अमेरिकन गायक निक जोनासबरोबर दोन वेगवेगळ्या पद्धतीने विवाहबंधनात अडकलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा विवाह सोहळा, पार्टी हे सगळं आटोपून अगदी दुसऱ्याच दिवशी जोमाने कामाला लागली. ऐन लग्नाच्या धामधुमीत तिच्यावर स्कॅम आर्टिस्ट म्हणून झालेली टीकाही तिने मागे टाकली असून लग्नानंतर पहिल्यांदाच प्रसिद्धीमाध्यमांसमोर आलेल्या प्रियांकाने आपल्यासाठी आपले काम जास्त महत्त्वाचे आहे, असे सांगत मधुचंद्राचे बेतही पुढे ढकलले असल्याचे स्पष्ट केले.

हॉलीवूडमध्ये गाजलेली ‘क्वाँटिको’ ही मालिका सोडण्याचा निर्णय घेत मायदेशी परतलेली प्रियांका सलमान खानबरोबर ‘भारत’ चित्रपटात दिसणार म्हणता पुन्हा गायब झाली. त्यानंतर तिचे आणि निक जोनासचे प्रेमप्रकरण जगासमोर आले आणि त्यावर चर्चा रंगतेय तोवर प्रियांकाने विवाहाचा निर्णयही जाहीर केला. ही सगळी धांदल परदेशात राहूनच सांभाळणारी प्रियांका निकबरोबरच भारतात आली आणि थेट बोहल्यावर उभी राहिली. गेल्या आठवडय़ात मोठय़ा धामधूमीत तिचा हा बहुचर्चित विवाहसोहळा संपन्न झाला. प्रियांकाच्या समकालीन अभिनेत्री अनुष्का शर्माने विवाहानंतर मधुचंद्र साजरा केला आणि त्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात केली, तर दीपिका पदुकोणनेही विवाहानंतर महिनाभर तरी चित्रीकरणाला सुट्टी दिली. हा सगळा वेळ ती आपले नवे घर सजवण्यासाठी देणार आहे.

प्रियांकाला मात्र या गोष्टींसाठी वेळ नाही. ‘बम्बल’ या डेटिंग अ‍ॅपच्या निर्मितीत प्रियांकाने गुंतवणूक केली असून हे अ‍ॅप भारतात आणण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत या अ‍ॅपचा शुभारंभ झाला. याच कार्यक्रमासाठी लग्नानंतर लगेचच प्रियांका आणि निक हजर झाले. या अ‍ॅपची कल्पना आपल्याला अत्यंत आवडली. त्यामुळे त्याचा भाग होत ते अ‍ॅप भारतात आणण्यासाठी आपण आग्रही आहोत, असे प्रियांकाने सांगितले. या अ‍ॅपमुळे भविष्यात नेमकं काय करायचं आहे याचे निर्णय घेणे मुलींना सोपे जाणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपली विचारधारा ज्यांच्याशी जुळते अशा पुरुषांची निवड करून, त्यांची भेट घेणे, करिअरच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या लोकांशी जोडले जाणे मुलींना सोपे होणार असून या अ‍ॅपच्या माध्यमातून मुलीच मुलांशी संपर्क साधू शकतात, असे प्रियांकाने स्पष्ट केले.

‘बम्बल’ अ‍ॅपच्या शुभारंभासाठीच प्रियांका तातडीने दिल्लीला रवाना झाली. आमच्या विवाहाच्या तारखा निश्चित होण्याआधीच या अ‍ॅपसंदर्भातील कार्यक्रम, काही जाहिरातींचे चित्रीकरण आणि अन्य कामांविषयीचे करार झाले होते. माझ्यासाठी मी इतरांना दिलेला शब्द महत्त्वाचा आहे. तो पाळायलाच हवा हे लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली असल्याचे प्रियांकाने सांगितले.

निकबरोबर विवाहबंधनात अडकत असतानाच तिच्यावर ‘द कट’ मासिकातून टीका करण्यात आली. मात्र अशा टीकेला उत्तर देण्याची, किंवा त्याची दखल घेण्याचीही गरज आपल्याला वाटत नाही. माझे सर्व लक्ष मी पूर्णपणे कामावर केंद्रित केले आहे. सध्यातरी महिनाभर चित्रीकरणात व्यग्र असल्याने मधुचंद्र कुठे, कधी आणि कसा करायचा हे सगळे निकवर सोपवले असल्याचेही प्रियांका म्हणाली.