सत्तरी ओलांडल्यावरही अगदी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने काम करणाऱ्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे कौतुक सामान्यांना जसे आहे तसेच ते त्यांच्या बॉलीवूडमधील सहकाऱ्यांनाही आहे. अमिताभ यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येऊन गेले तरीही आज बॉलीवूडमध्ये सगळ्यात व्यग्र कलाकार असाच त्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो. अमिताभच्या आयुष्याची चित्तरकथा मोठय़ा पडद्यावर उतरली तर ती निश्चितच प्रेरणादायी असेल, असे सगळ्यांना वाटते आहे. मात्र, खुद्द अमिताभ यांना ही कल्पना फारशी पसंत नाही. माझ्या आयुष्यावर कोणी चित्रपट केलाच तर तो नक्की फ्लॉप ठरेल. त्यामुळे माझ्या आयुष्यावर कोणताही चित्रपट बनणार नाही, असे अमिताभ यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्पष्ट केले.
बॉलीवूडमध्ये सध्या चरित्रपटांची लाट आली आहे. त्यातही गुरुदत्तसारख्या दिग्दर्शकापासून ते भगवान दादांपर्यंत हिंदी चित्रपटातील दिग्गजांवर चित्रपट बनत आहेत. पण या चरित्रपटांच्या प्रवाहात आपण सहभागी होणार नाही, असे अमिताभ यांनी स्पष्ट केले. माझ्यावर चित्रपट बनवणे ही कल्पनाच वाईट आहे आणि जर कोणी तो बनवलाच तर तो नक्की आपटणार, असे सांगणाऱ्या अमिताभ यांनी त्यांच्या वडिलांवर हरिवंशराय बच्चन यांच्यावर कोणी चित्रपट बनवणार असेल तर आपली तयारी असल्याचे सांगितले.
माझ्या वडिलांवर कोणी अनुबोधपट करणार असेल तर माझी तयारी आहे. पण मी त्यांच्यावर चित्रपट करू शकणार नाही, असे अमिताभ यांनी सांगितले. अमिताभ यांच्यानंतर बॉलीवूडमध्ये त्याच ताकदीच्या अभिनयाचा वारसा कोण पुढे नेणार? या प्रश्नावरही त्यांनी आपण क ोण्या एका कलाकाराचा विचार क रू शकत नाही, असे सांगितले. आजचे सगळेच कलाकार खूप मेहनती आहेत. प्रत्येकाची स्वत:ची अशी कामाची वेगळी पद्धत आहे, शैली आहे. हे वैविध्य कायम असले पाहिजे. मी जेव्हा कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा दिलीपकुमार, वहिदा रेहमान यांच्यासारखी मंडळी माझे प्रेरणास्थान होते. आजचे तरुण कलाकार सलमान, आमिर, शाहरूख, हृतिक रोशन यांच्याकडून प्रेरणा घेतात, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader