झीरो
काही काही दिग्दर्शक, त्यांचे विचार, त्यांची मांडणी यावर आपला इतका विश्वास असतो की त्यांची एखादी गोष्ट फसली तरी किती.. अगदी भ्रमनिरास होईल इतकी नाही. असे काही ठोकताळे मनाशी असतात. मात्र झीरोच्या बाबतीत तसे घडले किंबहुना दिग्दर्शक म्हणून आनंद एल. राय यांच्याबाबतीत ते पहिल्यांदा घडले आहे. छोटय़ा शहरांची नाळ अचूक पकडणारा, तिथल्या तरुणांच्या मानसिकतेसह त्यांची भाषा, बोली, पेहराव सगळे आहे तसे घेत नेटकी गोष्ट सांगणारा हा दिग्दर्शक बऊआ सिंगची प्रेकमथा रंगवताना मात्र फँ टसीच्या अवकाशात हरवला. उंचीने वीतभर असला तरी आकाशाच्या उंचीएवढा आत्मविश्वास असणाऱ्या बऊआची कथा (प्रेमकथा असती तरी)वास्तवाचा धागा पकडून राहिली असती तर निश्चितच भरकटली नसती आणि मनाच्या अवकाशात विहरली असती.
मेरठसारख्या शहरात जन्माला आलेला आणि बुटका असल्याने लहानपणापासून सगळ्यांच्या चेष्टेचा विषय ठरलेला बऊआ (शाहरूख खान) हे भन्नाट व्यक्तिमत्त्व आहे. आपल्याबाबतीत जे काही वाईट करायचे होते ते देवाने आधीच केले आहे, यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही, या आत्मविश्वासाने बेधडकपणे जगणारा, कुठल्याही चौकटीत न बसणारा असा बऊआ लग्नासाठी मुलगी शोधत असतो. आणि आफियाचे (अनुष्का शर्मा) छायाचित्र त्याच्या नजरेस पडते. आफिया व्हीलचेअरवर असलेली हुशार नासाची शास्त्रज्ञ. आफियाच्या अपंगत्वाबद्दल, तिच्या एकूणच शैक्षणिक, करिअरच्या उंचीबद्दल माहिती नसलेला बऊआ केवळ तिला पटवण्यासाठी तिच्यासमोर येऊन थडकतो. आफियाचे वास्तव समोर आल्यानंतर तो तिच्या प्रेमातही पडतो. पण गमतीगमतीत रंगलेला हा बऊआचा खेळ वास्तवात लग्नापर्यंत पोहोचल्यानंतर मात्र तो भांबावतो. पूर्वार्धात रंगलेली एका बुटक्याची आणि शास्त्रज्ञाची ही प्रेमकथा दुसऱ्या भागात मात्र थेट अवकाशात पोहोचते तेही व्हाया बबिता कुमारी (कतरिना कैफ) आणि बॉलीवूड.. इथे दिग्दर्शकाचा वास्तवाशी आणि तर्काशी सुटलेला धागा शेवटपर्यंत जुळतच नाही. बॉलीवूडी प्रेमक था आणि त्यांचे नायक-नायिका कायमच त्यागमूर्ती राहिलेले आहेत. इथेही ते त्याच पद्धतीने समोर येतात.
