स्वप्निल घंगाळे

‘काय रे, सारखा फोनकडे बघून हसत असतोस?’, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांनी ऐकला किंवा ऐकवला असेल. मोबाइलवरील चॅटिंगमध्ये पार गुंगून गेलेल्यांकडे पाहणाऱ्यांना ‘नेमकं काय चाललंय याचं?’, हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. ‘चॅटिंग’ने तोंडी संभाषणाची इतकी जागा घेतली आहे की सिनेमातही आता संवादांऐवजी ‘चॅटिंग’च्या खिडक्या झळकवणारी दृश्ये दिसू लागली आहेत. मराठी चित्रपटांमध्येही सर्रास होत असलेला हा प्रयोग संवादाच्या नवमाध्यमाला अधोरेखित करणारा आहे.

सध्या मराठी सिनेमा तिकीटबारीवर जोरदार कामगिरी करताना दिसत आहे. मुंबई-पुणे-मुंबई ३ या चित्रपटानेही चांगली कामगिरी केली आहे. गौतम आणि गौरीच्या प्रेमकथेचे तिसरे पर्वही लोकांना चांगलेच आवडते आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचा वाढता वापर चित्रपटांमध्ये दाखवण्यासाठी नवनवीन कल्पना वापरल्या जात असल्याचे दिसून येते आहे. म्हणजे हा चित्रपट पाहिलेल्यांना यात दोन कलाकारांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर होणारा संवाद थेट पडद्यावर बाजूला मेसेजेस विंडो ओपन करून दाखवला जातो. या चित्रपटातील टर्निंग पॉइण्ट असलेला प्रसंगही असाच व्हॉट्सअ‍ॅपवरील व्हिडीओवर आधारित आहे. असे थेट फोनमधील गप्पा स्क्रीनवर दाखवणारे अनेक प्रसंग या चित्रपटात आहेत. अशा प्रकारे भ्रमणध्वनीच्या माध्यमातून होणारा लेखी संवाद स्क्रीनवर दाखवण्याच्या तंत्रज्ञानाला ‘टेक्स्ट ऑन स्क्रीन’ असं म्हणतात.

पहिल्यांदाच मराठीमध्ये असा प्रयोग होतोय असं नाही. याआधीही अनेक चित्रपटांमध्ये दोन जणांमधील संवाद जर भ्रमणध्वनीवर लेखी स्वरूपात होत असेल तर तो थेट पडद्यावर लेखी स्वरूपात दाखवला गेला आहे. अशा प्रकारची कल्पना मराठीमध्ये वापरण्याची सुरुवात अंदाजे सांगायची झाली तर २०१३ साली प्रदर्शित झालेल्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. अतुल कुलकर्णीने साकारलेला राम आणि सागरिका घाटगेची भूमिका असलेली सोनलच्या प्रेमाची सुरुवात दाखवताना तिने त्याला पाठवलेला सॉरी मेसेज थेट स्क्रीनवर झळकलेला दिसतो. त्यानंतर अतुलचे हसणे आणि राग शांत होणे असे एकदंरीत दृश्य या टेक्स्ट ऑन स्क्रीनमुळे प्रेक्षकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचले, असे म्हणता येईल.

तेव्हापासून अनेक मराठी चित्रपटांमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात आले. अशा चित्रपटांची यादी सांगायची झाली तर २०१५ मध्ये प्रदर्शित झालेले मुंबई-पुणे-मुंबई २ तसेच डबल सीट, मुरांबा, मंगलाष्टक वन्स मोअर, ऑनलाइन बिनलाइन, व्हॉट्सअ‍ॅप लग्न, लग्न पहावे करून, टाइम प्लीजपासून अगदी आत्तापर्यंतच्या मुंबई-पुणे-मुंबई ३ पर्यंतच्या चित्रपटांची नावं घेता येतील. आता वेळोवेळी या सिनेमांमधील ‘टेक्स्ट ऑन स्क्रीन’ बदलत गेले. म्हणजे प्रेमाची गोष्टमधील साधा मेसेज ते आज ऑनलाइन बिनलाइन किंवा मुंबई-पुणे-मुंबई ३ मधील व्हॉट्सअ‍ॅपच्या लेखी मेसेजेसबरोबरच व्हिडीओ पाठवण्यापर्यंत ‘अपडेट’ झाले आहे. ‘वास्तविक जीवनात गॅझेटच्या माध्यमातून संवाद वाढत चालला आहे. त्याचे प्रतिबिंब चित्रपटांत उमटणे स्वाभाविक आहे,’ असे स्मार्टफोनच्या ‘यूजर इंटरफेस’चे तज्ज्ञ सौरभ करंदीकर यांनी सांगितले. ‘ज्यावेळी चित्रपटाच्या कथानकात पडद्यावरील दृश्यापेक्षा लेखी मजकुराला अधिक महत्त्व असते, तेव्हा हे तंत्रज्ञान वापरले जाते. आज आपला बराचसा संवाद इमोजींच्या माध्यमातून म्हणजे चित्र माध्यमातून होतो आहे. तसाच संवाद चित्रपटातील व्यक्तिरेखांमध्ये होत असेल तर तो पडद्यावर तशाच स्वरूपात दाखवावा लागेल,’ असे ते म्हणाले.

संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन या नवीन तंत्रज्ञानातून होणारा संवाद प्रेक्षकांसमोर कसा मांडायचा, असा प्रश्न चित्रपट निर्मात्यांना पडू लागल्यानंतर ‘टेक्स्ट ऑन स्क्रीन’चा वापर होऊ  लागला. पूर्वी चित्रपटामध्ये एखाद्याला आलेले पत्र वाचताना पत्राच्या कागदात पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा झळकायचा आणि त्याच्या आवाजात ते पत्र वाचून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात होते. मात्र, डिजिटल माध्यमांतील संवादांसाठी हा ‘व्हॉइस ओव्हर’चा पर्याय चपखल बसत नव्हता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संवादात वाढलेला इमोजींचा वापर. प्रत्येक इमोजी विशिष्ट भावना व्यक्त करतो. ती भावना आवाजातून व्यक्त करणे शक्यच नाही. अशा वेळी ‘टेक्स्ट ऑन स्क्रीन’शिवाय पर्याय नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून जगभरातील चित्रपटांमध्ये असे संवाद पडद्यावर लेखी स्वरूपात झळकू लागले आहेत.

अशा प्रकारचा सर्वात पहिला प्रयोग सांगायचा झाल्यास ‘द नेट’ (१९९५) या सिनेमाचा उल्लेख करावा लागेल. दोन कलाकार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्क्रीनवरून संवाद साधतात तेव्हा थेट स्क्रीनचेच चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आले. अभिनेत्यांच्या टाइप करतानाच्या दृश्यांपासून ते क्लोजअपपर्यंत अनेक प्रकारची दृश्ये स्क्रीनच्या माध्यमातून होणारा संवाद दाखवण्यासाठी वापरण्यात आली. त्यानंतर ‘यू हॅव गॉट मेल’ या १९९८ साली आलेल्या चित्रपटात दोन भूमिकांमधील संवाद दाखवण्यासाठी स्क्रीन दाखवण्यात आली नाही तर संवाद साधणारे दोघेहीजण संगणकासमोर बसलेले दाखवण्यात आले आणि त्यांच्यातील संवाद व्हॉइस ओव्हर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवण्यात आला. दक्षिण कोरियामधील २००१ साली प्रदर्शित झालेला ‘टेक केअर ऑफ माय कॅट’ हा चित्रपट किंवा जपानमध्ये त्याच वर्षी प्रदर्शित झालेले ‘ऑल अबाऊ ट लिली चाऊ चाऊ ‘ या चित्रपटांमध्ये हे तंत्रज्ञान आज दिसते तशा आकर्षक पद्धतीने पहिल्यांदा वापरण्यात आले. हे तंत्रज्ञान जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये सर्वात आधी वापरले जाण्याचे कारण म्हणजे तेथे मागील दोन दशकांहून अधिक काळापासून सुरू असणारे अ‍ॅनिमेशन कार्टूनवर आधारित चित्रपट. या चित्रपटांमध्ये अगदी प्राथमिक स्तरावर स्क्रीनवर अक्षरांचा वापर दाखवण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर हळूहळू हे तंत्रज्ञान जगभरात पसरू लागले. ‘होईयाक्स’ (२०१०) या ब्रिटिश चित्रपटाकडे असा प्रयोग करणारा पहिला वरून अत्याधुनिक चित्रपट म्हणून पाहिले जात असले तरी त्याआधी असे प्रयोग झाले आहेत हे वरील उदाहरणांवरून स्पष्ट होतेय. ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांनी हे तंत्रज्ञान स्वीकारल्यानंतर अवघ्या तीनच वर्षांत मराठी चित्रपटांनी हे आत्मसात केले. शारलॉक्स (२०१०), डिस्कनेक्ट (२०१२), हाऊ स ऑफ कार्ड्स (२०१३), ग्ली (२०१३), नोहा (२०१३) या चित्रपटांनी हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यांचा चित्रपट पाहण्याचा अनुभव आणखी सोप्पा केला. चित्रपट समजण्यासाठी प्रेक्षकांना याचा फायदा होतो, तसाच निर्मात्यांनाही होतो. याचे निर्मात्यांना होणारे फायदे सांगायचे झाल्यास एकाच वेळेस बरीच माहिती स्क्रीनवर देता येणे, यासाठी खर्च कमी येतो, तसेच चित्रपटाशी प्रेक्षक जोडले जातात, चित्रपट सुटसुटीत वाटतो हे चार प्रमुख फायदे सांगता येतील.

