तर ‘टीआरपी’च्या गणितांची स्पर्धा आहे. त्यामुळे त्यात धोरणाचा भाग जास्त असेल. वाहिन्यांची संख्या वाढली तरी ही निकोप स्पर्धा असावी.

या स्पर्धेतून उत्तमोत्तम कलाकृती तयार झाल्या पाहिजेत, उदयोन्मुख लेखकांना संधी मिळावी, मालिकांचा दर्जा वाढावा, असे झाले तर उत्तमच आहे, पण हे ‘टीआरपी’पुरते मर्यादित राहिले तर कलेपेक्षा व्यवसाय मोठा होईल आणि त्यात सर्जनशीलता मागे पडेल, अशी भीतीही अभिजित गुरू यांनी व्यक्त केली.

नाटक-दूरचित्रवाहिनी या दोन्ही क्षेत्रांत लेखक आणि अभिनेता म्हणून ओळख असलेल्या राजेश देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार लेखनाचे तंत्र अवगत असले तरी त्यात अनुभवाची मात्रा कमी पडते आणि मालिकांमध्येही तोचतोचपणा येतो. त्यामुळे प्रेक्षकांना काय बघायला आवडते, याचा वेध घेऊन आणि वाहिन्यांचा विचार लक्षात घेत या दोन्हीचा सुवर्णमध्य साधणारे लेखन लेखकांनी करायला हवे. मालिका लिहिताना लवचीकता, चिकाटी आणि संयम लागतो. तुम्हाला रोजच्या रोज पटत नसले तरी लिहायचे असते. वाहिन्यासुद्धा ‘टीआरपी’मुळे हतबल असतात. वाहिन्यांनाही ते पटत नसेल, पण ‘टीआरपी’ची गणितं सगळं ठरवतात. वाहिन्यांमध्ये काम करणारी माणसेही संवेदनशील आहेत, पण ‘टीआरपी’पुढे त्यांचेही चालत नाही. याआधी स्पर्धा नव्हती तेव्हा आम्ही लेखक मालिकेची संकल्पना घेऊ न वाहिन्यांकडे जायचो. पण आता वाहिनी तुम्हाला कथा देते. त्यावर मालिका लिहायची असते. त्यामुळे मालिका लेखनातला आपलेपणा हरवत चालला आहे. वाहिन्यांनी खरेच महाराष्ट्रात तळागाळात जाऊ न प्रेक्षकांना काय आवडते याचा शोध घेतला पाहिजे.

मराठी वाहिन्यांबरोबरच डिजिटल माध्यमेही खुली झाली आहेत, याकडे लेखक सचिन दरेकर यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, नव्या माध्यमांमुळे नव्या संधी निर्माण होतील. पण लेखकांनीही लेखनाचा दर्जा चांगला  राखला जाईल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. मालिका आणि चित्रपट लेखनाचे शास्त्र वेगवेगळे आहे, तसे नव्या येणाऱ्या माध्यमाचेही शास्त्र लेखकांनी अभ्यासायला हवे. वाहिन्यांवरच्या मालिकांचे लेखन करतानाही साडेसात, साडेआठ किंवा साडेनऊच्या प्रेक्षकांसाठी कुठले कार्यक्रम असावेत, याबद्दलचे ठोकताळे समजून घ्यायला हवेत. शेवटी हा उद्योग आहे आणि तो टिकला पाहिजे, प्रेक्षकाभिमुख मालिका करण्यासाठी प्रेक्षकांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे, त्यासाठी वाहिन्या मार्गदर्शन करत असतात. मी ‘सोनी मराठी’ वाहिनीसाठीही लेखन करतोय, खूप छान वातावरण आहे. मुळात मालिका लेखनासाठी या माध्यमातील बलस्थाने आणि कमतरता यांची जाणीव ठेवूनच लेखन करावे लागते. इथे मालिका लेखन करताना रोज एक नवी समस्या उभी राहते, त्यात एकाच वेळी आव्हानही असते आणि गंमतही. पण नवोदित लेखकांसाठी वाहिन्यांनी पुढे येऊन त्यांना त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर मालिकांसाठी खूप चांगले विषय मिळतील.

