हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंकज भोसले
सिनेसाक्षरता आणि चित्रपट उपलब्धता वाढल्यामुळे अमेरिकेतर राष्ट्रांमध्ये हॉलीवूड सिनेमा दिग्दर्शकाऐवजी अभिनेत्याचा म्हणून ओळखला जाण्याचा काळ संपत चालला आहे. अगदी सुरुवातीला आपल्याकडे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणारे हॉलीवूडप्रेमी कॅरी ग्राण्ट, ग्रेगरी पीक, पॉल न्युमन, क्लींट ईस्टवुड यांच्या देमारपटांनी घायाळ झाले होते. ऐंशी-नव्वदीचे दशक अरनॉल्ड श्वात्झनेगर, सिल्व्हस्टर स्टॅलॉन, वॅन डॅम यांच्या चित्रपटांमुळे व्यायामशाळांना बरे दिवस येण्याचा होता. पण दोन हजारोत्तर काळामध्ये सिनेवाहिन्यांनी केलेल्या उपकारामुळे आपल्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने अमेरिकी चित्रपटाची ओळख झाली. स्टुडिओ आणि इंडिपेण्डण्ट चित्रपटांमधील फरक कळायला लागला आणि प्रायोगिक दिग्दर्शकांच्या कामाचे महत्त्व उमजायला लागले. ब्रुस विलीस, टॉम क्रूझ, जॉन ट्राव्होल्टा, निकलस केज, जॉनी डेप, टॉम हँक्स यांचा सिनेमा मानण्याऐवजी चित्रपटवेडे क्वेण्टीन टेरेण्टीनो, ख्रिस्तोफर नोलान, जेम्स कॅमेरॉन, स्टीव्हन स्पीलबर्ग, रॉबर्ट झेमेकीस, टीम बर्टन यांचा चित्रपट म्हणून मल्टिप्लेक्समध्ये तिकिटावर खर्च करायला लागले. तरीही गंमत अशी की, ब्रॅड पीट, लिओनाडरे डीकॅपरिओ, ब्रॅडली कुपर, रायन गॉस्लिंग अभिनित चित्रपटांना आपल्याकडे दिग्दर्शकांहून अधिक वलय दिसते. खरेतर या अभिनेत्यांइतकेच तुळ्यबळ कलावंत अमेरिकी चित्रपटसृष्टीमध्ये बरेच आहेत. अन् त्यांचा एखादा चित्रपट पाहिला, तरी इतर शोधून पाहण्याचा मोह आवरता येणे अशक्य असते. त्यातले पहिले महत्त्वाचे नाव आहे जोसेफ गॉर्डन लेव्हिट, अन् दुसरे जेसी आयझेनबर्ग. या दोघांनी गेल्या दीड-दोन दशकांत थक्क करणाऱ्या वैविध्यपूर्ण भूमिका वठविल्या आहेत. दोघेही बालकलाकार म्हणून मनोरंजनाच्या मुख्य प्रवाहात झळकले आणि तरुणपणी मुख्य भूमिकांमधून चमकायला लागले. पैकी जोसेफ गॉर्डन लेव्हिटने ‘डॉन जॉन’ नामक चित्रपट दिग्दर्शित करून पोर्न अॅडिक्शनच्या आजच्या समस्येला अत्यंत संवेदनशीलरीत्या वाचा फोडली. जेसी आयझेनबर्गने अभिनयाचा दर्जा सांभाळत नाटक आणि कथाही लिहिण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी त्याचा एक कथासंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. (तसे टॉम हँक्स आणि जेम्स फ्रँको यांचेही कथासंग्रह आलेत.) अन् त्यावर त्याची टीव्ही मालिकाही लवकरच येऊ घातली आहे.
जेसी आयझेनबर्ग ‘सोशल नेटवर्क’मधील मार्क झकरबर्गच्या वठविलेल्या भूमिकेसाठी बऱ्यापैकी ओळखीचा असला, तरी त्याच्या इतर चित्रपटांबाबत आपल्याकडे अनभिज्ञता अधिक आहे. ‘रॉजर डॉजर’, ‘द स्क्वीड अॅण्ड व्हेल’ हे सुरुवातीच्या काळातील इण्डिपेण्डण्ट चित्रपट, ‘थर्टी मिनिट ऑर लेस’, ‘अमेरिकन अल्ट्रा’, ‘झॉम्बीलॅण्ड’, ‘नाऊ यू सी मी’सारखे पारंपरिक अॅक्शनपट, ‘टू रोम विथ लव्ह’, ‘कॅफे सोसायटी’ यांसारखे वुडी अॅलनचे कलात्मक सिनेमे आणि ‘एण्ड ऑफ द टूर’सारखा डेव्हिड फॉस्टर वॉलेस या लेखकावरील चरित्रपटात शोध पत्रकाराची अविस्मृत भूमिका वठविणाऱ्या आयझेनबर्गचे बहुतांश सिनेमे फक्त त्याच्या अभिनयासाठी ओळखले जातात. दिग्दर्शक कुणीही असला, तरी वाटेला आलेल्या भूमिकेत शॅमेलियन कौशल्याने शिरण्याचे त्याचे तंत्र अफाट आहे. त्याच्या अभिनयातील ताजी ताकद अनुभवायची असेल तर अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘द आर्ट ऑफ सेल्फ-डिफेन्स’ हा अद्भुत सिनेमा पाहावा.
