रवींद्र पाथरे
मिताली सहस्रबुद्धे.. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणारी एक तरुणी. यश पटवर्धन.. कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चपदस्थ तरुण.
एकदा कधीतरी चुकून मितालीच्या स्त्रीमुक्ती आंदोलनाचा आविष्कार यश पाहतो आणि प्रथमदर्शनीच तिच्या प्रेमात पडतो. तिची स्वत:हून ओळख करून घेतो. यथावकाश मितालीही त्याच्या प्रेमात पडते. दोघांनाही परस्परांच्या कामाच्या स्वरूपाची कल्पना असते. लग्नापूर्वी त्यांनी एकमेकांना ती नीटपणे दिलेली असते. मात्र, तरीही दोघांच्या केमिस्ट्रीत काहीतरी बिनसते आणि लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी त्यांच्यात ठिणगी पडते.
मितालीचा स्त्रीमुक्ती चळवळीतला सहकारी राजदीप याच्यासोबतचं तिचं सततचं सान्निध्य यशच्या मनात संशयाचं बीज पेरतं. त्यामुळे तो मितालीला राजदीपपासून दूर राहण्यास सांगतो. मिताली त्याच्या इच्छेनुसार राजदीपपासून काहीएक अंतर राखायचा प्रयत्न करतेही; परंतु कामानिमित्तानं त्याच्याशी संपर्क ठेवणं तिला भागच असतं. पण यशला ते खटकत राहतं. यशला राजदीप खुपतो हे माहीत असल्यानं तो घरी असताना शक्यतो राजदीपने फोन करू नये असं तिनं त्याला बजावलेलं असतं. तरीही लग्नाच्या वाढदिवशी यश घरी असतानाच राजदीपचा तिला फोन येतो. त्यामुळे यशचं माथं सणकतं. तो तिच्यावर सडकून तोंडसुख घेतो. तिच्या स्त्रीमुक्तीच्या कल्पनांविषयी अद्वातद्वा वाग्बाण सोडतो. मिताली त्याला समजवायचा खूप प्रयत्न करते, पण तो काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसतो. राजदीप आणि तिचे अनैतिक संबंध असल्याचा उघडपणे आरोप तो करतो. त्यासंदर्भात तिच्या राजदीपबरोबरच्या भेटीगाठींचा, कामाच्या निमित्ताने बाहेरगावी दोघांनी एकत्र जाण्याचा तपशील तो पुराव्यादाखल तिच्या तोंडावर फेकतो. मिताली त्याच्या या भयंकर दर्शनाने स्तंभित होते. त्याच्या आरोपांवर खुलासा करू बघते. पण यश तिचं काही ऐकूनच घेत नाही.
‘जशास तसं’ या न्यायानं मग तीही यशला त्याची निकटची सहकारी गीता अय्यंगार हिच्याविषयी छेडते. गीताबरोबरच्या त्याच्या संबंधांबाबत त्याला टोकते. त्याने तर तो अधिकच संतापतो. गीताचे आणि माझे तुझ्यासारखे ‘तसले’ संबंध नसल्याचं चिडून सांगतो. ती आपली केवळ एक सहकारी असल्याचं स्पष्ट करतो. याउलट, मितालीला आपण रंगेहात पकडल्यानं ती हा हेत्वारोप करत असल्याचा कांगावा करतो.
नेमका त्याचदरम्यान राजदीपचा पुन्हा फोन येतो. मिताली यशलाच तो फोन घ्यायला सांगते. यश फोन घेतो खरा; पण राजदीप त्याला आपल्याला मितालीशी बोलायचं असल्याचं सांगतो. यश तिच्याकडे फोन देतो. ती त्याच्याशी जुजबी बोलून लगेचच फोन ठेवून देते. त्याने यशच्या तळपायाची आग मस्तकातच जाते. तो तिला राजदीपने कशासाठी फोन केला होता असा जाब विचारतो. मिताली त्याला खरं काय ते सांगते. पण यशला ते पटत नाही. तो तिला नाही नाही ते बोलतो.
अशातच ती आपल्याला दिवस गेल्याचं आणि हे मूल राजदीपपासून आपल्याला राहिल्याचं शांतपणे त्याला सांगते..
लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी ‘तिला काही सांगायचंय!’मध्ये आपण एक समकालीन स्फोटक विषय मांडत असल्याची पोझ नाटकात घेतली असली तरी वरवरचा वर्ख खरवडला की त्यात नित्याचीच पारंपरिक मांडणी असल्याचं आढळून येतं. मिताली आणि यश यांनी एकमेकांचे आचारविचार समजून उमजून घेऊन लग्न केलं होतं की भावनेच्या भरात, असा प्रश्न त्यामुळे पडतो. अन्यथा इतक्या संशयी, प्रतिगामी विचारांच्या यशशी स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यकर्ती असलेली, ते विचार जाणतेपणानं आत्मसात केलेली मितालीसारखी मुलगी लग्न कशी काय करू शकते? बरं, तिचा घरातला वावर, यशशी तिचं वागणं-बोलणं हे स्त्रीमुक्ती चळवळीतल्या एका कार्यकर्तीचं आहे असं मुळीच दिसत नाही. ते एखाद्या टिपिकल गृहिणीचं किंवा नवऱ्याच्या अतीच प्रेमात असलेल्या एखाद्या नवविवाहितेचंच वाटतं. खरं तर यशनं तिच्या आणि राजदीपच्या संबंधांबद्दल पहिल्या प्रथम संशय घेतल्यावर आत्मभान जागृत असलेल्या कुणाही तरुणीनं त्याला त्याक्षणीच फैलावर घेतलं असतं. स्त्रीमुक्तीवादी तरुणीनं तर नक्कीच. पण तसं न करता मिताली राजदीपशी यशच्या परोक्ष चोरीछुपके बोलणं-चालणं करण्याचं ठरवते. इथंच तिचे स्त्रीमुक्तीसंबंधीचे कचकडी विचार उघडे पडतात. स्वाभाविकपणेच पुढची सारी मांडणी मग लेखक-दिग्दर्शकाच्या सोयीनं झाल्यास नवल नाही. लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी यात मितालीला संयत वृत्तीची दाखवून तिच्यावरच्या यशच्या संशयाला बळकटी येईल असं पाहिलं आहे. परंतु पुढे जे वास्तव समोर येतं ते ‘नाटकीय’ असलं तरी मितालीला न्याय देणारं नक्कीच नाही. हे नाटक काहीएक ‘पोझ’ घेऊन लिहिलं गेलं आहे आणि तशाच प्रकारे मंचितही केलं गेलं आहे. स्त्रीमुक्तीच्या विचारांची तकलादू झालर नाटकात लावली गेली असली तरी यश ज्या भाषेत मितालीला सुनावतो ती खचितच त्याच्या सुसंस्कृत असण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करते. नाटकातील धक्कातंत्रीय क्लृप्त्यांचा वापर प्रेक्षकांना बांधून ठेवण्यासाठी होतो खरा; परंतु मिताली-यश यांच्यातील भांडण फिरून फिरून तिथंच घुटमळत राहिल्यानं नाटकाचा प्रवास खुंटतो. तशात मितालीच्या देहबोलीतून अपराधगंड दृगोचर होत असल्यानं तर ते कलंडतंच. तिच्या या वर्तनाला संयम म्हणायचं की तिची पाश्र्वभूमी त्याला कारण आहे, की ती एक लेखकीय निकड आहे, असा प्रश्न विचक्षण प्रेक्षकाला पडतो. दोनच पात्री नाटक असल्यानं त्यात एका टप्प्यानंतर काहीसं साचलेपण हे येतंच. त्यावर मात करतो तो खरा लेखक (वा दिग्दर्शक)! परंतु इथे दोन्ही भूमिका हेमंत एदलाबादकर हेच निभावत असल्यानं ही जबाबदारी त्यांच्यावरच येते. त्यात ते कमी पडले आहेत. मिताली ही स्त्रीमुक्ती चळवळीतली कार्यकर्ती दाखविली नसती तर हेच नाटक चाकोरीबद्ध कौटुंबिक फॉम्र्युल्यात फिट्ट बसू शकलं असतं. आणि तसं ते स्वीकारलंही गेलं असतं. दुसऱ्याच्या घरात चोरून बघण्याच्या उपजत मानवी प्रवृत्तीनुसार संशयकल्लोळी नाटक प्रेक्षकाला धरून ठेवतंच. त्याप्रमाणे हेही नाटक त्याला धरून ठेवतं. तशात यशच्या रूपात प्रतिगामित्वाचंही नाटकात जोरदार समर्थन केलेलं असल्यानं पारंपरिकतेचे समर्थक असलेल्या प्रेक्षकांचा गंड न सुखावला तरच नवल.
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी यशचा आलिशान फ्लॅट तपशिलांनिशी साकारला आहे. शीतल तळपदेंच्या प्रकाशयोजनेतून नाटय़ात्म क्षण उठावदार होतात. मंगल केंकरे यांनी आधुनिक जोडप्याला साजेशी वेशभूषा दोघांना दिली आहे. राहुल रानडे यांच्या संगीतातून यातले आघाती प्रसंग वास्तवदर्शी केले आहेत. शरद सावंत यांनी रंगभूषेची धुरा सांभाळली आहे. आस्ताद काळे यांचं नैसर्गिक आक्रमक व्यक्तिमत्त्व यशच्या भूमिकेसाठी त्यांना साहाय्यकारी ठरलं आहे. संशयग्रस्त आणि पारंपरिक संस्कारांचा समर्थक नवरा, वरकरणी आधुनिकतेचा पांघरलेला आपला बुरखा फाटू नये म्हणून प्रयास करताना होणारी त्याची कुतरओढ, पुढे लेखकीय सोयीनं होणारं त्याचं मनपरिवर्तन या गोष्टी त्यांनी यथार्थपणे दाखवल्या आहेत. तेजश्री प्रधान यांनी नको इतकी सहनशील, आपल्या विचारांशी प्रतारणा करत नवऱ्याला खूश ठेवण्यासाठी संयमाचं टोक गाठणारी, त्यापायी देहबोलीत अपराधगंड आलेली आणि पुढे प्रतिहल्ल्याकरता ‘विचित्र’ पवित्रा घेत यशला नामोहरम करू बघणारी मिताली साकारली आहे. या सगळ्या घटना-घडामोडींना लेखकानं शेवटी एक विवक्षित कार्यकारणभाव दिला असला तरी तो विवेकी मनांस पटणं जरा अवघडच.