भक्ती परब
‘राजी’, ‘उरी – द सíजकल स्ट्राइक’ आणि त्याआधी ‘बेबी’, ‘हॉलिडे’, ‘डी डे’, ‘एअरलिफ्ट’सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांमध्ये एक वेगळी वातावरणनिर्मिती झाली. कधीकाळी केवळ वास्तव घटनांवरच्या युद्धपटांपुरती चित्रपटनिर्मिती होत होती. मात्र काळानुसार देशभक्तीच्या संकल्पना, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेल्याने त्याचे प्रतिबिंब चित्रपटातही उमटले..
भारतात चित्रपट कलेला सुरुवात झाली तेव्हा इंग्रजाचं राज्य होतं. १८५७ पासूनच्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास ताजा होता. स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी विविध मार्गानी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले, स्वातंत्र्य मिळाले. ही घटनाच इतकी शक्तिशाली होती की, ती आजही अनेक चित्रपटकर्मीना प्रेरणा देते. के. सुब्रमण्यम यांचा हिट ठरलेला ‘त्यागभूमी’, बी.व्ही. रेड्डी यांचा ‘वंदे मातरम’ चित्रपट, त्यानंतर १८५७ ची क्रांतिगाथा मांडणारा १९७७ मधील सत्यजित रे यांचा ‘शतरंज के खिलाडी’ अशा चित्रपटांनी देशभक्तीपर चित्रपटांचा वैभवशाली पाया घातला.
१९३२ नंतर चित्रपटकर्मीनी समाजजीवनाचे विविध पैलू चित्रपटातून मांडायला सुरुवात केली होती. त्यामुळे पौराणिक, ऐतिहासिक, युद्धविषयक अशा चित्रपटांतून राष्ट्रप्रेम, त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती, सामाजिक जडणघडण दिसून येते. याविषयी चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर म्हणाले, सुरुवातीला पौराणिक आणि नंतर ऐतिहासिक चित्रपट आले, कारण त्या वेळी चित्रपटासाठी स्वतंत्र कथेची निर्मिती होत नव्हती. मराठी चित्रपटांच्या बाबतीत शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे चित्रपट आले. अशा चित्रपटांतून देशभक्ती जागी करणे हाच उद्देश होता. राणी लक्ष्मीबाई यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरील चित्रपट, इंग्रजांविरुद्ध दिलेल्या लढय़ावरील ‘शहीद’सारखा चित्रपट; परंतु यामध्ये महात्मा गांधी, नेहरू, नेताजी, भगत सिंग, लोकमान्य टिळक अशा स्वातंत्र्यसैनिकांचे चरित्रपटही प्रामुख्याने आहेत. देशभक्तीपर चित्रपटांमध्ये युद्धपटांचेही वेगळे स्थान आहे. चेतन आनंद यांच्या ‘हकीकत’ या चित्रपटानंतर देशभक्तीपर चित्रपटांची एक लाट त्या वेळी आली होती, कारण तेव्हा पाकिस्तानचा पराभव झाला होता आणि स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली होती. त्यामुळे ‘हिंदुस्तान की कसम’, ‘अमर जवान’ यांसारखे चित्रपट आले.
जे.पी. दत्तांच्या ‘बॉर्डर’मध्ये १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पाहायला मिळाले. हा चित्रपट भारतीय युद्धपटात महत्त्वाचा मानला जातो. कारण याच चित्रपटापासून देशभक्तीपर चित्रपटांबद्दलचा दृष्टिकोन बदलत गेला, तो अधिकाधिक वास्तववादी चित्रणाकडे वळला. अशा युद्धपटांमध्येही दोन भाग होते, प्रत्यक्ष युद्ध दाखवणं आणि युद्धाच्या पाश्र्वभूमीवर प्रेमकथेपासून इतर कथांची मांडणी करणं.. चेतन आनंद आणि जे.पी. दत्ता यांच्या चित्रपटांनी देशभक्तीपर चित्रपटांना वेगळा आयाम दिला. तरीही वास्तववादी युद्धपटाचं चित्रण अजूनही प्रभावीपणे आपल्या चित्रपटांमध्ये झालं नाही, यामागे बजेट हे कारण असू शकतं; पण जवळपास सगळ्याच देशभक्तीपर चित्रपटांनी चांगली कमाई केली असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली.