‘द आर्ट ऑफ सेल्फ-डिफेन्स’ हा वरवर कराटे सिनेमा असल्याचा मुखवटा धारण करतो. पण तो पारंपरिक कराटेपट नाही. त्याला कोणत्या गटात टाकावा असा प्रश्न निर्माण करणारा हा विनोद-गंभीर चित्रपट आहे. अन् त्यात दिग्दर्शनाइतकेच अभिनयातली तीव्र चौकसताही परिणामांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.
इथला नायक आहे केसी डेव्हिस (आयझेनबर्ग) हा स्त्रणत्व पुरेपूर अंगात असलेला विलक्षण वल्ली. अतिकृष शरीरयष्टी आणि दुर्मुखलेल्या चर्येमुळे छत्तीस वर्षांच्या आयुष्यात बऱ्यापैकी एकटेपणा अनुभवणाऱ्या केसी डेव्हिसला कुणीच मित्र-मैत्रीण नसते. घरात कुत्रा असला, तरी त्याच्या सहवासामुळे तोही त्याच्याहून अधिक दुर्मुखलेले आयुष्य व्यतीत करताना दिसतो. केसी अकाउंटंट म्हणून एका कंपनीत काम करतो. मात्र कार्यालयात वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सारेच त्याच्याशी फटकून वागत असल्यामुळे स्वत:च्याच कोशात तो अधिक सुरक्षित राहत असतो. एका रात्री डॉग फूड आणण्यासाठी जवळच्या सुपरमार्केटमध्ये जात असताना त्याच्यावर बाइकवरून आलेल्या टोळीकडून जीवघेणा हल्ला होतो. त्यानंतर अंधार पडल्यावर घराच्या बाहेर पडणे त्याला भीतीदायक वाटायला लागते. कुणी नुसती हूल दिली, तरी त्याला लहान मुलांसारखे मुळूमुळू रडू आपोआप येत असते. हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे कोणतीही प्रतिकारशक्ती नसल्याची बोच त्याला सुरुवातीला बंदूक घेण्यास प्रवृत्त करते. नंतर त्याची भेट शहरात सुरू असलेल्या कराटे क्लासच्या शिक्षकाशी होते. अन् तिथे प्रवेश घेण्याचे त्याचे पक्के होते. आयुष्यातील कुठलीही भावना व्यक्त करण्यासाठी कराटेचा आधार घेणारा मास्तर सेन्सेई (अलेसान्द्रो निवोला) याच्याकडे त्याचे स्व-संरक्षणाचे धडे सुरू होतात.
मार्शल आर्ट्सच्या धडय़ांमुळे सुरवंटाचे फुलपाखरू या वेगाने व्यक्तिमत्त्व घडणाऱ्या, नकारात्मक व्यक्तिरेखेतून सकारात्मकतेकडे जाणाऱ्या किंवा दुर्मुखलेल्या अवस्थेतून आनंदीपणाकडे कूच करणाऱ्या प्रकारासारखा केसीमध्ये अपेक्षित बदल घडत नाही. मात्र एकटेपणाने संपृक्त असलेल्या त्याच्या आयुष्याला किंचित गती यायला लागते. ‘पाप्याचे पितर’ या संकल्पनेला जागणाऱ्या केसीच्या शरीरामध्ये रागाला ताकदीमध्ये परावर्तित करण्याची अल्प क्षमता तयार होते. स्व-संरक्षणाचे धडे वाढू लागल्यानंतर त्याला सेन्सेईकडून क्लासमध्ये गुप्तरीत्या चालणाऱ्या विलक्षण रहस्यांचा उलगडा होतो. अन् मग त्यातील अन्यायकारक गोष्टींना मिटविण्यासाठी केसी तीव्र पवित्रा घेऊन लढायला सज्ज होतो. दिग्दर्शक रायले स्टर्न याने कराटेसारख्या हाणामारीयुक्त सिनेमाला उत्कृष्ट कारागिरीने हाताळले आहे. चित्रपटात तिरकस विनोदी प्रसंग भरपूर आहेत. केसीला समवयीन स्त्रीपात्र असले, तरी कथानक पूर्णपणे प्रेमविरहित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेसी आयझेनबर्ग याने फोमणी शरीरयष्टी आणि विचित्र हावभावांसह वठवलेली इथली व्यक्तिरेखा चटकन आवडणारी आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहे.