गेल्या दशकभरातील म्हणजे २०१४ पासून देशभरात बदललेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे आळेकरी शैलीतील ‘ठकीशी संवाद’ हे नवीन नाटक रंगमंचावर येत आहे. उदारमतवादी लोकशाही अवकाशाचा अंत झाला आहे का, या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न हे नाटक करते.

प्रसिद्ध अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री गिरिजा ओक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचा शुक्रवारी (१० मे) शुभारंभाचा प्रयोग होणार असून, पुण्यात श्रीराम लागू रंग-अवकाश येथे १४ मेपर्यंत नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील माजी विद्यार्थी अनुपम बर्वे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून, अमेय गोसावी हे निर्माते आणि गंधार संगोराम सहनिर्माते आहेत. या निमित्ताने तब्बल ११ वर्षांनंतर आळेकर यांचे नाटक रंगमंचावर सादर होत आहे.

गेल्या १० वर्षांत म्हणजे २०१४ पासून बदललेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर हे नाटक भाष्य करते. वेगळेपणा, दुसऱ्याचे काही ऐकून न घेण्याची वृत्ती, जीवन जगताना सतत धर्माची करून दिली जाणारी आठवण या गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात. उदारमतवादी लोकशाही अवकाशाचा अंत झाला आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कोणतीही गोष्ट सांगण्यात आली नसून, हे नाटक म्हणजे प्रेक्षकांशी केलेला दीर्घ संवाद आहे. ‘ठकीशी संवाद’ हे दोन पात्री नाटक असून, त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली ७५ वर्षांची वृद्ध व्यक्ती सध्याच्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर आपले भाष्य मांडते, असे आळेकर यांनी सांगितले. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. नाटकाचे मुख्य पात्र असलेला एक मराठी नाटककार मराठी रंगभूमीच्या इतिहासाविषयी ‘ठकी’ या बाहुलीशी सखोल संवाद साधतो. हाच संवाद म्हणजे हे नाटक आहे.

हेही वाचा >>> Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान

या नाटकाचा विषय मला स्वत:ला फार महत्त्वाचा वाटतो. आजच्या काळाचे प्रतिबिंब उभे करण्याबरोबरच हे नाटक प्रेक्षकांना भूतकाळातही घेऊन जाते. मराठी रंगभूमीकडे विशिष्ट नजरेने पाहण्याची मुभा हे नाटक देते. यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, नवे तंत्रज्ञान, परंपरांशी असलेला दुवा तुटत जाणे, तो पुन्हा पुनरुज्जीवित होणे या बाबींवरही हे नाटक भाष्य करते. इतकेच नव्हे, तर मागील १० वर्षांच्या राजकीय पटलाबद्दल ठाम मत हे नाटक मांडते. ‘ठकीशी संवाद’ हे नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाल्याबदल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. अनुपम बर्वे, दिग्दर्शक

या नाटकाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो असलो, तरी या सर्वांनाच मी गेली अनेक वर्षे ओळखते. या सर्वांसोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे आयुष्यभरासाठी एक समृद्ध अनुभव आहे. गिरिजा ओक, अभिनेत्री

व्यावसायिक रंगभूमीची आव्हाने आणि प्रायोगिक रंगभूमीची आव्हाने ही वेगवेगळी असतात. या नाटकाच्या निमित्ताने आम्ही कलाकार म्हणून काही गोष्टींचा पुनर्शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सुव्रत जोशी, अभिनेता

Story img Loader