पूर्वनियोजन करून साडेतीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केलेली झी युवावाहिनीची रुद्रम्ही मराठी मालिका नुकतीच संपली. अशी नेटकी, निकोप आणि खिळवून ठेवणारी मालिका छोटय़ा पडद्यावर गेल्या कित्येक दिवसांत दिसली नाही असा तिच्याबद्दल बोलबाला झाला. तिच्या यशाचा धांडोळा कलाकृतीतच घेण्याचा हा प्रयत्न भावी मालिकांच्या निर्मात्यांना उद्बोधक ठरावा.

पाचशे-सहाशे भागांच्या वर्ष-दोन वर्षे खटारा गतीने चालणाऱ्या मालिकांच्या दर्शकांना अवघ्या तीन महिन्यांच्या अवधीत एक मालिका पूर्ण होणार हा अलीकडच्या काळातला धक्काच होता. ‘झी युवा’ वाहिनीने सादर केलेल्या ‘रुद्रम्’ या मालिकेचा धक्का नंतर प्रेक्षकांसह साऱ्या मालिका विश्वालाच बसला. ‘रुद्रम्’ शांत होऊन दोन आठवडे उलटले तरी हा धक्का ओसरलेला नाही.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
article pay tribute to world renowned mridangam scholar varadarao kamalakara rao
व्यक्तिवेध : व्ही. कमलाकर राव

गेल्या काही वर्षांत इतकी नेटकी, निकोप आणि गुंतवून ठेवणारी दुसरी मालिका छोटय़ा पडद्यावर आली नाही असा तिचा बोलबाला होत राहिला आणि मग त्या यशामागच्या कारणांचा शोध सुरू झाला.

जे सादरीकरण पाहताना प्रत्येक वेळी नवे काही आकळत जाते, नवी नवी अनुभूती मिळते, अभिरुचीत चांगली भर पडल्यासारखे भासते ते सादरीकण वैशिष्टय़पूर्ण ठरते. चांगल्या कलाकृतीची ही लक्षणे ‘रुद्रम्’ने सलामीलाच प्राप्त केली आणि प्रेक्षकांना तिने आपलेसे केले. रहस्यरंजनात्मक असूनही ही मालिका कुठंही फार आघाती वा आक्रस्ताळी झाली नाही. एका विशिष्ट द्रुतगतीत ती धावत राहते. स्वत:चा एक पोत फडफडवत राहात संपते.

हे सगळे कसे घडले असेल? कशामुळे घडले असेल? सादरीकरणातच या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.

या मालिकेशी जे निकटचे संबंधित आहेत ते सर्व म्हणजे लेखक गिरीश जोशी, निर्माते विनोद लव्हेकर, संदेश कुलकर्णी आणि प्रमुख भूमिकेतील मुक्ता बर्वे ही सगळी प्रायोगिक नाटय़ चळवळीतून पुढे आलेली मंडळी आहेत. नाटय़प्रशिक्षित आहेत. त्याच  क्षेत्रातील  पदवीधर आहेत. आपातत:च त्यांच्या प्रशिक्षित पिंडानुसार ते सर्व झगमगाटी, बाजारू वृत्तीपासून दूर राहिले आणि कलामूल्ये त्यांच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची ठरली. मालिकांच्या बाबतीत कलात्मकतेला अडथळा निर्माण करणारे असतात. सुमार आकलन असणारे मालिकेचे संचालक टी. आर. पी. चा बागुलबुवा ते उभा करून प्रेक्षकांची म्हणून स्वत:चीच साक्ष काढतात. आणि टुकार मालिकांच्या निर्मितीला कारणीभूत होतात. अशा प्रस्थापित संचालकांच्या विळख्यातून ‘रुद्रम्’ सुटली असणार अन्यथा इतकीसुद्धा निदरेष, आशयपूर्ण प्रदूषणमुक्त कलाकृती असंभवच होती.

