भक्ती परब
‘अपना टाइम आएगा’, असं हिप हॉप स्वॅगमध्ये, रुबाबात आणि जोशात सांगणाऱ्या तसंच किकी, पब्जी ते टेन इयर चॅलेंज अशा विविध ट्रेंडमधून समाजमाध्यांतून उसळत येणाऱ्या प्रत्येक लाटेवर स्वार होऊ न ‘आपलं सगळंच जगावेगळं’ असं म्हणणाऱ्या तरुण पिढीला छोटय़ा पडद्याने आकर्षित करण्याचे कसून प्रयत्न केले. पण फारसं यश मिळालं नाही. उलट तरुणांसाठी वाहिलेल्या मालिकांनी आजी-आजोबांचीच अधिक पसंती मिळवली. परंतु तरुणाईचा हटके अंदाज मालिकेत मांडायचा प्रयत्न वेळोवेळी होत राहिला. अजूनही होतो आहे. एम टीव्ही, झिंग, बिंदास या हिंदीतील तीन वाहिन्या मात्र त्यांच्या तरुण प्रेक्षकसंख्येला आकर्षित करण्याचा व्रतस्थपणा टिकवून आहेत.
* बिंदास वाहिनी यात मागे पडत चाललीय. दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयीन वातावरणावर आधारलेल्या मालिकाही या वाहिनीवर आता दिसेनाशा झाल्यात. ‘ये है आशिकी’ ही सिरीजही ते पुढे नेण्याची सध्या चिन्हं दिसत नाहीत. आणि ‘द ट्रीप’ या सिरीजच्या दुसऱ्या पर्वाचा हँग ओव्हर वाहिनीवरून उतरलेला नाहीय. त्यामुळे टीव्ही पाहणाऱ्या तरुणाईची नजर एम टीव्ही आणि झिंग वाहिनीकडे वळली आहे. ‘प्यार तुने क्या किया’ या आपल्या गाजलेल्या सिरीजचं नववं पर्व ‘प्यार पहली बार’ ही संकल्पना घेऊ न गेल्या वर्षी अवतरलं. त्याची जादू अजूनही पाहायला मिळतेय. यातले काही भाग झिंगवर पुन्हा प्रसारित करण्यात येत आहेत. त्याशिवाय ‘जिंदगी यू टर्न’सारखा कार्यक्रमही सुरू आहे. याच्या जोरावरच ही वाहिनी टीआरपीच्या स्पर्धेत एमटीव्ही वाहिनीला नेहमी मागे टाकत आली आहे. हे चित्र गेल्या वर्षीपासून आता नव्या वर्षांतील दुसऱ्या आठवडय़ापर्यंत कायम आहे.
* एमटीव्ही वाहिनीसुद्धा झिंग वाहिनीला जबरदस्त टक्कर देण्यासाठी त्यांचे नेहमीचे एक्के घेऊ न मैदानात उतरली आहे. एमटीव्ही अनप्लग्डचे आठवे पर्व आणि एम टीव्ही रिअल हिरोज रोडीजच्याही ऑडिशन सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर ‘द अँटी सोशल नेटवर्क’ या नव्या कार्यक्रमाचे प्रोमोही झळकत आहेत. अजून प्रेक्षकांसाठी लय भारी गोष्ट म्हणजे त्यांचे लाडके मानिक आणि नंदिनी ‘कैसी ये यारिया’मधून एमटीव्हीवर गेल्याच आठवडय़ात परत आले आहेत, तेही तिसरं पर्व घेऊ न. ज्यांनी हे तिसरं पर्व आधीच वूट अॅपवर पाहिलं त्यांच्यासाठी नाही, पण टीव्ही प्रेक्षकांसाठी आनंदाचीच गोष्ट म्हणायला हवी. पहिल्या पर्वाला ज्यांनी ही मालिका यूटय़ूबवर पाहत डोक्यावर घेतली त्या तरुणाईचं मत विचारात घेण्यासाठी एम टीव्ही वाहिनी दरवर्षी किती टक्के तरुण प्रेक्षक टीव्हीवर मालिका बघतो, याची आकडेवारी गोळा करते. तेव्हा २० ते २५ टक्केच आकडेवारी त्यांना पाहायला मिळते. पण तरीही वाहिनी तरुणांसाठी वेगवेगळ्या कल्पना लढवत नवे कार्यक्रम सादर करणं सोडत नाही.
* मराठी तरुणाईसाठी झी युवा ही हक्काची वाहिनी आता मनाने तरुण असलेल्या प्रेक्षकांना जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. सध्या वाहिनीवर ‘झी युवा सन्मान’चे प्रोमो झळकत आहेत. त्याचबरोबर ‘अप्सरा आली’, ‘मन मंदिरा’ या कार्यक्रमांमुळे झी युवा आपल्या कार्यक्रम सादरीकरणामध्ये काही बदल करत आहे, अशी चर्चा आहे.
* ‘कलर्स’ मराठीवर तरुणाईचे आवडते दोन शब्द म्हणजे एकदम कडक हा कार्यक्रम आणि चिरतरुण अभिनेता सुनील बर्वे ‘महाराष्ट्र जागते रहो’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने तरुणांसाठी खास कार्यक्रम असं म्हटलं नसलं तरी ‘ह.म. बने, तु.म.बने’, ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘जुळता जुळता जुळतंय की’ आणि ‘ती फुलराणी’ अशा मालिकांमधून तरुणाईची स्पंदनं, त्यांचे प्रश्न पाहायला मिळत आहेत.
* ‘स्टार भारत’ वाहिनीवर ‘राधाकृष्ण’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. यामध्ये मराठी अभिनेता सुमेध मुदगलकर कृष्णाच्या भूमिकेत आहे. याच वाहिनीवर ‘एक थी रानी, एक था रावण’ मालिकेचे प्रोमो दाखवले जात आहेत. हीसुद्धा तरुणाईला आपलीशी वाटेल अशी मालिका सध्या तरी दिसतेय. पुढे कौटुंबिक वळणावर जाईलही, पण कुमारवयीन मुलीला घाबरवणाऱ्या मुलाचा गुंडगिरीचा अंदाज पाहता एक समाजभान या मालिकेतून प्रतिबिंबित होईल, अशी आशा करूया.
* आणि आता फक्त मोजून बारा दिवस राहिलेत, कशाला म्हणून काय विचारता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) प्रेक्षकांना वाहिन्या निवडीचा हक्क दिलाय, तो अमलात येण्यासाठी १२ दिवस राहिलेत. त्यामुळे वाहिन्यांची निवडप्रक्रिया घराघरात सुरू झाली असेल. तर काही ठिकाणी ती अमलात येण्याची चिन्हंही दिसत नसतील. तर त्यांना काही काळ नि:शुल्क वाहिन्या पाहत वेळ घालवावा लागेल ना. पण काळजी करू नका. आपल्या डी डी नॅशनल आणि सह्याद्री वाहिनीवरही डोकावायला हरकत नाही. खरंतर रिमोट घेऊ न बदलाच आणि बघा २६ जानेवारी म्हणजे डी डी नॅशनल हे समीकरण अजूनही कायम आहे, आणि ते टीआरपीमध्येसुद्धा. प्रजासत्ताक दिनाचे संचलन थेट प्रसारित होताना पाहणं याच्याशी अनेकांच्या गोड आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या प्रक्षेपणाच्या वेळी वाहिनी इतर वाहिन्यांना टीआरपीत मागे टाकते. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण जवळ आले की देशभक्तीपर गाण्यांची पर्वणी अनेकांना माहीत असेल तसेच चित्रपटही दाखवले जातात. या वेळी २१ जानेवारीपासून ते २६ जानेवारीपर्यंत सहा चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यात ‘राझी’ चित्रपटाचाही समावेश आहे. सह्याद्री वाहिनीवरही ‘डोकं चालवाल का’, ‘दम दमा दम’चे दुसरे पर्व, नमस्कार मंडळी या विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींना बोलतं करणारा कार्यक्रम अशी वेगळी वाट तुम्ही निवडू शकता.
* खरंतर प्रत्येक वाहिनी आपापल्या परीने तरुणाईलाच आकर्षित करेल अशी कार्यक्रमाची आखणी करत असते. कशी.. तर त्यासाठी डिस्कव्हरी, संगीत वाहिन्या आणि खेळाच्या वाहिन्यांच्या सफरीवर जावं लागेल. जाऊ या पुढच्या भागात..