भक्ती परब

आपल्याला हवी ती वाहिनी निवडा, भारतभर वाहिन्यांची किंमत एक समान.. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्रायच्या) नव्या नियमामुळे पहिल्यांदाच सशुल्क वाहिन्या आणि नि:शुल्क वाहिन्या असा भेद प्रेक्षकांच्या लक्षात आला. आपण याआधी सरसकट पॅकेज घेत होतो. त्यामुळे एका वाहिनीचे किती रुपये मोजतोय, हे आपल्या गावीही नव्हते. परंतु आता सगळं नितळ तळ्यासारखं लख्ख झालंय. भारतीय दूरचित्रवाणीवर ३०० ते ३३०च्या आसपासच सशुल्क वाहिन्या आहेत. यातल्या आपण दिवसभरात तीन ते चार वाहिन्याच बघतो. त्यामुळे वाहिन्यांची निवड केल्यावर काही अनावश्यक वाहिन्या मागे पडणार आहेत.

प्रेक्षकांनी मोजक्याच वाहिन्या निवडल्यामुळे त्यांनी ज्या वाहिन्या निवडल्या असतील त्यांच्याकडून आशयाच्या अपेक्षाही वाढणार. त्यामुळे अनेक हिंदी आणि प्रादेशिक मनोरंजन वाहिन्यांनी नवे कार्यक्रम नव्या वेळेत आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात शनिवार- रविवार किंवा शुक्रवार- शनिवार अशा दोन दिवसांत आठ ते दहा या वेळात कार्यक्रमांची रेलचेल सध्या पाहायला मिळते आहे.

हिंदी मनोरंजन क्षेत्रात धोका पत्करून नवे प्रयोग करणाऱ्या कलर्स वाहिनीच्या ‘कोर्टरुम: सच्चाई हाजिर हो’, ‘किचन चॅम्पियन’ आणि ‘नागिन’ मालिकेचे तिसरे पर्व या कार्यक्रमांमुळे या वाहिनीचा विविध वेळेच्या बाबतीत मनोरंजनात पाया पक्का झालेला आहे. ‘नागिन’ मालिकेच्या पहिल्या पर्वापासून शनिवार- रविवारची जास्तीत जास्त प्रेक्षकसंख्या मिळवण्यात ही वाहिनी यशस्वी झाली. त्यामुळे पुढचं पाऊल म्हणून ‘किचन चॅम्पियन’ हा कार्यक्रमही १.३० वाजता दुपारच्या वेळात आणण्याचा निर्णय वाहिनीने घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अर्जुन बिजलानी करणार असून सध्या दुपारच्या कार्यक्रमांमध्ये या वाहिनीला इतर कोणी प्रतिस्पर्धी नसल्यामुळे हा कार्यक्रम किती यशस्वी ठरतो याची उत्सुकता आहे.

‘स्टार प्लस’ वाहिनीनेही ‘दिव्य दृष्टी’ नावाचा कार्यक्रम वीकेंडसाठी आणला आहे. ही दोन बहिणींची गोष्ट आहे, त्यातील एकीकडे दिव्य-दृष्टी असते. एकता कपूरची बहुचर्चित मालिका ‘डायन’ अ‍ॅण्ड टीव्ही वाहिनीवर शनिवार-रविवारच दाखवली जातेय. या वाहिनीनेसुद्धा कलर्स वाहिनीच्या पावलावर पाऊल टाकत वीकेंड शोजकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळेच ‘शादी के सियाप्पे’ नावाची विनोदी मालिका या वाहिनीच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ‘भाभीजी घर पे है..’ या विनोदी मालिकेमुळे ही वाहिनी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. एखादी विनोदी मालिका वाहिनीचा चेहरा बनते हे दूरचित्रवाणीच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं होतं. त्यामुळे या मालिकेच्या निर्मात्यांनी याच मालिकेतील हप्पूसिंग ही विनोदी भ्रष्ट पोलीस व्यक्तिरेखा नव्याने उलगडताना ‘हप्पू की उलटन पलटन’ नावाची ‘स्पिन ऑफ’ मालिका मार्चमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्पिन ऑफ’ म्हणजे एखादी व्यक्तिरेखा किंवा त्या मालिकेच्या विषयानुसार ती लोकप्रिय झाली की त्याच आधारे तिची प्रतिकृती वाटेल अशी दुसरी मालिका आणणे, असे प्रयत्न हिंदी मनोरंजन वाहिन्यांवर गेल्या दोन वर्षांत वारंवार पाहायला मिळत आहेत.

