सुरुवातीला काही चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावल्यानंतर अली अब्बास जफरने ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये स्वतंत्रपणे दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली. पहिल्या चित्रपटापासून ते गेल्या वर्षीच्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटापर्यंत त्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावत नेल्या. आधी लेखन मग दिग्दर्शन अशा दुहेरी भूमिका आपल्या चित्रपटात पार पाडणारं अलीचं गोष्टीवेल्हाळ रूप ‘भारत’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लोकांसमोर आलं आहे.
तू चित्रपटाचं लेखन करतोस आणि मग तो चित्रपट दिग्दर्शित करतोस. या प्रवासात तुझी स्वत:ची सुरुवात नेमकी कशी होते, यावर अली म्हणाला, एका चित्रपटनिर्मितीचा प्रवास अनुभवायचा तर मुळातच या प्रवासासाठी तुमच्याकडे लोकांची उत्सुकता वाढवेल अशी कथा-कल्पना असली पाहिजे. इतरांना गोष्ट सांगण्याआधी तुमच्या मनामध्ये हा प्रश्न उभा राहिला पाहिजे की, तुम्हाला ही गोष्ट का सांगायची आहे. तिथून या प्रवासाची सुरुवात होते. दिग्दर्शनाआधी हा कथा लेखनाचा प्रवास मला इतका कणखर बनवतो की त्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कितीही मोठा चमू असला किंवा मोठा कलाकार असला तरी आणि कितीही अडथळे आले तरी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहतो, असे तो विश्वासाने सांगतो.
‘सुलतान’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘भारत’ या तिन्ही चित्रपटांमधून एकत्र आलेली आणि टिकलेली सलमान खान आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर ही यशस्वी जोडी मानली जाते आहे. मात्र दिग्दर्शक म्हणून सलमान खानसारख्या मोठा कलाकार आहे या अर्थाने हे चित्रपट केलेले नाहीत, तर त्यातून मला काहीएक म्हणणं मांडायचं होतं. त्याचबरोबर आपल्या समाजात सध्या आजूबाजूला काय चाललंय त्याचंही प्रतिबिंब त्यात दिसलं पाहिजे, याबाबतीतही मी ठाम होतो, असं अली म्हणतो. ‘सुलतान’मध्ये आपला स्वत:शीच असलेला संघर्ष दाखवला होता. ‘टायगर जिंदा है’मध्ये भारत आणि इतर देश यांच्यातील संबंध आणि माणुसकीचे नाते हा एक धागा होता. तर आता ‘ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटावर आधारित असला तरी ‘भारत’ चित्रपटामध्ये सध्या भारतात जे वातावरण आहे, त्याला अनुसरूनच एक वैचारिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, असं तो सांगतो. आता आपला देश कोणत्या परिस्थितीत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर एक देश म्हणून भारताची वाटचाल कशी होती. भारत ही व्यक्तिरेखा देश म्हणून भारताशी जोडलेली आहे, असे अलीने सांगितले.
अलीच्या चित्रपटात नायकाइतकेच नायिकेचेही पात्र महत्वाचे असते. यामागे सलीम-जावेद यांच्यासारख्या लेखकांचा आदर्श डोळ्यासमोर असल्याचे तो म्हणतो. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या स्त्री-व्यक्तिरेखा जबरदस्त होत्या. अगदी ‘अमर अकबर अँथनी’सारख्या तद्दन मसाला चित्रपटातील स्त्री-व्यक्तिरेखाही प्रभावी होत्या. अशी काही उदाहरणं मी स्वत: स्त्री-व्यक्तिरेखा लिहिताना डोळ्यासमोर ठेवतो. त्यामुळे अभिनेत्यामुळे (खास करून सलमान खानसारख्या मोठय़ा कलाकारामुळे) नायिकेची व्यक्तिरेखा झाकोळली जाणार नाही, हा विचार डोक्यात कायम असतो असं तो सांगतो. मी माझ्या लेखनावर ठाम असतो, त्यामुळे कलाकारांनाही एखादा बदल करावासा वाटला तर तो कथेच्या पातळीवरच व्हायला हवा. एकदा पटकथा पूर्णपणे तयार होऊन चित्रीकरणाच्या प्रक्रि येपर्यंत आल्यावर मात्र त्यात काहीही बदल होणार नाही, हेही स्पष्टपणे कलाकारांना सांगत असल्याचं तो म्हणतो. त्याच्या या उत्तरातूनच सलमान खान चित्रपटात ढवळाढवळ करत नाही, हे अप्रत्यक्षपणे सांगून तो मोकळा होतो. सेटवर चित्रीकरणादरम्यान सलमान आणि कतरिना यांच्याबरोबरची मैत्री बाजूला ठेवून पूर्णपणे व्यावसायिकतेने दिग्दर्शक म्हणूनच वागतो, असंही अलीने स्पष्ट केलं.
सलमानच्या वयाचा आणि चित्रपटातील इतर अभिनेत्रींच्या वयाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्याबद्दल अली म्हणाला, कुठलाही दिग्दर्शक एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं खरं वय लपवू शकतो. त्यांना तरुण दाखवू शकतो, पण त्यासाठी दिग्दर्शकाला ते पटलं पाहिजे. ‘भारत’ चित्रपट करताना सलमानच्या वयातून दिसणारा त्याच्या आयुष्याचा आणि पर्यायाने देशाचा आजवरचा प्रवास दाखवण्यात सफल झालो, कारण आम्ही दोघेही त्याबाबतीत एकमेकांवर विश्वास ठेवून काम करत होतो.
‘टायगर जिंदा है’नंतर त्याच्या पुढचीही गोष्ट तुला सुचलीय असं ऐकलंय, त्यावर तो हसून म्हणाला, हो टायगरच्या पुढील भागासाठी गोष्ट सुचली आहे. त्याबद्दल आदित्य चोप्रा, सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्याशी बोलणंही झाल्याचं त्याने सांगितलं, पण त्याआधी थोडा वेळ घेणार आहे. त्या वेळेत टायगरच्या गोष्टीचा विचारप्रक्रिया पूर्ण करेन त्यानंतरच पुढच्या गोष्टी सुरू होतील, असं त्याने सांगितलं.
कौटुंबिक मूल्यं, मनोरंजन, विनोद, अॅक्शन, नाटय़, नृत्य आणि गाणी अशा सगळ्या गोष्टी चित्रपटाला परीपूर्ण करतात. हे सगळे पैलू चित्रपटात असलेच पाहिजेत. चित्रपटातून काहीएक संदेश, विचार मांडला गेलाच पाहिजे मात्र तो मनोरंजक पद्धतीने लोकांसमोर येणेही गरजेचे असते.