रवींद्र पाथरे

मागच्या आणि आजच्या पिढीत आचार, विचार, व्यवहार यांत प्रचंड दरी दिसून येते. माणसांबद्दलची ओढ, आपुलकी, त्याग, संस्कार, मूल्यांशी बांधिलकी आणि वास्तवातला व्यवहार यांची सांगड त्या पिढीने किती छान घातली होती! माणूसपण हा त्या पिढीच्या जगण्याचा मूलाधार होता. याउलट आहे आजची पिढी. काटेकोर, व्यवहारी आणि व्यक्तिवादी. ‘मी, माझं, मला’ या तिच्या दृष्टीनं महत्त्वाच्या गोष्टी. आपल्या वर्तन-व्यवहाराच्या समर्थनार्थ अनेक पटवण्याजोग्या सबबी या पिढीकडे आहेत. त्यातून ही पिढी पडली अत्यंत स्मार्ट! त्यामुळे आपलं म्हणणंच कसं बरोबर आहे, हे ठसवण्यात तिचा हात कोण धरणार? अर्थात परिस्थितीनंसुद्धा त्यांना असं घडायला भाग पाडलंय, हेही खरं. पण या पिढीचा टोकाचा व्यक्तिवाद त्यांच्या माणूसपणावरच प्रश्नचिन्ह उभं करतो आहे, त्याचं काय? कधी कधी गोष्टी स्वभावगतही असतात. आपण काही चुकीचं करतो/ वागतो, हे त्यांच्या ध्यानीही येत नाही. परंतु समोरच्याला असं गृहीत धरण्यातून कळत-नकळतपणे अनेक प्रश्न/ समस्या निर्माण होतात. काही काळाने त्यातून काटय़ाचा नायटाही होऊ शकतो.. होतो. गोष्टी तशा साध्या-सरळच भासतात सुरुवातीला; पण त्याकडे दुर्लक्ष झालं की घडू नये ते घडतं. त्यातून मग माणसं एकमेकांपासून दुरावतात.. तुटतात. आणि याचा त्या व्यक्तीला बहुतेकदा थांगपत्तादेखील नसतो. या सगळ्या प्रकारात कुणीतरी भरडला जातो. नात्यांत ताण निर्माण होतात. त्यावर वेळीच उपाय केले नाहीत तर ते तुटतातदेखील. स्वरा मोकाशी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ हे नाटक आजच्या याच समस्येकडे निर्देश करतं. जिगीषा संस्थेनं त्याची निर्मिती केली आहे.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’
Monitor lizard entered the house while people sleeping video viral on social media
आयुष्यापेक्षा झोप महत्त्वाची! गाढ झोपले होते अन् घोरपड घरात घुसली, पुढे जे झालं ते पाहून काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

पूर्वी चाळीत वास्तव्याला असलेलं कुटुंब यथाकाल फ्लॅटमध्ये जातं.  मुलं मोठी होऊन मार्गी लागतात. मुलगी इरा लग्न होऊन दूर बदलापूरला जाते. उच्चशिक्षित मुलगा अजय अमेरिकावासी होतो. बायको-मुलासह तिथंच स्थिरावतो. इकडे वडिलांच्या पश्चात आई एकटी, एकाकी होते. अजय तिला सांगतो, तू अमेरिकेला ये. पण तिथल्या भयाण एकलेपणापेक्षा आपल्या मातीत, शेजारपाजाऱ्यांच्या सान्निध्यात राहणं आई पसंत करते. उलट, तीच त्याला म्हणते की, ‘त्यापेक्षा तूच का इकडे येत नाहीस? आपण सारेच एकत्र राहू!’ म्हणजे तसा हट्ट नाहीए तिचा; पण तिला आपलं वाटतं, की तो परत आला तर आपल्याला आपल्या मुलामाणसांची ंसोबत होईल. परंतु हे शक्य नाहीए, हेही ती जाणून असते. म्हणूनच ती हट्ट करत नाही; फक्त सांगते. तिने निधी नावाच्या मुलीला पेइंग गेस्ट म्हणून ठेवलीय. तेवढीच सोबत. बाकी मग शेजारपाजाऱ्यांशी हवापाण्याच्या गोष्टी, दुखलंखुपलं, हवं-नको ते विचारणं/ सांगणं, त्यांच्या घरी अधूनमधून येणं-जाणं वगैरेत तिचा वेळ मजेत जातो. शिवाय इरा येतेच अधूनमधून मदत लागते तेव्हा. त्यामुळे तूर्तास सारं सुरळीत चाललंय.