सोनी टीव्ही वाहिनीने ‘कपिल शर्मा शो’, ‘सुपर डान्सर्स ३’ हे दोन कार्यक्रम शनिवार-रविवार ठेवून प्रभावी प्रेक्षकसंख्या मिळवली आहे. ‘कपिल शर्मा शो’मुळे या वाहिनीकडे त्यांचा हक्काचा प्रेक्षकवर्ग परतला आहे. ‘सोनी सब’ या विनोदी मालिकांच्या वाहिनीवर ‘माय नेम इज लखन’ आणि ‘बँड बाजा अँड बंद दरवाजा’ या दोन मालिका दोन दिवसीय मनोरंजनात आपले नशीब आजमावत आहेत.

सोनी मराठीवर ‘गर्जा महाराष्ट्र’ हा कार्यक्रम माहितीपूर्ण होता, परंतु तो नुकताच बंद झाला. या कार्यक्रमाच्या बाबतीत वाहिनीने ‘एपिक’ वाहिनीसारखं धोरण अवलंबलं. त्यामुळे ही मालिका म्हणावी तशी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही. ‘एपिक’ वाहिनीवर काही मोजकेच पण चांगले कार्यक्रम असूनही प्रसिद्धी न केल्यामुळे दुर्लक्षिले जातात. तसेच काहीसे ‘गर्जा महाराष्ट्र’च्या बाबतीत घडले. या वाहिनीने इतर कार्यक्रमांबरोबर या कार्यक्रमाकडेही विशेष लक्ष द्यायला हवे होते. परंतु ‘हम बने तुम बने’ या दैनंदिन मालिकेच्या माध्यमातून या वाहिनीची वेगळी ओळख प्रेक्षकांमध्ये होतेय. विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारी, प्रभावीपणे मांडणारी ही मालिका आवर्जून पाहणारा एक प्रेक्षकवर्ग तयार होतो आहे. त्यामुळे वाहिनीने याकडे लक्ष देण्याचीही आवश्यकता आहे. येत्या सोमवारी चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा याबद्दलचा भाग या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.

वीकेंडला बऱ्याचदा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक पसंती देतात. अशा प्रेक्षकांना ‘स्टार मूव्हीज’ वाहिनीवर ऑस्कर चित्रपटांची पर्वणी अनुभवता येणार आहे. २५ फेब्रुवारीला ९१व्या ऑस्कर सोहळ्याचे प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ऑस्कर नामांकन मिळालेले चित्रपटही या वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत. गेली २० वर्ष सातत्याने या वाहिनीवर ऑस्कर सोहळा दाखवण्यात येतो. त्यामुळे ही वाहिनीची एक वेगळी ओळख बनली आहे. त्यामुळेच त्यांनी ‘हॅपी ऑस्कर टू यू’ असा प्रोमो बनवून हा वेगळेपणा अधोरेखित केला आहे.

मराठी वाहिन्यांमध्ये ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नवे कार्यक्रम आणण्यासाठी पुढाकार घेतला असून तीन कार्यक्रमांचे प्रोमो सध्या लक्ष्यवेधी ठरत आहेत. ‘भीमराव एक-गौरवगाथा’, ‘साथ दे तू मला’ तसेच ‘एक टप्पा आऊट’ नावाचा विनोदी कार्यक्रम वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. ‘भीमराव एक गौरवगाथा’ मालिकेच्या प्रोमोमुळे या मालिकेत कोण कोण कलाकार असणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दशमी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेची ही मालिका असल्यामुळे अपेक्षाही वाढल्यात. एकूणच दैनंदिन मालिकांच्या पल्याडचं विश्व विस्तारत आहे. प्रेक्षकांनाही तेच हवंय.. अर्थात निवड त्यांचीच असणार आहे. बघू या कुठली वाहिनी यात बाजी मारते..

Story img Loader