रवींद्र पाथरे

लष्करातील अंतर्गत घटना-घडामोडी सहसा प्रसार माध्यमांपर्यंत आणि त्यायोगे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार नाहीत याची प्रत्येक देश काळजी घेत असतो. त्यासाठी लष्करी सेवाशर्तीमध्ये गोपनीयतेचं कलम घातलं गेलेलं असतं. मध्यंतरी आपल्याकडे एका लष्करी जवानाने सैनिकांना निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातं, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती आणि त्यावरून देशभर एकच गदारोळ माजला होता. देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या आरोग्याची अशी अक्षम्य हेळसांड केली जाते याबद्दल सरकारला धारेवरही धरण्यात आलं होतं. नंतर त्या जवानाला सेवाशर्तीचा भंग केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलं होतं. अलीकडे घडलेली आणखीन एक अशीच घटना.. काश्मीरमध्ये एका लष्करी वाहनावर प्रचंड दगडफेक करणाऱ्या संतप्त जमावापासून स्वसंरक्षणासाठी दगडफेक करणाऱ्या एकाला पकडून त्या लष्करी वाहनाच्या पुढे ढाली सारखं वापरून संतप्त जमावातून वाट काढणाऱ्या एका जवानावरही पुढे कारवाई केली गेली.

खरं तर अशा प्रकारच्या काही घटना लष्करात घडतच असतात. गोपनीयतेच्या कारणामुळे त्या सहसा आपल्यापर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत. लष्कराबद्दल पूर्ण आदर राखूनही एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे, की काही लष्करी अधिकारी भ्रष्टाचार, शस्त्रास्त्र खरेदीतील दलाली, शत्रूराष्ट्रांसाठी हेरगिरी आदी गैरप्रकार करत असतात, हेही वास्तव आहे. यासंबंधीच्या काही बातम्या कधी कधी बाहेरही येतात. मनुष्यप्राणी हा स्खलनशील आणि मोह-माया आदी षड्रिपूंना अपवाद नसल्याने कडक लष्करी शिस्तीतही असे गुन्हे घडत असतात. फक्त ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार नाहीत याची काटेकोर दक्षता घेतली जाते. दोनएक वर्षांपूर्वी आलेल्या ‘कोडमंत्र’ या नाटकात लष्करातील अशा गैरप्रकारावर प्रकाशझोत टाकलेला होता. नुकतंच रंगमंचावर आलेलं ‘ऑपरेशन जटायू’ हे नाटकही ‘कोडमंत्र’च्याच जातकुळीतलं आहे. इतकंच नव्हे, तर त्यावर ‘कोडमंत्र’चा गहिरा प्रभाव आढळून येतो. लष्करातील व्यक्तीने केलेल्या गुन्ह्य़ाबद्दल कशा प्रकारे कोर्ट मार्शल केलं जातं आणि न्याय केला जातो, हे ‘ऑपरेशन जटायू’मध्ये उत्तमरीत्या अनुभवायला मिळतं.

या नाटकात लष्करातील आपल्या दोन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडून खून करणाऱ्या कॅ. संघर्ष गायकवाड या आरोपीवर कोर्ट मार्शल करण्यात येतं. ज्यांच्यावर त्याने गोळ्या झाडल्या, त्यापैकी कॅ. केशव वाघ त्यातून वाचतो. कॅ. संघर्ष गायकवाड कोर्ट मार्शलमध्ये आपण हा गुन्हा केल्याचं कबूल करतो. त्यामुळे खटल्याचा निकाल काय लागणार हे स्पष्ट होतं. परंतु कॅ. संघर्षचं वकीलपत्र घेतलेल्या मेजर क्रांती सुर्वेना मात्र त्याचा हा कबुलीजबाब मान्य नसतो. ते एक नाणावलेले लष्करी वकील म्हणून सुपरिचित असतात. कॅ. संघर्षच्या बाजूने प्रतिवाद करताना ते साक्षीदार आणि उपलब्ध पुराव्यांची अक्षरश: चिरफाड करतात. त्यातून लष्करातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचं पितळ उघडं पडतं. कॅ. केशव वाघ आणि कॅ. संघर्षने गोळ्या घालून ठार केलेले त्याचे मित्र मेजर तेजपाल भास्कर हे लष्करी साहित्यात कसे भ्रष्टाचार करत होते, आणि त्यांच्या या भ्रष्टाचारामुळे आणि गैरवर्तनामुळेच कॅ. संघर्षला लष्करी शिरस्त्यानुसार कारवाई करताना नाइलाजानं त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागतात, हे मेजर क्रांती सुर्वे पुराव्यांसहित सिद्ध करतात. या खटल्यातील साक्षीदार मेजर डॉ. गाडगीळ आणि लान्स नाईक हिंमत शेळके हे कॅ. वाघ आणि मेजर तेजपाल यांच्या भ्रष्टाचारात कसे सामील झालेले होते, हेही मेजर सुर्वे सप्रमाण दाखवून देतात..