१९५० ते १९६० या काळात स्वतंत्र भारतातील बदल, फाळणीची भळभळती जखम, भारत-पाकिस्तान संघर्ष या गोष्टी प्रामुख्याने चित्रपटांमधून मांडल्या गेल्या. या दोन्ही देशांत युद्धे होतील, पण शांतीही नांदली पाहिजे. दोन्ही देशांतील मानवजातीचे यात नुकसान होऊ नये, अशा आशयाचेही चित्रपट आले. अलीकडे आलेल्या ‘राजी’ चित्रपटामध्येही तोच विचार पाहायला मिळाला. युद्धपट आणि ते साकारणारे जे. पी. दत्ता, राकेश मेहरांसारखे दिग्दर्शक किंवा अगदी मनोज कुमार यांच्यापासून आमिर खान, अक्षय कुमार ते विकी कौशलसारखे देशभक्तीपर चित्रपटांतून काम केलेले कलाकार यांच्याबद्दल प्रेक्षकांच्या मनातही एक वेगळे स्थान राहिले आहे. अभिनेता अक्षय कुमार म्हणतो, काही चित्रपट असे असतात जे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात; पण चित्रपट निवडताना देशभक्तीपर चित्रपटच करेन, असा विचार कलाकार करत नाहीत. सुदैवाने माझी देहबोली पाहून निर्माते-दिग्दर्शकांना या चित्रपटांसाठी मी योग्य वाटलो आणि मला देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. वैयक्तिकरीत्या मला अशा चित्रपटांची ओढ आहे; पण तशा पद्धतीने ते मिळायलाही हवेत.
‘रंग दे बसंती’, ‘द गाझी अटॅक’, ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाँसी’ आणि आता ‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’मध्ये भूमिका साकारणारे अभिनेते अतुल कुलकर्णी याविषयी सांगतात, ‘‘देशभक्तीपर चित्रपटात काम करताना वेगळं काही करतोय अशी भावना नसते. आपल्या आजूबाजूला राजकीय, सामाजिक घडामोडी घडत असतात. अशा घटना चित्रपट माध्यमातूनही सुटत नाहीत. त्या त्या काळात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, लेखकांना निर्मितीसाठी खुणावत असतं. त्यानुसार ते चित्रपटात आकार घेतं. देशभक्तीपर चित्रपट असा वेगळा उल्लेख केला जावा अशी आवश्यकता नाही. ‘रंग दे बसंती’ किंवा त्यासारखे देशभक्तीपर चित्रपट आले. त्या वेळी तेव्हा असणाऱ्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केला. एवढंच त्याविषयी म्हणता येईल.’’
तर ‘उरी’ चित्रपटात तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांच्या मते, भारत-पाकिस्तान युद्धावरील चित्रपट वेळोवेळी तयार झाले. ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटही नुकत्याच घडलेल्या घटनेवर आधारित होता. सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी नेमकं काय घडलं? हा प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न होता. ते कसं झालं? हा शोध काही नाटय़ात्मक दृश्यांची जोड देऊन साकारला गेला. ‘हकीकत’सारखे जुने चित्रपट पाहिले तर देशप्रेमातही एक दु:खाची किनार होती. देशभक्तीपर चित्रपटांशी प्रेक्षक पटकन जोडला जातो, समरस होतो. यामध्ये विजय आणि शत्रूला शेवटपर्यंत दिलेली झुंज, मग त्यात हार झाली असेल तरी ते प्रेक्षकांना भावतं. कारण निकराने झुंज देणं हेही प्रेक्षकांना स्फूर्ती देतं. ‘परमाणु’, ‘गाझी अटॅक’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या सैन्याच्या विजयाच्या गाथा मांडल्या गेल्या, तर ‘बेबी’सारख्या चित्रपटांतून आपल्या सैन्याची बुद्धिमत्ता, कौशल्य आणि धाडस अधोरेखित केलं गेलं. देशभक्तीपर चित्रपट येणे ही त्या त्या काळाची गरज असते.
