भक्ती परब
लेखकाला त्याची लेखणी स्वस्थ बसू देत नाही. त्याचे शब्द त्याला आधार आणि आव्हानही देतात. कितीही वादळं आली तरी लेखकाची नाव काही काळ हिंदळकते, डगमगते पण प्रवास सुरू राहतो, थांबत नाही. कारण कितीही आव्हानं आली तरी न थांबता संघर्ष करत राहण्याची हिंमत लेखन देतं. असंच राही बर्वे यांच्या बाबतीत घडलं. त्यांनी दहा र्वष ‘तुंबाड’ चित्रपटासाठी दिली. कथा लिहून तयार होती, पण कोणी निर्माता मिळत नव्हता. पण आता त्यांचं हे स्वप्न पूर्ण होतं आहे. नुकताच ‘तुंबाड’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘तुंबाड’ हा चित्रपट कथा, मांडणी, ‘व्हीएफएक्स’चा वापर आदी सगळ्याच बाबतीत एक वेगळा प्रयोग मानला जातो. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक राही बर्वे, निर्माते आनंद एल. राय आणि अभिनेता सोहम शाह यांच्याशी झालेला संवाद..
निर्माता आणि अभिनेता सोहम शाह भेटला नसता तर अजूनही ‘तुंबाड’चा संघर्ष सुरूच राहिला असता. कथा वाचल्यानंतरच ‘तुंबाड’ हा खर्चीक चित्रपट असून कथेचा आवाका खूप मोठा आहे. या आधी ‘मांजा’ नावाचा लघुपट केला होता. गेल्या दहा वर्षांतील संघर्षांतून ‘तुंबाड’ चित्रपट साकार झाला असून हा चित्रपट नारायण धारप यांच्या कथेवर आधारित आहे. ‘तुंबाड’ हे गावाचं नाव असून चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील साताऱ्याजवळील एका गावात स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याचं राहीने सांगितलं.
कलाकाराचा संघर्ष कधी संपत नाही. तो संघर्ष मग कलाकृती वास्तवात आकारास आल्यावर काहीसा सुसह्य़ होतो एवढंच. चित्रपटाची कथा म्हणून सगळ्यांना आवडायची. पण निर्मिती करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं. आजच्या काळात कशाप्रकारचे चित्रपट यशस्वी होतात, हे बघून नव्हे तर कथेच्या अस्सलपणामुळेच त्यावर चित्रपट करायच्या वेडाने अक्षरश: झपाटून गेलो होतो. हा चित्रपट रहस्य, गूढ, भयपट असून चित्रपटासाठी साडेसहाशे पानांचा ‘स्टोरीबोर्ड’ लिहिला असल्याचे राहीने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
चित्रपटातील पावसाचं चित्रीकरण हा परीक्षा पाहणारा काळ होता. खराखुरा पाऊस, त्याची वाट पाहणं, चित्रीकरण करणं हा सगळा प्रकार वेडेपणाच होता. इतर कोणी निर्माता असता तर तो कंटाळला असता, सेटवरून निघून गेला असता, पण सोहमने तसं केलं नाही, त्याने संयम दाखवला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दिग्दर्शक आणि निर्माते आनंद एल. राय यांनी ‘तुंबाड’ची निर्मिती केली आहे. त्याविषयी आनंद म्हणाले, ‘तनु वेड्स मनू’ ते ‘झिरो’ असा माझा निर्माता, दिग्दर्शक म्हणून चित्रपट प्रवास आहे. माझ्या प्रत्येक चित्रपटातून नेहमीच प्रेक्षकांना नवीन विषय आणि विचारही दिला आहे. ‘तुंबाड’ची गोष्ट मला भावली. हा चित्रपट काल्पनिक भयपट आणि थरारक दृश्यांनी खिळवून ठेवणारा आहे.
‘तुंबाड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ७५ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय महोत्सवात समीक्षक विभागात दाखवण्यात आलेला ‘तुंबाड’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. अभिनेता सोहम शाहबरोबर अनिता दाते-केळकर, दीपक दामले, धुंडिराज जोगळेकर, हरीश खन्ना, ज्योती मालशे हे कलाकार चित्रपटात आहेत. चित्रपटात स्वातंत्र्यापूर्वीचा (१९२०) काळ दाखवण्यात आला असून माणसाचा लोभीपणा, एखाद्या गोष्टीचा त्याने धरलेला हव्यास कुठलं रूप धारण करू शकतो, त्यामुळे काय होतं? त्याची गोष्ट यात असल्याचे आनंद यांनी सांगितले.
प्रेक्षकांच्या आवडीनिवडीपेक्षा चांगला चित्रपट करणं ही काळाची गरज आहे. तुमच्याकडे चांगली कथा असेल तर ती चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याची हिंमत केलीच पाहिजे. चित्रपट चालेल की नाही याची भीती न बाळगता पुढे गेले पाहिजे. हॉलीवूड चित्रपट तांत्रिकदृष्टय़ा चांगले असतात, त्यांची बॉलीवूडशी स्पर्धा आहे, असं म्हणून चालणार नाही. आपण जास्तीत जास्त किती चांगले चित्रपट करू शकतो, त्याचा विचार केला पाहिजे. प्रेक्षकांना मोठय़ा पडद्यावर सिनेमॅटिक वातावरण अनुभवायला आवडतं. आपण प्रयोगशील राहून तो अनुभव त्यांना द्यायला हवा, असेही आनंद म्हणाले.
अभिनेता सोहम शाहचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला, चित्रपटात मी ‘विनायक’ ही मध्यवर्ती भूमिका साकारतो आहे. ‘तुंबाड’ची कथा वाचली आणि ही भूमिका करायचं ठरवलं. कारण अशी संधी मला पुन्हा मिळणार नव्हती. लहान असताना ‘विक्रम वेताळ’, ‘पंचतंत्र’ किंवा आजी-आजोबांकडून ऐकलेल्या ज्या गोष्टी होत्या, तशा प्रकारची ही गोष्ट आहे. चित्रपटातील साहस दृश्ये, मराठीतील काही संवाद उच्चारण आणि चित्रपटातील ‘लूक’साठी खूप मेहनत घेतली आहे.