लेखक नितीन वाघ आणि दिग्पाल लांजेकर यांनी ‘ऑपरेशन जटायू’ची रचना अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने केलेली आहे. गोपनीयतेच्या बुरख्याआड लष्करातील अनेक अंधाऱ्या गोष्टी, दडपले जाणारे गैरव्यवहार, लष्करातील व्यक्तींचे व्यक्तिगत आणि लष्करी जवान म्हणून परस्परांशी निर्माण होणारे हितसंबंध, त्यांचा केला जाणारा गैरवापर ही सगळी साखळी नाटय़पूर्ण लेखनातून मांडली गेली आहे. मध्यवर्ती पात्रांचं सशक्त रेखाटन आणि खटकेबाज संवाद यामुळे प्रयोग रंगत जातो. अर्थात यात वकील क्रांती सुर्वे यांना नायक बनवण्याचा अट्टहास नकळतपणे जाणवतो. कोर्टालाही निष्णात वकील म्हणून त्यांच्याबद्दल वाटणारं कौतुक अनाकलनीय आहे. काही अनावश्यक प्रसंग नाटकात का घातले आहेत, कळत नाही. उदा. कॅ. वाघ याच्याबद्दल वाटणाऱ्या चिडीमुळे एक लष्करी जवान त्याला मारहाण करतो तो प्रसंग, किंवा ज्युरी पॅनलवरील व्यक्तींचं खटल्यासंबंधात आपापसातलं वक्तव्य! त्यातून नाटय़परिणाम गडद होतो असंही नाही. हे शेंडाबुडखा नसलेले प्रसंग नाटकात का येतात, असा प्रश्न पडतो.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी प्रयोग मात्र उत्तमच बसवला आहे. चढत्या रंगतीनं हा खटला पुढे पुढे सरकतो. त्यातले नाटय़मय क्षण ठाशीव करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. तथापि लिखाणातील अनावश्यक भाग दिग्दर्शक या नात्याने त्यांनी संपादित केला असता तर नाटक अधिक टोकदार झालं असतं. कदाचित ते स्वत: लेखकही असल्यानं बहुधा त्यांना हे करणं जमलं नसावं. सगळ्या कलाकारांकडून आपल्याला हवं ते काढून घेण्यात मात्र ते यशस्वी झाले आहेत. ‘कोडमंत्र’ नाटकाचा प्रभाव लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांच्यावर असल्याचं प्रत्यही जाणवतं.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी लष्करी न्यायालय यथार्थपणे उभं केलं आहे. देवदत्त मनिषा बाजींचं आघाती पाश्र्वसंगीत नाटय़पूर्णतेत भर घालतं. तेजस देवधरांनी प्रकाशयोजनेतून त्यांना सुरेख साथ केली आहे. पौर्णिमा ओक यांनी लष्करी जवानांची वास्तवदर्शी वेशभूषा केली आहे.

मेजर क्रांती सुर्वे झालेल्या अजय पूरकर यांनी प्रखर बुद्धिमान व तडफदार वकिलाची भूमिका जबरदस्त वठवली आहे. त्यांची देहबोली, मुद्राभिनय आणि संवादफेक त्यांना नाटकाच्या केन्द्रस्थानी ठेवते. फिर्यादीचे वकील मेजर कपिल भारद्वाज यांच्या भूमिकेत संकेत ओक आपल्या अशिलाची प्रभावीपणे बाजू मांडतात. श्रीकांत प्रभाकर यांनी भ्रष्ट असूनही पदाच्या गुर्मीत वावरणारा कॅ. केशव वाघ थंडगार नेत्रकटाक्ष आणि ताठर शारीर बोलीतून समूर्त केला आहे. कॅ. वाघचं बेदरकार वर्तन आणि बेफिकीरी त्याच्यातील गुन्हेगार किती पोचलेला आहे हेच दर्शवते. यात आरोपी कॅ. संघर्ष गायकवाड (लक्ष्मीकांत संझगिरी) याला व्यवस्थेनं गुन्हेगार म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. संघर्षची असहायता, उद्विग्नता आणि लष्करातील गैरप्रकारांसंबंधीची सच्ची चीड संझगिरी त्यांच्या  संतप्त उद्रेकातून अभिव्यक्त करतात. लष्करातील भ्रष्टाचाराचे पाठीराखे राजू बावडेकर (मेजर डॉ. गाडगीळ) आणि अमित जांभेकर (लान्स नाईक हिंमत शेळके) यांच्या छोटेखानी भूमिकाही लक्षवेधी झाल्या आहेत. मुख्य जज् सुनील जाधव (ब्रिगेडियर अभय सिंग) भूमिकेत शोभले असले तरी त्यांना खूपच कमी वाव मिळाला आहे. अन्य कलाकारांची कामंही चोख आहेत.

Story img Loader