पंकज भोसले

पहिल्या महायुद्धापूर्वी केवळ धडाडीच्या पुरुषांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या प्रांतात अमेरिकेत अडेला रॉजर सेंट जॉन नावाची एक ललना लॉस एंजेलिसमधील कला-संस्कृतीजगताचा धांडोळा घेत होती. चित्रपट-संगीत क्षेत्रातील तारांकितांच्या बातम्या करण्यासोबत कथा-कादंबऱ्यांच्या लेखनातही रमत होती. हॉलीवूडमध्ये चमकण्यासाठी येणाऱ्या, एका रात्रीत स्टारपदाकडे किंवा आयुष्याची राखरांगोळी करण्यास झुकणाऱ्या अनेक  व्यक्ती आणि वल्लींच्या आयुष्यावर बेतलेल्या तिच्या काही कथा गाजल्या. त्यातील एका कथेवर १९३२ साली ‘व्हॉट प्राइस हॉलीवूड’ नावाचा चित्रपट आला. हॉटेलात वेट्रेसचे काम करणाऱ्या मुलीची सर्वाधिक गाजत असलेल्या चित्रपट दिग्दर्शकाशी अपघाताने ओळख होते. मद्याच्या अतिअमलातही त्या मुलीतील अभिनयाचे असामान्य गुण हेरणारा हा दिग्दर्शक तिला थेट चित्रपटाच्या मांडवात उभी करतो. अचानक तिची अभिनय कारकीर्द जोमाने बहरू लागते, पण तिला पुढे आणणाऱ्या दिग्दर्शकाची असूया आणि स्वाभिमानाच्या गर्तेत वाताहत होते, अशी त्या चित्रपटाची मूळ कथा होती. अडेला रॉजर सेंट जॉन ही हयातभर पत्रकार म्हणून ओळखली गेली, तरी तिच्या कथाबीजाला पुढे आणखी आकर्षक रूपात मांडणाऱ्या ‘ए स्टार इज बॉर्न’ (१९३७)या चित्रपटाच्या देशोदेशी वकुबानुसार आवृत्त्या निघतच आहेत. यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या स्पर्धेत असलेला ‘ए स्टार इज बॉर्न’ आधीच्या (अधिकृत) तीन आवृत्त्यांहून आकर्षक आहे, तो कथेतील सरधोपट वळणांना टाळण्याच्या अट्टहासामुळे.

या चित्रपटामधील सर्वात गमतीशीर कुतूहल हे त्यातील प्रमुख व्यक्तिरेखांची जनमानसात रुजलेली प्रतिमा आहे. लेडी गागा ही कलावती गायिका म्हणून प्रकाशझोतात येण्यापूर्वी वास्तवात हॉटेलमधील वेट्रेसचे काम करीत होती. तऱ्हेवाईक कलाकार म्हणून आपल्या बंडखोर गाण्यांनी संगीतविश्वात दबदबा मिळविण्याआधी ब्रिटनी स्पीअर्स ते कित्येक गायिकांसाठी तिने गाणी लिहिलेली आहेत. खऱ्या आयुष्यात एका प्रसिद्धीच्या शिखराला गवसणी घातल्यानंतर तिची या चित्रपटामधील व्यक्तिरेखा आरंभी साधारण संगीतप्रमी मुलीची आहे. या मुलीने कधीकाळी संगीत क्षेत्रात पाऊल टाकण्याचा प्रयत्न असफल झाल्यामुळे तिची हौसेपुरती सूरआळवणी सुरू असलेली दाखविण्यात आली आहे.

ब्रॅडली कुपर हा चित्रसृष्टीत येण्याआधी दोन हजार सालाच्या आसपास डिस्कव्हरी चॅनलवरील लोन्ली प्लॅनेट या प्रसिद्ध कार्यक्रमामध्ये भटक भरकटेश्वराच्या भूमिकेत दिसत असे. हँगओव्हर, सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक या चित्रपटांनंतर त्याची वर्णी गेल्या दशकभरामध्ये हॉलीवूडच्या गंभीर आणि अभ्यासू अभिनेत्यांमध्ये लागली. या चित्रपटात लेखन-दिग्दर्शनासह तारांकित गायक-वादकाची भूमिका त्याने सहज रंगविली आहे.

