नीलेश अडसूळ
दैववादाची वेस ओलांडून मानवी भावभावनांना मोनालिसाच्या रूपाने चितारून लिओ नार्दो दा व्हिन्सीने जी क्रांती घडवली. त्याच क्रांतीची बीजं प्रत्येक कलाकाराच्या अंतरात रुजलेली आहेत असे वाटते. विशेष म्हणजे तथाकथित धर्माधिष्ठित समाजाविरुद्ध एका बाईच्या चित्रातून बंड करावं असं का बरं वाटलं असेल? पण तेव्हाही क्रांतीला कारण स्त्री झाली याचा आनंद काही औरच. हे झालं एक उदाहरण. पण या पलीकडे जगात अनेक अशा क्रांत्या घडल्या ज्याच्या द्योतक स्त्रिया होत्या. मग मराठी नाटकही याला अपवाद नाही. अन्याय करण्यासाठी समाजाला स्त्री ही कायमच सहज माध्यम वाटत राहिली आणि काळाचे अनंत सोस ती सोसत गेली. सुधारकांनी त्यांच्या मनाचा ठाव घेत या परिस्थितीला उलथूनही लावले, पण त्याच स्त्री मनाचा कवडसा अनंत काळापर्यंत जिवंत ठेवण्याचं काम मराठी नाटकांनी केलं. मग भारूड, तमाशा, संगीत नाटकापासून सुरू झालेला हा प्रवास आताच्या ‘बाई वजा आई’ किंवा ‘ऐश्वर्या ब्युटी पार्लर’पर्यंत पोहोचतो..
अनंत तरल पदरांनी घडलेल्या चिरोटय़ांसारखं बाईंचं संवेदनशील मन उलगडावं तेवढं कमीच. आणि तेच उलगडण्याचं काम, नव्हे तर उलगडून समाजासमोर ठामपणे मांडण्याचं काम कलाकार आपल्या कलाकृतीतून करत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे काळानुसार बदलणारे स्त्रियांचे भावविश्व, व्यथा, प्रश्न मांडण्याचे काम नाटकातून केले जाते. अशाच ‘ती’ नाटकांचे हे काही प्रयोग.
स्त्रियांचे विषय म्हणजे प्रत्येक वेळी त्यांच्यावर मारझोड किंवा अन्यायच व्हायला हवा असे काही नसते. अनेकदा आपल्या प्रेमामुळेही ती तिच्या अनेक सुप्त इच्छा मारत असते. तोही तिच्यावरचा एक अन्यायच नाही का? सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकात अशाच एका आईची आजीची व्यथा मांडण्यात आली आहे. ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते सांगतात, मराठी रंगभूमी कायमच स्त्रियांच्या बाजूने उभी आहे. काळाचे आणि काळाच्या पुढचे कितीतरी विषय आजवर इथे सादर झाले. ‘चारचौघी’ आणि ‘मन उधाण वाऱ्याचे’ या दोन्ही नाटकांचा मी स्वत: भाग होते. नवऱ्याविरुद्ध बंड करणारी ती. नवऱ्याजवळ असणारी तिची मुलगी, तीन मुली असणारी तिची आई आणि दोन पुरुषांशी संसार करू पाहणारी तिची बहीण अशा चार चौघींचे भावविश्व उलगडणारे ‘चारचौघी’ हे नाटक वीस वर्षांपूर्वी येणं हे फारच धाडसाचं होतं, पण तो प्रयोग मराठीत झाला. १० वर्षांपूर्वी ‘मन उधाण वाऱ्याचे’ या नाटकात एक शाळकरी मुलगा शिक्षिकेच्या प्रेमात पडतो आणि त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्या शिक्षिकेला करावा लागलेला संघर्ष हाही तितकाच वास्तववादी होता. तर प्रेमापोटी गृहीत धरल्या गेलेल्या आईची घुसमट आताच्या ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकातून मांडली आहे. संसारात सुखी असलेली मुलगी जेव्हा सातत्याने आईकडे येते. तिच्यावर आपल्या नवऱ्याची, मुलाची जबाबदारी टाकते तेव्हा तिला ती स्वीकारायची आहे का याचा विचार कुणीही करत नाही. नवरा नसलेल्या एका वयस्कर बाईला तिचं भावविश्व नसू शकतं का, तिच्या काही मानसिक गरजा नसू शकतात का? मग त्या काय असतील याची जाणीव ती आई आपल्या मुलीला करून देते. प्रेमामुळे आलेलं लादणं, गृहीत धरणं याचा परामर्श हे नाटक घेतं. जे आजच्या काळात प्रत्येक कुटुंबाने पाहावं असं आहे, असं त्या सांगतात.
ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे यांनी शनिवारी त्यांच्या ‘व्हय, मी सावित्रीबाई’ या नाटकाचा शेवटचा एकपात्री प्रयोग सादर केला. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. त्या सांगतात, एका ऐतिहासिक स्त्रीकडे माणूस म्हणून बघणारे हे नाटक आहे. प्रा. राम बापट यांच्या मार्गदर्शनाखाली हे लिहिलं गेलं. मुळात एखाद्या व्यक्तीचे काळाने केलेले उदात्तीकरण दाखवण्यापेक्षा सत्य बाजू काय आहे, तिचा संघर्ष काय आहे, हे मांडण्याचा मी प्रयत्न केला. पुढे त्या सांगतात, अनेकदा समाजाला काय अपेक्षित आहे हे पाहून नाटक लिहिले जाते परंतु आजची स्त्री कशी आहे, तिचे प्रश्न काय आहेत हे कोणताही आडपडदा न ठेवता नाटकातून यायला हवे.
तर ‘ऐश्वर्या ब्युटी पार्लर’ या नाटकातून माध्यमवर्गीय घरातल्या स्त्रिया आणि पार्लर यांचे नाते विशद केले आहे. आज पार्लर ही अशी गोष्ट आहे जी गावागावात पोहोचली. पण ती का पोहोचली. नेमकी आहे त्यापेक्षा सुंदर दिसण्याची गरज का वाटू लागली आज याचा परामर्श हे नाटक घेते, असे नाटय़ निर्माते भारत जाधव सांगतात. त्यांच्या मते हे केवळ पार्लर नाही तर पार्लरमध्ये जाणाऱ्या प्रत्येकीच्या आयुष्यात असलेल्या व्यथा सांगण्याचं व्यासपीठ आहे. जिथे वयानुसार येणाऱ्या ‘ती’च्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. ‘सौंदर्यातील वेदना, आणि वेदनेमागील सौंदर्य’ दाखवण्याचा यामागील उद्देश असल्याचेही भरत सांगतात.
माझ्या कारकीर्दीची सुरुवातच एका ‘गंगुबाई’ नावाच्या बाईमुळे झाली, असे दिग्दर्शक राजेश देशपांडे सांगतात. पुढे ते सांगतात, महाराष्ट्रात गाजलेली ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ ही नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तीनही माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर आलेलं ‘श्री बाई समर्थ’ हे नाटकही पुरुषी मानसिकतेला छेद देणारं होतं. घरी असलेली बाई कुठे काय करते, तिला कुठे काय काम असतं अशी एकूणच मानसिकता आपल्याकडे आहे. पण तीच बाई जेव्हा घरच्या कामाचा पगार मागते तेव्हा त्या घरात काय होतं हे सांगणारी मध्यमवर्गीय गृहिणीची ही कथा होती. आणि आता आलेलं ‘हिमालयाची सावली’ हे नाटक जितकं हिमालयाचं आहे तितकंच ते त्या सावलीचं आहे. किंबहुना एका क्षणाला ते सावलीचंच आहे असं वाटू लागतं. नवऱ्याला मोठं करण्याचं तिचं सामर्थ्य, मुलांना समजून घेणारी ती आणि समाजकार्यासाठी वाहत चाललेल्या नवऱ्यासोबत स्वत:लाही वाहून घेणारी ती ‘बयो’ ही अनेक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. आजही समाजात अशा अनेक सावल्या आहेत ज्यांना प्रकाशात आणण्याचं काम हे नाटक करतं.