मालिकेची श्रेय नामावली सुरू होते त्यातच मालिकेतले चेहरे एकामागोमाग एक दिसू लागतात. चेहऱ्यांचे म्हणजे व्यक्तींचे महत्त्व तर त्यातून ठसवले जातेच पण यातले बहुतेक चेहरे पाठीमागे वळून पाहताना दिसतात. अखरेचा चेहरा नायिकेचा येतो तो मात्र प्रेक्षक सन्मुख आहे. आमचं तुझ्यावर लक्ष आहे आणि तूच आमचं लक्ष्य आहेस हेच हे ते वळून वळून सांगत आहेत. त्या सर्वाना थेट भिडते ती नायिका. श्रेयनामावलीतूनच प्रारंभी केलेले हे सूचन नोंदवण्यासारखेच आहे.

रागिणी, तिचा नवरा, तिचा पाच वर्षांचा मुलगा आणि वडील आपल्या मोटारीतून जात असताना त्यांच्या गाडीला अपघात होतो. त्या अपघातात नवरा, मुलगा आणि वडील मृत्युमुखी पडतात तो अपघात नसून आपल्या नवऱ्याला मारण्यासाठी हेतुत: घडवून आणलेला खून होता हे जेव्हा तिला खात्रीपूर्वक कळते तेव्हा ती खुन्यांचा शोध घेऊन त्यांचा बदला घ्यायचा ठरवते. या शोध मोहिमेत एक भयानक स्कॅण्डल उघडकीला येते. आणि मग या शोधाच्या झंझावाताला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. तो सारा थरारक चिंताजनक प्रवास म्हणजेच ‘रुद्रम्’ ही मालिका केवळ रहस्यरंजनापुरती मर्यादित राहात नाही म्हणून ती अधिक महत्त्वाची.

या मालिकेचे लेखक, पटकथाकार, संवादकार गिरीश जोशी हे हुशार नाटककार आहेत. चपळता आणि चटपटीतपणा ही या चतुर नाटककाराची लेखन वैशिष्टय़े आहेत. कारागिरीवर त्यांची हुकमत आहे. ते कुशल तंत्रज्ञही आहेत. या सर्व गुणवैशिष्टय़ांचा त्यांनी या मालिकेसाठी पुरेपूर वापर करून घेतला आहे. बावीस मिनिटांच्या प्रत्येक भागात कमीत कमी चार स्थळे त्यांनी सामावून घेतली आहेत. आणि एपिसोडिक तंत्रानुसार या प्रत्येक उपभागात काही ना काही घडलेच आहे. परिणामी प्रत्येक एपिसोडला गती आणि उत्सुकता प्राप्त झाली आहे. एपिसोड कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे कळतच नाही इतका प्रेक्षक त्यात गुंतून पडतो. काही मालिकांमधील जाहिराती या प्रेक्षकांना विरंगुळा देतात. मालिकेपासून मुक्ती देतात. या मालिकेच्या मध्यंतरी येणाऱ्या जाहिरातींचा त्रास अस होतो.

या मालिकेत बरीच पात्रे असूनही त्यांची गर्दी वाटत नाही. कारण प्रत्येकाला अगदी नगण्य वाटणाऱ्या पात्रालादेखील त्याचा स्वत:चा असा चेहरा, व्यक्तिमत्त्व आहे. पात्रांच्या व्यक्तिरेखांचे स्वरूप मिळाल्यामुळे ती सर्व लक्षात राहतात. अचूक चेहरे निवडण्यातच दिग्दर्शकाने (भीमराव मुडे) अर्धी बाजी मारली आहे. पात्रांची नटगिरी मागे पडते आणि खरीखुरी माणसे म्हणूनच ती समोर येतात. काल्पनिक असूनही ही कथा म्हणजे एक सत्य घटना आहे असं वाटायला लेखकाइतकाच दिग्दर्शकही कारणीभूत आहे. दिग्दर्शकाने तर प्रेक्षकांना प्रत्यक्ष घटनास्थळीच आणून उभे केले आहे.

