रवींद्र पाथरे
रामायण-महाभारत ही महाकाव्यं मुळात कशी होती, हा संशोधनाचा विषय आहे. कारण कालौघात त्यांत अनेक बदल होत गेले. प्रदेशविशिष्ट लोकधारणा, जनमानस, तसंच ज्यांनी ज्यांनी या काव्यांचं पुनर्लेखन केलं त्यांनी त्यात घातलेली अधिकची वा वेगळी भर या सगळ्यातून त्यांची वेगवेगळी संस्करणे घडत गेली. या वाङ्मयकृतींच्या गाभ्यात तत्कालीन स्थानीय लोकसंस्कृती, भौगोलिकता, तसंच लोकाराधनेच्या अनुसरणातून हे बदल होत गेले. त्यामुळे आज या महाकाव्यांच्या विविध ‘आवृत्त्या’ पाहायला मिळतात. त्यापैकी कुठलं संस्करण मूळ वा प्रमाण मानायचं आणि अनुसरायचं, हा प्रश्न ज्याचा त्याच्यावर अवलंबून आहे. मुळात रामायण आणि महाभारत खरोखरीच प्रत्यक्षात घडलं का, की तो प्राचीन सर्जनशील लेखकांच्या उत्तुंग प्रतिभेचा निव्वळ एक आविष्कार आहे? असे प्रश्न विचारीजनांना आजवर पडत आलेले आहेत.. यापुढेही पडत राहतील. याचं कारण त्यांतलं विलक्षण अद्भुत आणि थक्क करणारं मानवी विश्व! विशेषत: महाभारतात मानवी जगण्याचे, त्यांतील नैतिक-अनैतिक पेचांचे अगणित पैलू दृष्टीस पडतात. बृहद्कथेचं हे अविश्वसनीय वाटावं असं रूप भारतीय लोकमानसाला नेहमीच भुरळ घालत आलेलं आहे. या महाकाव्यांची, त्यातल्या व्यक्ती आणि त्यांच्या वर्तन-व्यवहारांची शास्त्रकाटय़ाधारे वेळोवेळी चिकित्साही केली गेलेली आहे. डॉ. इरावती कर्वे यांच्यासारख्या विदुषींनी केलेली महाभारतकालीन घटना व व्यक्तिमत्त्वांची चिकित्सा विचारप्रवृत्त करणारीच आहे. साहित्य, नाटय़, चित्रपट, चित्र-शिल्पकला आदी माध्यमांतून या प्राचीन महाकाव्यांवर भाष्य करण्यात अनेकांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. स्त्रीवादी दृष्टिकोनातून आणि प्रागतिक विचारधारेतून या कलाकृतींची चिरफाड करत सर्वस्वी वेगळे दृष्टिकोनही आजवर अनेक मांडले गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर नाटककार मामा वरेरकर यांनी ‘भूमिकन्या सीता’ या नाटकाद्वारे रामायणातील सीता, ऊर्मिला आणि शंबूकावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. वरेरकर हे तसे काळाच्या पुढचे नाटककार. त्यांच्या नाटकांचे ‘हटके’ विषयच याची साक्ष देतात. ‘रामराज्य’ ही संकल्पना प्रत्यक्ष रामायण काळातही कशी अलक्षित होती याकडे त्यांनी ‘भूमिकन्या सीता’तून निर्देश केला आहे. रामाने सीतेचा काहीही दोष नसताना केवळ लोकांतील कुजबुजीवरून तिचा त्याग करणं (तेही तिला त्याबद्दल जराही पूर्वकल्पना न देता!), तसंच लक्ष्मणाने पत्नी ऊर्मिलेच्या भावनांचा कसलाही विचार न करता रामासोबत वनवासाला जाणं, पददलित शंबूकाने ज्ञानप्राप्तीची आस धरल्याने ऋषीमुनींच्या हट्टाग्रहास्तव त्याला ज्ञानप्राप्तीस मनाई करणं.. या गोष्टी आदर्श ‘रामराज्या’च्या नेमक्या कुठल्या संकल्पनेत बसतात? असा सवाल मामा वरेरकर उपस्थित करतात. या प्रश्नांची सयुक्तिक उत्तरं सापडत नाहीत.
लंकाविजयानंतर लक्ष्मण आणि सीतेसह राम अयोध्येस परततो. राज्यकारभाराची धुरा स्वीकारतो. परंतु सीतेला मात्र आपण वनवासात होतो तेच बरं होतं असं वाटू लागतं. कारण राम आता राजा झाल्यानं तिच्या वाटय़ाला येईनासा होतो. आपली वंचना होते आहे याची तीव्र जाणीव तिला होते. वनवासातलं मुक्त, निर्भर जगणं हेच खरं जीवन होतं असं तिला वाटू लागतं. अशात लक्ष्मणपत्नी ऊर्मिला आपलं पतीविरहाचं भळभळतं दु:ख तिच्यापाशी व्यक्त करते. आपल्याला विश्वासात न घेता, आपल्या भावनांचा जराही विचार न करता लक्ष्मणानं रामासोबत वनवासात जायचा निर्णय घेतला; इतकंच नाही तर परतल्यावरदेखील तो पतीकर्तव्य पार न पाडता रामाप्रतीच आपलं सर्वस्व वाहतो आहे.. ही शिक्षा मला का, हा ऊर्मिलेचा प्रश्न आहे. याचं उत्तर सीतेकडं नसतं.