‘घाडगे अ‍ॅण्ड सून’चे संवाद लिहिणाऱ्या अरुणा जोगळेकर यांनी सांगितले, मनोरंजनक्षेत्र ही मोठी उद्योग आहे, पण उद्योगाचे सगळेच नियम तिथे लागू नाहीत. नवीन वाहिन्या येत आहेत. त्यामुळे उद्योगाचा विस्तार हा उत्पन्न वाढवणारा आणि विभागणाराही आहे. पैसा हा कळीचा मुद्दा असल्यामुळे सगळ्याच वाहिन्यांवर ‘टीआरपी’ टिकवण्याचे, वाढवण्याचे खूप मोठे दडपण आहे. सध्या चार मालिकांसाठी संवाद लेखन करते आहे. लोकांना काय आवडेल याची नेमकी नस जगात अद्याप कोणालाच सापडलेली नाही आणि ती न सापडणे हेच दूरचित्रवाहिन्यांचेच नव्हे तर संपूर्ण मनोरंजनक्षेत्राचे इंगित आहे. इतर उद्योगाप्रमाणे इथे ठरावीक साचा राबवता येत नाही. मराठी मालिका आणि लेखकांपुरते बोलायचे तर हा सांघिक भाग आहे. पण यातला गमतीचा आणि काहीसा दुर्दैवी भाग हा की या चमूचा कप्तान कधी वाहिनीचा प्रमुख, कधी कार्यक्रम अधिकारी असे बदलते असतात.

त्यामुळे यातून कधी कधी ‘टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ’ असा प्रकार होतो तर कधी अत्यंत यशस्वी, चटकदार काही तयार होते. ट्रॅजेडीची कॉमेडी, कॉमेडीची ट्रॅजेडी, फॅमिली ड्रामाची सर्कस आणि सर्कशीला कुस्तीच्या फडात बदलण्याची जादू लेखकांना साधायची असते. हे ज्याला समजले तो चमू चांगल्या मालिका देऊ शकतो.

एकंदरीत नवनवीन वाहिन्या आणि माध्यमांमुळे लेखकांमध्ये उत्साह संचारला आहे. याबद्दल कोणाचेही दुमत नाही!

लेखकांच्या हक्कांविषयी बोलणाऱ्या अनेक संस्था आता पुढे आल्या आहेत. त्यामुळे लेखकांची फसवणूक होणार नाही, पण मुख्य समस्या आहे की नवोदित लेखकच तयार होत नाही. सुरुवातीला खूप उत्सुकता दाखवली जाते, पण मालिका लेखनासाठी सातत्य लागते, ते आजच्या लेखकांकडे नाही. अनेकांना वाहिन्यांच्या बंधनात राहून लेखन करायचे नसते, पण मालिका लेखन करताना वाहिन्यांची बंधने हा अपरिहार्य भाग आहे, हे ते लक्षात घेत नाहीत. ‘स्टार प्रवाह’ आणि ‘झी मराठी’ने लेखक तयार करण्यासाठी कार्यशाळा घेतल्या होत्या, कारण वाहिन्यांची ती गरज आहे. वाहिन्यांना नव्या दमाचे लेखक हवे आहेत. ३३ टक्के रोजगार उपलब्ध करून देणारे हे क्षेत्र आहे. प्रेक्षकांनीही या क्षेत्रातील लेखकांचा आदर केला पाहिजे.

– शिरीष लाटकर

 

मालिका लेखकांची संख्या कमी असल्यामुळे नव्या लेखकांना यात येण्यासाठी पोषक वातावरण मिळाले पाहिजे. त्यांना लेखनाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या लेखकाची मालिका इतर प्रादेशिक भाषेत जाते तेव्हा त्या मालिकेचे श्रेयही लेखकाला मिळायला हवे. त्याचे मानधनही लेखकाला मिळाले पाहिजे. कॉपीराईट कायद्यानुसार हे परदेशात मिळते पण भारतात मिळत नाही. लेखकाला त्याचा ‘मान’ आणि ‘धन’ दोन्ही मिळायलाच हवे.

– राजेश देशपांडे

Story img Loader