आणि एके दिवशी अचानक इरा ईशानला (मुलाला) घेऊन घरी येते. त्याला मुंबईच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला असतो. त्यामुळे बदलापूरहून ये-जा करण्यापेक्षा आईकडून त्याला कॉलेज जवळ पडेल आणि आईलाही आपल्या माणसाची साथसोबत होईल असा इराचा हिशेब असतो. ती निधीला नवं घर बघायला आईला सांगायला सांगते. पण असं तडकाफडकी निधीला कसं काय जायला सांगायचं, असं आई तिला समजावू बघते. मात्र इराने निर्णय घेऊनच टाकलेला असतो. ईशानला तरुण मुलीसोबत एका घरात ठेवणं तिला पटत नाही. तिच्या हट्टामुळे आई निधीला नवं घर शोधायला सांगते. पण आता असं अध्र्यात कुठं नवं घर मिळणार, हा निधीपुढचा पेच असतो. दोन महिन्यांनी परीक्षा झाल्यावर मी नवं घर शोधते असं ती सांगते. परंतु इरा आत्ताच इरेला पेटलेली असते. ती निधीच्या वडलांना परस्पर फोन करून तिला घेऊन जायला सांगते. खरं तर निधीला आपल्या वडलांचं बाहेरख्याली वर्तन मंजूर नसल्यानंच तर तिने पेइंग गेस्ट म्हणून इतरत्र राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे ती वडलांकडे परत जायला नकार देते. मात्र, इरा जबरदस्ती तिला त्यांच्याकडे जायला भाग पाडते.

पुढे इरा स्वत:ही आपली मुंबईत बदली करून घेऊन आईकडेच राहायला येते. नवऱ्यालाही (नितीन) ती तिथंच राहायला यायला भाग पाडते. आपलं हक्काचं घर असताना दुसरीकडे का जा, असं तिचं म्हणणं असतं. पण तिच्या येण्याने आईला अधिकच्या कामांचा आणि तिच्या हट्टाग्रही वागण्याचा त्रास होऊ लागतो. पण बोलणार आणि सांगणार कुणाला? इरा बोलूनचालून आपलीच मुलगी आहे ना! तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करण्याखेरीज आईला गत्यंतर नसतं. तशात सोशिक, पडतं घेण्याचा स्वभाव. वर लोक काय म्हणतील, हा बागुलबुवा असतोच.

नितीनला सासूबाईर्ंची होत असलेली फरफट दिसत असली आणि त्याबद्दल तो इराला अधूनमधून फटकारतही असला तरी ती त्याचं काही ऐकून घेत नाही. आईला गृहीत धरून ती सगळं ओझं तिच्यावर लादत राहते. आईही नाइलाजानं सारं सहन करत राहते. पण पुढे असं काही घडतं की आईचे डोळे उघडतात. आपली मुलगी आपल्याला नको इतकं गृहीत धरतेय, तेव्हा तिला तिच्या या वर्तनाची जाणीव करून द्यायला हवी; त्यासाठी आपल्याला कठोर होण्याशिवाय पर्याय नाही, हे आईला कळून चुकतं. आणि ती निर्णय घेते : इराला तिच्या घरी परत जा म्हणून सांगण्याचा!

आज नव्या जमान्याच्या निकडीत आई-वडलांना मुलांच्या संसारात त्यागमूर्ती बनण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. विशेषत: आईला. तिला गृहीतच धरलं जाऊ लागलंय. आई-वडलांना स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांनाही आपल्या मनासारखं आयुष्य जगण्याचा हक्क आहे, हे साफ विसरलं जातंय. नातवंडांचं संगोपन आणि मुलगी/सुनेचा संसार करण्यात त्यांना गुंतवलं जातंय. हे अनुचित आहे याची तीव्र जाणीव ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ हे नाटक करून देतं. स्वरा मोकाशी यांनी वरकरणी कुटुंबकथा प्रकारातलं हे नाटक रचलं असलं तरी त्यात आजची एक ज्वलंत समस्या मांडलेली आहे. पण हे करताना नाटकाचा झुकाव कुठल्याही एका बाजूला होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. यात खलप्रवृत्तीची पात्रं नाहीत. जो संघर्ष उभा ठाकतो तो स्वभावगत आणि मनुष्यप्राण्यातील उपजत स्वार्थी वृत्तीतून! इराला आपण असे आपल्यापुरतंच पाहणारे कसे झालो याचा थांगपत्ताच नाहीए. परिस्थिती आणि व्यक्तिवादाने घेतलेला तिचा कब्जा तिला तसं वागायला भाग पाडतो. दुसरीकडे आईची घुसमट आणि कोंडी हीसुद्धा तिच्या पारंपरिक मानसिकतेतून झालेली आहे. निधी तिला त्या धुक्यातून बाहेर काढते. आपल्यालाही  मनासारखं जगण्याचा अधिकार आहे, मुलांच्या भावनिक मोहमायेत स्वत:ला किती अडकवायचं, त्यांच्याकडून गृहीत धरलं जाणं कुठपर्यंत सहन करायचं यालाही काही मर्यादा आहेत याची ती आईला जाणीव करून देते. आणि या नव्या प्रकाशात आई निर्णय घेते- स्वत:साठीही जगण्याचा! लेखिकेनं प्रत्येक पात्राला आपलं आपलं असं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिलं आहे. सरधोपट पात्रांचे टाइप्स त्यांनी योजलेले नाहीत. त्यामुळे परिचित असूनही या कथेत प्रेक्षक गुंतत जातो. टिपिकल अर्थानं संघर्षांचे क्षण नाटकात नाहीत. जो क्षणिक संघर्ष झडतो तो इराच्या स्वार्थाला धक्का बसल्यावरच! एकुणात एका संथ, ठाय लयीत प्रयोग रंगत जातो.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटकाचा बाज कायम ठेवत ते आशयकेन्द्रीच कसं राहील, हे पाहिलं आहे. यातली सगळी पात्रं तशी साधी-सरळ आहेत. त्यांना तसंच ठेवून त्यांच्या वर्तनातल्या दोषांतून नाटक फुलत जातं. पात्रं ठाशीव करून त्यांना स्वत:ची स्पेस देण्याची दक्षता चंद्रकांत कुलकर्णी यांनी घेतली आहे. हे कुणा एका व्यक्तीबद्दलचं नाटक नाहीए, तर मानवी वृत्ती-प्रवृत्तीच्या अतिरेकातून यातल्या नाटय़ाला खतपाणी मिळतं. स्वत्वाचं भान येणं हा या नाटकाचा गाभा आहे. ते इरालाही येतं आणि आईलाही. यात छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून मानवी प्रवृत्तीकडे निर्देश केलेला आहे. निधीच्या रूपानं नव्या, खुल्या विचारांचं वारं आईपर्यंत येतं.. तिला आपल्या झापडबंद आयुष्यातून बाहेर यायला प्रवृत्त करतं. तशीच इरालाही आपल्या आंधळ्या स्वार्थाची जाणीव करून देतं. नाटकात नव्या पिढीचे प्रतिनिधी निधी आणि ईशान यांचं मस्त जमतं, कारण त्यांच्याकडे पारंपरिकतेचं ओझं नाहीए. नितीन समजूतदार असले तरी त्यांचं इरापुढे काही चालत नाही. ही सारी पात्रं अस्सल हाडामांसाची करण्यात दिग्दर्शकाचा मोठा वाटा आहे.