प्रेक्षकांशी जास्त परिणामकारकरीत्या संवाद साधण्याच्या उद्देशाने हे तंत्रज्ञान वापरले जात असले तरी हळूहळू चित्रपटाचा पडदा या गोष्टींनी व्यापला जात असल्याने चित्रपट पाहणे जास्त क्लिष्ट होण्याची भीतीही सौरभ यांनी व्यक्त केली. आयुष्यातील अनेक गोष्टी मल्टीकम्युनिकेशनमुळे गोंधळवणाऱ्या होत आहेत. तसेच चित्रपटाच्या पडद्याचे होणार आहे. आता टेक्स्ट ऑन स्क्रीनचा वापर हळूहळू वाढताना दिसतो आहे. त्यामुळे भविष्यात मोठय़ा प्रमाणात असे झाल्यास नक्की चित्रपट पाहताना लक्ष कुठे द्यायचं, असा प्रश्न निर्माण होईल. म्हणजे स्वप्निल-मुक्ताचे हावभाव पाहायचे की स्क्रीनवरील मजकूर वाचायचा यावरून प्रेक्षक गोंधळू शकतात. नवीन पिढीला हे बदल आत्मसात करणे सोप्पे जाते. पण वयानुसार असा अनेक माध्यमातून एकाच वेळेला होणारा संवाद समजताना गोंधळ होऊ  शकतो, असं सौरभ सांगतात. तंत्रज्ञानाचा वारेमाप वापर केल्यास त्या तंत्रज्ञानाशी जास्तीत जास्त प्रेक्षक संबंध जोडू शकतील याचाही विचार निर्मात्यांनी करायला हवा. नाहीतर त्या दृश्यांचे आकलन होताना त्याला कुठेतरी प्रतिबंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सौरभ यांनी सांगितले. मराठी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग आजही बऱ्याच प्रमाणात मध्यम किंवा वयोवृद्ध असल्याने हा वयाचा मुद्दा मराठी चित्रपटांत अशा प्रयोगांचा वापर करण्याआधी विचारात घ्यायला हवा.

चित्रपटांमध्ये संवाद घडवून आणणाऱ्या तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल बोलताना सौरभ करंदीकर म्हणतात, ‘दिवसेंदिवस आपलं बोलणं मूक झालं आहे. आपण लिहितो किंवा इमोजीच्या माध्यमातून चित्ररूपात जास्त बोलू लागलो आहोत. आज अनेकजण नुसते फोनकडे पाहून हसतात, पण ते संवाद साधत असतात आणि चेहऱ्यावरील भावनांवरून व्यक्त होतात. अशीच दृश्ये चित्रपटातही दिसतात. म्हणूनच आता हा पडद्यावर मजकूर दाखवण्याचा ट्रेण्ड वाढताना दिसतो आहे. जसा आपल्या वास्तव जीवनातील संवाद बदलणार तसा पडद्यावरच्या जीवनातील संवादही बदलणार आणि एकंदरीतच चित्रपटही बदलत जाणार. आज लेखी माध्यमातून होणारा संवाद हळूहळू श्रवणीय माध्यमाकडे चालला आहे. सिरी, गुगल असिटंट, इको, गुगल होम, अ‍ॅलेक्सासारख्या माध्यमातून आता आपण हळूहळू केवळ ऐकण्याकडे वळू लागलो आहोत. अनेक लेखी गोष्टींना पर्याय म्हणून त्याचे श्रवणीय माध्यमात रूपांत केले जात आहे. त्यामुळे जशी आता लेखी मजकुराची लाट आहे तशीच श्रवणीय मजकुराचीही लाट येईल लवकरच. आणि त्याचाही परिणाम चित्रपटांत दिसून येईल. कारण भविष्यात जर श्रवणीय माध्यमातील संवाद वाढला तर चित्रपटातील पात्रांचा हा संवाद वेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळे तंत्रज्ञान चित्रपटात नक्कीच दिसत राहील.