चित्रपटाच्या पूर्वार्धावर दिग्दर्शक म्हणून आनंद एल. राय यांची पकड जाणवते. बऊआसारख्या व्यक्तीने दाखवलेले प्रेम बेगडीही असू शकते. मात्र ती शक्यता धरूनही बऊआ ज्या सहजतेने तिला सर्वसाधारण मुलीप्रमाणे वागवतो तोच बंध घट्ट धरून आफिया त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते. अपंग असली तरी एक हुशार, तडफदार अशी शास्त्रज्ञ असलेली आफिया भावते. आणि बऊआबरोबरचे तिचे फुलत जाणारे नातेही आपल्या मनात घर करायला लागते. आफिया आणि बऊआमधले हे प्रसंग दिग्दर्शकाने खूप छान रंगवले आहेत. बऊआ काय किंवा आफिया काय या दोन्ही व्यक्ती शारीरिक दौबल्र्यामुळे समाजाने नाकारलेल्या असल्या तरी त्या ठामपणे स्वत:च उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांना इतरांची तमा नाही. दोन तितक्याच कणखर पण भिन्न परिस्थितीतील दोन व्यक्तिरेखा एकत्र येतात तेव्हा पुढे काय घडू शकते, हे पाहणे नक्कीच रंजक ठरले असते. प्रत्यक्षात बऊआचे काय करायचे किंवा आफियाचे काय करायचे. अगदी बॉलीवूडच्या चकचकाटी दुनियेत खऱ्या प्रेमाला तरसलेली, प्रेमात हार मानलेली बबिताही स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून खूप वास्तवतेने समोर येते. मात्र या तिन्ही मुख्य व्यक्तिरेखा एकत्र येऊनही काही ठोस घडत नाही, जाणवत नाही आणि तिथेच रसभंग होतो. चौकटीपलीकडच्या या व्यक्तिरेखांना हाताशी घेत जगावेगळी गोष्ट रंगवण्याची ताकद असलेला हा चित्रपट भव्यदिव्य करण्याच्या नादात त्याच त्याच बॉलीवूडी फॉम्र्युल्यात अडकून पडतो. बऊआचा मेरठमधल्या गल्ल्यांपासून नासापर्यंत प्रत्येक ठिकाणी अगदी नाक्यावरच्या गर्दीत घुसावे इतका सहजप्रवेश आणि वावर दोन्ही तर्काच्या खुंटीला टांगलेला आहे. त्यामुळे पूर्वार्धानंतर तर ही पूर्ण गोष्टच फँटसी वाटायला लागते. झीरोच्या बाबतीत प्रामुख्याने हा दोष कलाकारांना नाही तर दिग्दर्शक, लेखकालाच द्यावा लागेल. खरेतर, बुटक्याची व्यक्तिरेखा साकारण्याचे धाडस शाहरूख खानने केले आहे आणि ते आव्हान त्याने पुरेपूर पेलले आहे. बऊआची जिद्द, खुजेपणाबद्दलचा त्याचा राग, आफियावरचे उशिरा लक्षात आलेले प्रेम सगळ्या गोष्टी शाहरूख खानने त्याच्या खास शैलीत उत्तम रंगवल्या आहेत. मात्र त्याची शारीरिक मेहनत, मानसिक तयारी या सगळ्यावर पाणी फिरले आहे. एक उत्तम संकल्पना, तितक्याच चांगल्या व्यक्तिरेखा आणि ते साकारण्यासाठी तेवढेच उत्तम आघाडीचे कलाकार, निर्मितीमूल्ये, उत्तम दिग्दर्शक हे रोजच्या रोज जमून येणारे गणित नाही. शाहरूखसारखा कलाकार त्याची चौकट मोडून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न रोज रोज करत नाही, मात्र असे असूनही कथेच्या पातळीवर जेव्हा ते फसतात तेव्हा त्याचे भावनिक मूल्य प्रेक्षकांच्या लेखी चित्रपटाच्या नावाप्रमाणेच झीरो उरते. अनुष्कानेही खूप प्रामाणिकपणे आफियाची व्यक्तिरेखा रंगवली आहे. तितक्याच प्रभावीपणे कतरिनाने बबिता साकारली आहे. बबिताच्या रूपात खरे म्हणजे कतरिनाचीच कथा दिग्दर्शकाने रंगवली आहे आणि तिनेही ती त्याच सहजतेने रंगवली आहे. मात्र तिच्या व्यक्तिरेखेचा पदरही दिग्दर्शकाने मध्येच सोडून दिला आहे. अनेकदा असे प्रसंग येतात जिथे दिग्दर्शक काहीतरी वेगळे करेल, असे वाटत राहते मात्र फँ टसीच्या नादात सगळेच भरकटले आहे..
‘झीरो’
दिग्दर्शक- आनंद एल. राय
कलाकार- शाहरूख खान, अनुष्का शर्मा,
कतरिना कैफ, तिग्मांशू धुलिया, अभय देओल, आर. माधवन, झीशान अय्यूब.