प्रसंग अनेक असले तरी प्रत्येकाला तार्तिक संगती आणि कार्यकारणाभाव आहे. एका प्रसंगात दुसरा उलगडतो आणि मालिका वाहती राहते. स्वाभाविक होते.

नायिकेच्या म्हणजेच रागिणीच्या आईला दोन भावरूपात प्रकट करण्यात लेखकाची चतुराई आहे. पूर्वार्धात ती धास्तावलेली आई आहे तर उत्तरार्धात अल्मायझर झालेली रुग्ण आणि इतकं असूनही या परिस्थितीचा फायदा घेऊन लेखक त्याचा मेलोड्रामा करीत नाही. अगदी छोटय़ा पडद्याचे सार्वत्रिक माध्यम असूनही (शिवाय मेलोड्रामा वज्र्य असलेल्या प्रायोगिकांपैकीच तो एक आहे) जरुरीपुरते तो आवश्यक तेवढेच भावनिक ताण निर्माण करतो आणि पुढे निघतो. मुळात कथेतील आईची योजना हीच भावनिक आधारासाठी आहे.

वेषांतर हा तर मराठी नाटकांचा प्राणच आहे. ‘सौभद्र’पासून ‘तो मी नव्हेच’सह ‘हसवाफसवी’पर्यंत रूपबदल हा हमखास दाद घेण्याचा प्रकार आहे. येथे लेखकाने तर या रूपांतरासाठी खास भूमीच – प्लॉटच तयार केला आहे, त्यामुळे ते रुपांतर अपरिहार्य झाले आहे. नायिकेने ती सारी ‘सोंगे’ बेमालूम वठवली आहेत. अगदी ‘ती मी नव्हेच’  थाटात. अर्थात अन्य नाटकांतली वेषांतरे पुरुष नटांनी केलेली होती. इथे एक अभिनेत्रीने ती पूर्णत्वास नेली आहेत. अर्थात मुक्ता बर्वेसारख्या विविध भावदर्शन टोकदारपणे आविष्कारित करणाऱ्या कलावतीमुळेच ही सोंगबाजी तुफान यशस्वी झाली आहे. लेखक स्वत: कुशल तंत्रज्ञ आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे तज्ज्ञ आहेत. आपल्या ज्ञानाचा या मालिकेसाठी त्यांनी पूर्णत: वापर केला आहे. त्यामुळे मालिका अत्याधुनिक झाली आहे. आजची झाली. काल्पनिक कमी आणि वास्तव अधिक झाली आहे.

या मालिकेची नायिका सुडाने पेटलेली आहे. अंबिकेचा ती अवतार आहे. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. प्रारंभीचा तिचा वैयक्तिक हेतू हळूहळू पुसट होत जातो आणि समाजातील छुप्या दुष्ट प्रवृत्तीचं तिला जेव्हा दर्शन घडतं तेव्हा तिची कथा तिची एकटीची राहात नाही. ती साऱ्या समाजाचीच होते. खूनाचे सत्र अमलात आणून आणूनही ती खलनायिका होत नाही. नावाप्रमाणे रणरागिणी होते. धीरोदात्त होते. तिचं हे चंडिकेचं रूपच आशयाच्या बाजूने मालिकेच्या यशाचं मुख्य गमक आहे.

मालिकेच्या लक्षणीयतेत दिग्दर्शकाचा फार मोठा सहभाग दिसून येतो. सत्तर भागांची हमी आरंभीच दिली गेल्यामुळे आपल्याला नक्की काय करायचे आहे आणि कळसाध्याय कुठे करायचा आहे. याची पूर्णत: जाणीव त्याला असावी. त्यामुळे कुठेही गडबड नाही (त्याची आणि बघणाऱ्यांचीही) आयत्या वेळी भाग वाढवण्याच्या  प्रथेपासून तो वाचल्यामुळेच त्याच्यातला आत्मविश्वास दृढ झाला असावा.