प्रदीप मुळ्ये यांनी प्रशस्त, मोकळ्या घराचा फील नेपथ्यातून दिला आहे. रवि-रसिक यांनी प्रकाशयोजनेतून विविध प्रहर आणि नाटय़ांतर्गत मूड्स अधोरेखित केले आहेत. अशोक पत्की यांनी पाश्र्वसंगीतातून तसंच प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषेत नाटकाचा पोत सांभाळला आहे. उलेश खंदारे यांनी रंगभूषेतून पात्रांना ‘व्यक्तिमत्त्व’ बहाल केलं आहे.

वंदना गुप्ते यांनी सोशिक, पारंपरिक मानसिकतेत अडकलेली आई तिच्या सततच्या अवघडलेपणातून आणि नि:शब्देतून पुरेपूर पोहोचवली आहे. खरं तर त्यांच्या उपजत व्यक्तिमत्त्वाशी हे पात्र विसंगत आहे. मात्र, तरीही त्यांनी या व्यक्तिरेखेचे सगळे कंगोरे आत्मगत करून ती उत्तमरीत्या वठवली आहे. शेवटाकडे त्यांना आलेलं आत्मभान आणि त्यातून त्यांनी घेतलेला निर्णय नाटकाचा उत्कर्षबिंदू ठरतो. प्रतीक्षा लोणकर यांनी आजची आत्मरत स्त्री ताकदीनं व सहजतेनं उभी केली आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वातील दोषाबद्दल अनभिज्ञ असलेली इरा आईच्या एका निर्णयाने खाडकन् जागी होते. भानावर येते. आपण तिला किती गृहीत धरत होतो, या जाणिवेनं तिला तिची चूक उमगते. एवढंच नव्हे तर सर्वानाच आपण कसं वेठीस धरत आलेलो आहोत, हा साक्षात्कार इरासाठी नवाच असतो. टोकाची स्वार्थी इरा- प्रतीक्षा लोणकर यांनी आपल्या बोलण्या-वागण्यातून, प्रतिक्षिप्त क्रियांतून समर्थपणे उभी केली आहे. निधीचा मोकळेढाकळेपणा, तिची समंजस प्रगल्भता दीप्ती लेले हिने लोभसपणे दर्शविली आहे. राजन जोशींनी शांत, मितभाषी, तरीही आपलं मत ठामपणे व्यक्त करणारे नितीन भारदस्तपणे अभिव्यक्त केले आहेत. ईशानचा निरागसपणा अथर्व नाकती याला ओढूनताणून दाखविण्याची गरजच पडलेली नाही.

सर्वाकडून गृहीत धरल्या जाणाऱ्या ज्येष्ठांच्या व्यथावेदनेला वाचा फोडणारं हे नाटक ‘दृष्टी’ येण्यासाठी सर्वानी पाहायला हवं.