‘रामलीला’ चित्रपट प्रदर्शित व्हायच्या तयारीत असतानाच निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या मनात ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाची कल्पना रुंजी घालत होती. त्याला कारण बऱ्याच अंशी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी होती. भन्साळींनी पहिल्यांदा या चित्रपटाची घोषणा के ली तेव्हा त्यांच्या मनात ठरलेली जोडी सलमान खान आणि करिना कपूर प्रत्यक्षात उतरली नाही. त्यामुळे पडद्यावर ‘बाजीराव-मस्तानी’ कोण? या प्रश्नाचा शोध घेण्यातच कित्येक र्वष गेली. आज ‘बाजीराव-मस्तानी’ हा चित्रपट प्रदर्शित होत असताना मुळातच या चित्रपटासाठीची कलाकारांची योग्य निवड आपण करू शकलो आणि अर्धी लढाई या कलाकारांनी जिंकून दिली आहे, असे भन्साळी आग्रहाने नमूद करतात.
जुहूतील त्यांच्या निवासस्थानी शांतपणे ‘बाजीराव-मस्तानी’च्या प्रदर्शनाचा एकेक टप्पा हळूहळू पार पाडण्यात मग्न असलेल्या भन्साळींनी आत्ताचा हा काळ आपल्यासाठी खूप आनंदाचा असल्याचे सांगितले. इतक्या दिवसांपूर्वी पाहिलेल्या या भव्य-दिव्य चित्रपटाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे या कल्पनेनेच मुळी मन भरून येते, असे ते म्हणतात. या चित्रपटाभोवती वादांचा जो पिंगा सुरू आहे तो त्यांच्याभोवती फिरतो आहे. पण त्यात अडकून न पडता आपली कलाकृती रसिकांनी पहिल्यांदा पहावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे. कर्तृत्ववान योद्धा असलेला पेशवा बाजीराव याने आपल्याला कित्येक वर्षांपासून भुरळ घातली आहे. प्रेमकथा हा माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे बाजीरावाबद्दल समजून घेतानाही त्याची वीरश्री जितकी प्रेमात पाडणारी आहे, तितकेच त्याचे आणि मस्तानीचे जुळलेले सूर, दोन भिन्न संस्कृतीतून आलेल्या या दोघांमध्ये जुळलेले भावबंध हा एक या कथेचा पैलू आहे. तर दुसरीकडे बाजीरावाची पहिली पत्नी काशीबाई म्हणजे कुणी साधीसुधी स्त्री नाही. तिचे आणि बाजीरावाचे नातेही तितकेच घट्ट असताना मस्तानीच्या येण्यानंतर काशीबाईच्या मनातील हल्लकल्लोळ हे माझे आवडीचे, अभ्यासाचे विषय आहेत, असे भन्साळींनी सांगितले.
‘बाजीराव-मस्तानी’ हा चित्रपट भव्य पटलावरच घडवायचा होता. पेशवाईच्या इतिहासातील दिमाख, त्यांचे राजवाडे, त्यांचा आब, योद्धा म्हणून त्यांच्या लढाया या सगळ्या गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून उतरवणे हे माझ्यासाठी खचित सोपे नव्हते. मुळात, मी लहानपणापासून मराठी संस्कृतीत वाढलो आहे. मराठी जेवण, मराठी साहित्य, मराठी वेशभूषा, मराठी सण-संस्कृती मला खूप आवडतात एवढय़ापुरते हे मर्यादित नाही तर या संस्कृतीचा माझ्या जीवनशैलीवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे, चित्रपट करताना त्या सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने अभ्यास करणे हे मला स्वत:लाही तितकेच महत्त्वाचे होते, असे सांगणाऱ्या भन्साळींनी कलाकारांची निवड हे त्यांच्यापुढचे मोठे आव्हान होते, असे सांगितले.
चित्रपटात पेशवाईतील वाडे, महाल यांच्या खुणा दिसत नाहीत, अशीही टीका त्यांच्यावर होते आहे. मी या प्रेमकथेने भारावून जाऊन हा चित्रपट केला असला तरी प्रमाणभूत इतिहासाचा आधार चित्रपटासाठी घ्यावाच लागतो. माझे तीनही कलादिग्दर्शक हे मराठी आहेत. या तिघांनी पेशवेकालीन इतिहासाचा अभ्यास करून सेट तयार केले आहेत. वेशभूषेच्या बाबतीत पठण्या आणि अन्य साडय़ांसाठी संपूर्ण पुणे शहर आम्ही पिंजून काढले आहे, असे ते म्हणतात. या चित्रपटाच्या निमित्ताने आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच भन्साळींनी युद्धावरची दृश्ये चित्रित केली आहेत. या दृश्यांनी आपली परीक्षा घेतल्याचे त्यांनी सांगितले. जयपूरमध्ये ही युद्धाची सगळी दृश्ये चित्रित करण्यात आली असल्याची माहिती भन्साळींनी दिली.
हा चित्रपट आपण बाजीरावावरच्या प्रेमातूनच केला आहे. मराठी संस्कतीवर माझे जे प्रेम आहे तसे अन्य कुणाचेही नसेल.. त्यामुळे या चित्रपटात संस्कृ तीला धक्का लागेल असे वावगे काही के लेले नाही, असे ते म्हणतात. चित्रपटावर टीका होऊ शकते. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला मान्य असेलच असे नाही. पण तरीही चित्रपट पाहिल्यावर टीका करणाऱ्यांनाही तो नक्की आवडेल, असा विश्वास भन्साळींना वाटतो आहे. त्यांचा हा विश्वास आणि दिग्दर्शक म्हणून त्यांचे कसब किती खरे याचे उत्तर पुढच्या महिन्यात ‘बाजीराव मस्तानी’ प्रदर्शित होईल तेव्हाच मिळेल..
बाजीराव मस्तानी घडवताना..
‘बाजीराव-मस्तानी’ हा चित्रपट भव्य पटलावरच घडवायचा होता.
Written by मंदार गुरव
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-11-2015 at 01:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on bajirao mastani