पात्रांच्या विविधतेबरोबर येथे  घटनास्थळांची विविधता ही प्रेक्षकांना जखडून ठेवण्यास साहाय्यभूत ठरते. बाह्यदृश्यांची स्थळे अपरिचित आहेतच. पण आतल्या दृश्यात दिसणाऱ्या वास्तू, बंगले, दालने, त्यांची रचना, अर्धे जिने व त्यांच्या लँडिंगचा केलेला वापर हे सारे कथेइतकेच रहस्यमय आहे. अचंबित करणारे आहे. रहस्यकथा असूनही कुठे फार काळोखाला कामाला घेतलेले नाही. आतल्या दृश्यांसाठी पूर्ण गडद निळ्या रंगाची छटा वापरल्यामुळे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे, जे गूढतेपासून पूर्णत: अलिप्त आहे. त्यामुळेच भूतकथेचा अनावश्यक रंग या सादरीकरणाला चिकटलेला नाही.

मालिकेत पिस्तूलबाजी आहे. रक्ताच्या चिळकांडय़ा आहेत, थारोळी आहेत. पण कसबी दिग्दर्शकाने या रक्तरंगापासून प्रेक्षकांना जणू चार हात दूरच ठेवले आहे. त्यामुळे मानवी हत्येचा येथे धक्का बसत नाही. केवळ थबकणे होते. नेकीने गुन्हेगाराचा शोध जिवाच्या आकांताने लावणारा पोलीस इन्स्पेक्टर धुरत पिस्तुलाच्या गोळीला बळी पडतो त्यावेळी मात्र प्रेक्षक हळहळतो. पण येथेही दिग्दर्शक फार काळ रेंगाळत नाही. आवश्यक तो परिणाम साधून पुढे जातो. (धुरतच्या भूमिकेत आनंद अलकुंटे या कलावंताने रागिणीला तितकीच जबरदस्त साथ दिली आहे.)

नायिका रागिणीचा अंत दाखवून ‘साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण’ केलेली नाही, त्यामुळे ढोबळतेपासून वाचली आहे. रागिणीचं काय होणार ते तिचं तिला जसं माहीत आहे आणि ती त्या परिणामाला तोंड द्यायलाही तयार आहे. तद्वतच प्रेक्षकांनाही ते कळून चुकणारे आहे. मग मुद्दाम ते दाखवायचे कशासाठी? आपला कार्यभाग साधत असतानाच ती जे एक महाभयंकर समाजविघातक रॅकेट उघडकीला आणून हौतात्म्य पत्करते, त्यामुळे तिच्या धीरोदात्तपणाला एक वेगळीच उंची प्राप्त होते.

‘रुद्रम’ अन्य मालिकांपेक्षा वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण वाटते. याचे कारण तिने दाखवलेल्या सामाजिक भानात आहे. म्हणूनच तिचे स्वरूप केवळ रहस्यरंजनात्मक राहात नाही, तर त्याही पलीकडे जाते. रंजनाच्या माध्यमातून येथे लेखक काही सामाजिक आणि राजकीय विधान करू पाहतो. व्यवस्थेचाच पर्दाफाश करतो. या मालिकेतील थरारक असणाऱ्या दृश्यांपेक्षाही विकृत सामाजिकतेचे जे डोळेफोड दर्शन घडते ते कमालीचे अस्वस्थ करणारे आहे. चीड आणणारे आहे.

सोज्वळ बुरख्याआड लपलेले ‘एनजीओज्’ जो दत्तक मुलांचा निर्घृण व्यापार करतात तो संतप्त करणारा आहे. निरागस मुलांचा ड्रग्सच्या विक्रीसाठी केलेला वापर पाहून जीव कळवळतो. निष्पाप मुलींना जबरदस्तीने अमली पदार्थाचे सेवन करायला लावून त्यांची जी दयनीय अवस्था केली जाते ती पाहणे असह्य होते. टॅरो कार्डाची बुवाबाजी पाहून भंपकपणा कुठे कुठे शिरलाय याची प्रचीती येते.