नुकत्याच आलेल्या ‘बाई वजा आई’ या नाटकात नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या मानसिक अवस्थेवर प्रकाश टाकला आहे. त्या एकीकडे संसारासाठी नोकरी करत असतात, पण दुसरीकडे समाज त्यांना सतत ‘अपराधी’भावना देत असतो. हे पुरुषांकडून होतं असं नाही, घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडून तिच्यावर ताण येत असतो आणि या तणावामुळे आपण कुठेतरी कमी पडत आहोत ही अपराधीपणाची भावना घेऊन ती जगत असते. म्हणूनच ‘घरातल्या बऱ्या वाईट गोष्टींसाठी ती जबाबदार असते हे गृहीतक मोडणारं हे नाटक आहे’, बाईला काय वाटतं, तिला कसं जगायचंय हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे कामावर जाणाऱ्या स्त्रियांचे जीवन आणि ज्या जात नाही त्यांना घरात बसून काय काय सहन करतात याचाही वेध नाटकाने घेतला आहे. आजही तिला घरातून पुरेसा पाठिंबा मिळत नाही ही घराघरांतली कहाणी आहे. तिच्यावर असलेलं अपेक्षांचं ओझं आता कुठेतरी उतरायला हवं हाच आमचा उद्देश आहे.
सोशिक द्वंद्व.. रंगभूमीवर सातत्याने हाऊसफुलच्या पाटय़ा झळकवणारं नाटक म्हणजे ‘देवबाभळी’. प्राजक्त देशमुख या तरुण लेखकाने मांडलेले हे विचार रुक्मिणीकडे माणूस म्हणून पहायला भाग पडतात. ‘आपल्याला विठ्ठल आणि तुकाराम कोण होते हे जगात कुणीही सांगेल, पण रुक्मिणी आणि आवडी यांच्या संघर्षांचं काय, हा विचार या नाटकामागे असल्याचं लेखक प्राजक्त देशमुख सांगतो. पुढे तो म्हणतो, ते त्या दोघींचं विश्व आहे म्हणून नाटकात कुठेही तुकाराम किंवा विठ्ठल ही पात्रं आणली नाहीत. त्या दोघींचे प्रश्न मांडावेत असं नाटक लिहिताना कधीही मनात आलं नाही. पण त्यांच्या जीवनाच्या जवळ गेलो आणि प्रश्न आपसूकच दिसून आले. आपापल्या नवऱ्यांची बाजू घेणाऱ्या या, कुठेतरी तक्रार करू पाहत आहेत, तितक्याच त्या सोशिकही आहेत त्यामुळे नात्याचं द्वंद्व इथे दिसून येतं. तर दुसरीकडे सामान्य बायकांसारख्या त्या एकमेकांना धीरही देताना दिसतात, काळजी करताना दिसतात. म्हणूनच ही कथा सामान्य स्त्रीलाही लागू होते. एका जखमेभोवती फिरणारी कथा जखम भरून संपते. पण ती भरेपर्यंतच्या काळात जे जे होतं ते यामागील स्त्रीविश्व आहे.
रोज असावा महिला दिन
स्त्रियांच्या आयुष्यात बदल घडवण्यात नाटकाचा खूप मोठा वाटा आहे. हे प्रभावी माध्यम असल्याने बदल घडण्यासाठी नवनवीन विषय हे रंगभूमीवर यायलाच हवेत आणि ते येत आहेत. नाटक ते सत्याची अनुभूती देणारे असल्याने अनेकांना जागं करण्याचं, ताकद देण्याचं काम ते करत असतं. पडद्यामागे स्त्रियांचे इतके विषय आहेत की ते मांडण्यासाठी रोज एक नाटक करावं लागेल. विशेष म्हणजे महिला दिन हा एका दिवसाचा नसतो तो रोज घराघरात साजरा झाला तर आपले अनेक प्रश्न सुटतील.