‘फर्जंद’ हा प्रभावी युद्धपट करणारे दिग्पाल लांजेकर म्हणाले, देशभक्तीपर चित्रपटांतून प्रेरणा मिळावी हा हेतू असावा. युद्धाच्या कथा सगळ्यांच ऐकायला आवडतात, पण यापलीकडेही इतिहास असतो. देशभक्तीपर चित्रपट करताना आजच्या काळाचा विचार केला तर त्या ऐतिहासिक घटनेचे परिणाम काय झाले, आताच्या पिढीने त्यातून काय शिकलं पाहिजे, अशी त्याची मांडणी असायला हवी. देशभक्तीपर चित्रपट करताना संशोधन आणि त्यासाठी लागणारा वेळ हे अतिशय महत्त्वाचे आहे. इतिहासाशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा होता कामा नये. मराठीमध्ये युद्धपट कमी निर्माण होतात, यामागे त्यासाठी लागणारा वेळ, संशोधन, निर्मिती खर्च या गोष्टी कारणीभूत ठरतात, तर दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या मते असे चित्रपट प्रेक्षक सहजासहजी विसरत नाहीत. ते मनात पक्के बसतात. त्यातून लोकांची आपापसात चर्चा होते आणि त्यातून ते जे शिकतात ते प्रत्यक्ष आयुष्यातही आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांचं मत बनवण्यासाठी चित्रपट त्यांना प्रेरणा देतात, परंतु असे चित्रपट करताना तपशिलांवर लक्ष द्यावं लागतं.
‘दिल से’, ‘मिशन कश्मीर’ या चित्रपटांनी देशांतर्गत दहशतवाद दाखवला, तर ‘स्वदेस’ने परदेशी गेलेल्यांना मायदेशाची ओढ लावली. ‘लगे रहो मुन्नाभाई’सारख्या चित्रपटांनी आपण प्रामाणिकपणे वागून देशसेवा करू शकतो, हा विश्वास दिला. ‘चक दे इंडिया’, ‘गोल्ड’सारख्या चित्रपटांनी खेळातून देशप्रेमाची भावना जागी केली. तर ‘बजरंगी भाईजान’मधून सीमावादापेक्षा मानवता महत्त्वाची यावर भर दिला. ‘उरी’ चित्रपटातून आलेला, ‘ये नया हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी..’ हा विचार प्रेक्षकांमध्ये जोर धरतो आहे. येत्या काळात अशा चित्रपटांचे आणखी बदलत जाणारे स्वरूप आणि प्रेक्षकांवर होणारे परिणाम हे नाते अधिकाधिक बळकट होताना दिसेल यात शंका नाही.
प्रत्येक देशवासीयाला आपल्या देशाबद्दल प्रेमाची भावना असते. ती भावना चित्रपटकर्मीनाही आतून साद घालते तेव्हाच चित्रपट साकार होतो. देशभक्तीपर चित्रपट बनवण्याची ही प्रक्रिया ठरवून होत नाही, मात्र असे चित्रपट करताना भावनेच्या भरात निर्णय घेऊन चालत नाही. देशप्रेम कुठल्याही विषयावरील चित्रपटातून व्यक्त होऊ शकतं. नेहरू, गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर चित्रपट केले. त्यांना तुम्ही चरित्रात्मक देशभक्तीपर चित्रपट म्हणू शकता; पण यांच्या चरित्रातून मला काय सांगायचे होते? माझा दृष्टिकोन काय होता? हे समजणं महत्त्वाचं आहे.
– श्याम बेनेगल, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि लेखक