चित्रपट सुरू होतो तो कण्ट्री संगीतात असाधारण लोकप्रियता वाटेला असणाऱ्या जॅक (कुपर) याच्या स्टेजवरील गिटार कलाबाजीने. अफाट प्रेक्षकांनी भरलेला संगीत जलसा संपल्यावर परतीच्या वाटेत मद्यछंद कुरवाळण्यासाठी तो एका कुडमुडय़ा बारमध्ये दाखल होतो. तेथे अपघाताने त्याच्या कानांना अ‍ॅली (लेडी गागा) हिच्या सुरावटींशी ओळख होते. मद्याऐवजी सूर अंमलामुळे थक्क झालेला जॅक आता अ‍ॅलीशी प्रत्यक्ष ओळख करून घेतो. एक राष्ट्रीय पातळीवरील कलाकार आपल्या गाण्याला दाद देत असल्याचे पाहून अ‍ॅलीदेखील त्याच्यासोबत गप्पा मारू लागते. त्या रात्री ती दोघे शहराची निरुद्देश भटकंती करतात.

दुसऱ्या दिवशीपासून अ‍ॅलीचे आयुष्य ३६० अंशामध्ये बदलून जाते. जॅक तिला एका लाइव्ह कन्सर्टमध्ये थेट स्टेजवर उभे करून गायला भाग पाडतो. दोघांचा स्वर एकजीव बनून गाऊ लागतो. (त्या गाण्याचा मथितार्थ हिंदूीमध्ये काढायला गेलो तर ‘तेरे मेरे मिलनकी ये रैना’ही बनू शकतो.) हौसेपुरते उरलेले अ‍ॅलीचे गाणे आता तिच्या एकटय़ाचे राहत नाही. बडय़ा रेकॉर्ड कंपनीकडून आलेला प्रस्ताव मान्य करीत ती प्रसिद्ध पॉप संगीताच्या प्रसिद्धी फेऱ्यात अडकून जाते. प्रसिद्धीच्या समान पल्ल्यामध्ये असताना दोघे लग्न करतात. मात्र अ‍ॅलीच्या वरवर जात असलेल्या कारकीर्दीची जॅकमध्ये तयार होणारी असूया दोघांसाठी घातक बनण्यास सज्ज होते.

अत्यंत चिरपरिचित असलेल्या या कथानकाची हाताळणी ब्रॅडली कुपरने दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही पातळीवर आधीच्या ‘ए स्टार इज बॉर्न’ चित्रपटांना विसरायला लावणारी इतकी वठवली आहे. अ‍ॅली-जॅक यांच्या भेटीपासून कथानकाला आफाट वेग आहे. भावुक फापटपसाऱ्याला टाळून अ‍ॅलीच्या कारकीर्दीचा विस्तार दाखविला आहे. या सगळ्यात कुठेही पत्रकारिता आणि इतर माध्यमांच्या लुडबुडीचा मागमूसही नाही, हा चित्रपटातील विशेष भाग म्हणावा लागेल. आपल्या गानकारकीर्दीतही शंभर नंबरी अभिनयाच्या खुणा सोडणाऱ्या लेडी गागाने या चित्रपटात गायिका बनण्याचा अभिनय दृष्ट लागावी इतका सुरेख वठविला आहे.

केवळ ऑस्करच्या नामांकनात आहे म्हणून नाही, तर अशा प्रकारच्या सुपरिचित भावुक संगीत नाटय़ाला ‘अभिमाना’ने पचविणाऱ्या आपल्या भारतीय मनाला हे अभावुक तरी देखणे रूपांतर कसे वाटते, ते पडताळण्यासाठी ‘ए स्टार इज बॉर्न’चे श्रवण-दर्शन आवश्यक आहे.