शिवाय अधोविश्वातील गुन्हेगारीचं (अंडरवर्ल्ड) दर्शन तर चक्रावून टाकणारं आहे. अर्थात यातले काही उद्योग यापूर्वी हिंदी चित्रपटांतून दाखवले गेले असतीलही, पण ते नाचगाण्याच्या धुंदीत पुसले जातात. येथेही भयानकता थेट तुमच्या घरातच, नजरेसमोर छोटा पडदा फाडूनच बाहेर येते. एका परीने लोकजागृतीच करते. दृष्टीआडची सृष्टीच तुमच्यापुढे जिवंत करते; अंगावर शहारे आणते.

मोबाइल, स्मार्टफोन, व्हिडीओ, संगणक, दूरचित्रवाणी ही आजची आधुनिक साधने. त्यांचा गुन्हेगारी जगतात होणारा वापर पाहून अचंबित व्हायला होते. हे सारे कारनामे पाहून प्रेक्षक सजग होतो, सावध होतो. आजवर तो वृत्तपत्रांतून वाचत होता ते प्रत्यक्षच त्याच्यासमोर येऊन उभे राहिलेले असते. ‘रुद्रम’चे वेगळेपण आणि परिणामकारकता अन्य कशापेक्षाही अधिक त्यातील भेदक कुप्रवृत्तीच्या दर्शनात आहे. मालिकेच्या शेवटी एकापाठोपाठ एक खून होतात. हे थोडे अतार्किक वाटते. पण सत्तर भागांची मर्यादा घालून घेणाऱ्यांना एवढे स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. नाटकाचा काय किंवा पडद्यावरचा काय, काळ हा समजून घ्यायचा भाग असतो.

माखीजा या टोळीच्या प्रमुखाला रागिणी जेव्हा त्याच्या कृष्णकृत्यांचा जाब विचारते तेव्हा तो म्हणतो, ‘झोपडपट्टय़ांना आगी लावल्या जातात, दंगलीत हजारो माणसं मरतात तेव्हा त्याचं तुम्हाला नाही काही वाटत? सरकारे आम्हीच चालवतो, मंत्री आम्हीच निवडतो. आमच्याच पैशावर सारं काही चालतं.’ रागिणी त्यावर काही उत्तर देत नाही. परंतु ती ज्यावेळी माखीजाला एका अज्ञात स्थळी संगणकावरची त्याच्या हॅक केलेल्या माहितीची चावी देण्याकरिता बोलावते तेव्हा बाणेदारपणे त्याला सांगते, ‘भले तुम्ही सरकार बनवत असाल किंवा चालवतही असाल, पण एका सामान्य माणसानं काय करावं हे तुम्ही नाही ठरवू शकत. त्याचा हक्क तुम्ही हिरावून नाही घेऊ शकत.’ आणि ठरल्याप्रमाणे खरंच रागिणी या संपूर्ण टोळीला त्यांच्या साऱ्या कारनाम्यासह उद्ध्वस्त करून टाकते. एक गैरकृत्यांची साखळीच्या साखळी तोडूनमोडून फेकून देते. सामान्य माणसांत असलेल्या प्रचंड शक्तीचेच ती प्रतिनिधित्व करते. सामान्य माणसाचे असाधारणत्व प्रकट करण्यात आणि त्यावर प्रत्येक प्रेक्षकाचा विश्वास दृढ करण्यातच ‘रुद्रम’चे मोठेपण आणि वेगळेपण आहे.

बहुसंख्य वाहिन्यांचे वरिष्ठ अधिकारी/ निर्माते मालिकेचा प्रेक्षक अभिरुचीच्या सामान्य पातळीवर सदैव राहील यासाठी सतत प्रयत्नशील असतात. ‘रुद्रम’सारख्या मालिकांमुळे त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसू शकेल. कमीत कमी एवढय़ा तरी नेटक्या, वेधक आणि आशयपूर्ण मालिका यापुढे छोटय़ा पडद्यावर आल्या तर हे ‘सत्यम्’ सार्थकी लागेल.

kamalakarn74@gmail.com