तीच गोष्ट शंबूकाची. तो निम्न जातीत जन्माला आला हा काय त्याचा दोष? ऋषीमुनींप्रमाणे तपाचरण करून ज्ञान प्राप्त करण्याचा त्याला लागलेला ध्यास गैर कसा? शंबूकाच्या या प्रश्नालासुद्धा सीतेपाशी उत्तर नसतं. ती रामाकडे शंबूकाची बाजू मांडते. परंतु राम ‘लोकाराधनेपुढे मला सगळं गौण आहे,’ असं कठोर उत्तर तिला देतो. ‘मग रामराज्य या संकल्पनेला काय अर्थ उरतो?’ या तिच्या प्रश्नाचं उत्तर मात्र रामाला देता येत नाही. ऊर्मिलेची व्यथाही सीता रामाकडे मांडते. परंतु लक्ष्मणाला पतीकर्तव्याची जाणीव करून देणंही रामाला जमत नाही.
आणि या सगळ्याचा कळस म्हणजे लोकनिंदेचा डाग राजा म्हणून आपल्या माथी लागू नये याकरता तो आपल्या पत्नीचा.. सीतेचाही त्याग करतो. तेही ती निर्दोष आहे हे अग्निदिव्यातून पूर्वी सिद्ध झालेलं असतानासुद्धा!
नाटककार मामा वरेरकरांनी ‘भूमिकन्या सीता’मध्ये ‘रामराज्य’ या संकल्पनेपुढे, त्यातल्या कथित आदर्शापुढे उभं केलेलं हे प्रश्नचिन्ह अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं आहे. मर्यादापुरुषोत्तम म्हणून मिरवल्या जाणाऱ्या रामाच्या या वर्तन-व्यवहारांतील विसंगतीकडे नाटककार मामा वरेरकरांनी याद्वारे लक्ष वेधलं आहे. रामायणात असे अनेक प्रश्नचिन्हांकित घटना-प्रसंग आहेत; ज्यांची पटण्याजोगी, तार्किक उत्तरं मिळत नाहीत. वरेरकरांचं सत्तरेक वर्षांपूर्वीच हे नाटक. आविष्कार संस्थेनं धि गोवा हिंदु असोसिएशन कला विभागाच्या सहयोगानं हे नाटक मंचित केलं आहे. त्याची संपादित रंगावृत्ती आणि दिग्दर्शन केलं आहे विश्वास सोहोनी यांनी. मुख्य मुद्दय़ाकडेच नाटक थेट कसं येईल, यावर त्यांचा रंगावृत्ती करताना कटाक्ष असल्याचं जाणवतं. परिणामी अनावश्यक फाफटपसारा टळला आहे. आजच्या घडीलाही हे नाटक कालसुसंगत वाटतं ते त्यामुळेच. स्त्रीवादी नाटकाची बीजं ‘भूमिकन्या सीता’मध्ये आहेत. ती मामांनी हेतुत: पेरलीत की कसं, हे निश्चित सांगता येत नसलं तरी त्यांचा प्रागतिक दृष्टिकोन त्यातून प्रतीत होतो.
दिग्दर्शक विश्वास सोहोनी यांनी सफाईदार प्रयोग बसवला आहे. पात्रांचं ठसठशीत व्यक्तिचित्रण, प्रसंगांतील टोकदार नाटय़पूर्णता, कलाकारांची चोख कामं यामुळे प्रयोग प्रेक्षकांची पकड घेतो आणि विचारप्रवृत्तही करतो. रवी-रसिक यांनी नेपथ्य व प्रकाशयोजनेतून नाटकातल्या वैचारिकतेकडेच प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित राहील हे पाहिलं आहे. मयुरेश माडगावकरांनी पार्श्वसंगीतातून भावानुभूतीची लय पकडली आहे. सुहिता थत्ते यांची वेशभूषा आणि शरद विचारे-दत्ता भाटकर यांची रंगभूषा नाटकाची मागणी पुरवणारी आहे.
मानसी कुलकर्णी यांनी सीतेची भावविकलता तसंच तिला पडलेले तार्किक प्रश्न यांना एक ठाशीव उद्गार दिला आहे. रामाप्रतीची तिची उत्कट निष्ठा, त्याच्याकडून आपल्या भावनांची बूज राखली न गेल्यानं आलेली निराशा, वैफल्य आणि अखेरीस भूमीच्या कुशीत ठाव घेणं- यांतून सीतेचं जगण्याशी.. मातीशी असलेलं घट्ट नातं व्यक्त करण्यात त्या सफल झाल्या आहेत. ऊर्मिलाच्या शोकसंतप्ततेचा उद्रेक श्रुती पाटील यांनी जोरकसपणे व्यक्त केला आहे. केवळ खालच्या वर्गात जन्म झाल्याने ज्ञानापासून आपल्याला वंचित ठेवण्यासाठी ऋषीमुनींनी केलेल्या कारवायांबद्दलची खंत आणि रोष शंबूक झालेल्या सुबोध विद्वांस यांनी संयततेनं दर्शविला आहे. राजकर्तव्यांत बंदिवान झालेला राम- पुष्कर सराड यांनी साकारला आहे. या कर्तव्यकठोरतेपायी सीतेवर आपण घोर अन्याय करत असल्याची बोच त्यांच्या देहबोलीत जाणवती तर या भूमिकेला वेगळी छटा मिळू शकली असती. लक्ष्मणच्या भूमिकेतील मिहिर पुरंदरे यांना संहितेतच पाठबळ नव्हतं. मिलिंद जागुष्टे यांनी वृद्ध सुमंत वास्तवदर्शी केला आहे.
‘रामराज्य’ संकल्पनेसमोर प्रश्न लावणारं, त्यातली वैय्यर्थता स्पष्ट करणारं ‘भूमिकन्या सीता’ हे नाटक त्यातील वैचारिकतेकरता नक्की पाहायला हवं.