वंदना गुप्ते
स्त्री लेखिका हव्यात
स्त्रियांचे विषय पुरुषांकडून मांडले जातात हे स्तुत्यच आहे. परंतु मुलींनी लिहितं व्हायला हवं. स्त्रियांचे विषय स्त्रियांच्या अंगाने मांडले गेले तर ते अधिक तरल स्वरूपात येतील. त्या लिहीत नाहीत असं नाही. इरावती कर्णिक, मनस्विनी अत्यंत उत्तम पद्धतीने विषय मांडत आहेत आहेत, पण हा टक्का वाढायला हवा.
सुषमा देशपांडे
प्रश्न दोघांचे..
आज स्त्री-पुरुषांच्या बरोबरीने घराबाहेर पडत आहे. त्यामुळे दोघांचे प्रश्न काहीसे समान झाले आहे. त्यातही नात्यात एखादी अडचण आली तर त्याला दोघांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे नाटकातून दोघांचेही विषय यावे. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगायचं तर स्त्री विश्वात फक्त सामाजिकच नाही तर त्यांचे असे वैयक्तिक विषयही आहेत. जे हेरून आपल्याला नाटकात आणता येतील.
भरत जाधव
जबाबदार ती..
स्त्रिया जाड होणं हे आपल्या चटकन नजरेत येतं, पण संसारासाठी दिवसरात्र राबणाऱ्या त्या महिला स्वत:कडे लक्ष द्यायला विसरून जातात, हे मात्र आपण सर्रास विसरतो. घर, दार, संसार, मुलांचं संगोपन या गोष्टी तिच्या पुढाकारामुळे सुरळीत चाललेल्या असतात. आणि आता तर त्या घराबाहेरचं काम आणि घरातलं काम अशा दोन्ही आघाडय़ांवर लढत आहेत. त्यामुळे तिच्या समस्या आणि जबाबदारी या दोघांमध्ये वाढ झाली आहे. त्या समजून आपण तिच्यासोबत उभं राहायला हवं.
राजेश देशपांडे
नाटकांतून प्रतिबिंब
बेचकी, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे, समुद्र, शेखर खोसला, देवबाभळी, गुमनाम, सोयरे सकळ या आणि अशा प्रत्येकच नाटकातून ‘स्त्री’ अधोरेखित झाली आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील स्त्रियांचे वास्तव त्या त्या वेळच्या नाटकातून प्रतिबिंबित होत असते. म्हणूनच स्त्रीविषयक नाटकांना मोठा वारसा आहे. ‘देवबाभळी’ ही असेच एक नाटक आहे हे देवत्वापलीकडे जाऊन रुक्मिणी आणि आवडीकडे माणूस म्हणून पाहायला लावते. आज पुरुषांपेक्षा स्त्रिया काकणभर सरस काम करत आहेत. त्यामुळे बदलत्या स्त्रीचेही विषय रंगभूमीवर येत राहतील.
प्रसाद कांबळी
बाईचं मन होऊन पहा..
मराठी नाटक हे नेहमीच त्या त्या काळातली बाई उभी करत आलं आहे. त्यातल्या अनेक भूमिकांचा अनुभव मला मिळाला. संजय पवारांचं ‘बाई वजा आई’ करताना जाणवलं की एका पुरुषाने बाईच्या मनात शिरून तिला नाटकात उभं केलं आहे. ते जर प्रत्येक पुरुषाला करता आलं ते नक्कीच आपल्याकडे वेगळी समाजव्यवस्था निर्माण होईल. बाईच्या मनात शिरण्यापेक्षा एक दिवस ‘बाईचं मन होऊन पहा, मग कळेल त्या काय काय सहन करत असतात.’
सुप्रिया विनोद